प्रेमकहाणी भाग-१


  • नक्षत्रांचे देणे : डॉ. विजया वाड


प्रेमकहाणी या लेखामधून दोन प्रेमी जीवांची झालेली ताटातूट, तरी एकमेकांवर असलेले अतुट प्रेम... कालांतराने जेव्हा समजते, तेव्हा “मिसेस देशपांडे” आणि हेमंत सर या दोघांचा एकमेकांवरचा विश्वास आणि दृढ प्रेम यांचा सुंदर मिलाफ ‘प्रेमकहाणी’ या लेखामधून सांगण्यात आला आहे.


प्रिय वाचकांनो, ‘प्रहार’मधील माझ्या कथांना आपण दिलेला प्रतिसाद मला सुखविणारा आहे. आता ही दीर्घिका ४ भागांत आपणासाठी सादर करीत आहे. दोन प्रेमी जीवांची ताटातूट झाली, तरी एकमेकांवर प्रेम करीतच राहतात... कालांतराने जेव्हा समजते, तेव्हा काय होते... प्रेमकहाणी, विश्वास आणि दृढ प्रेम यांचा सुंदर मिलाफ आहे. तुम्हाला नक्की आवडेल, असा विश्वास वाटतो. वाचा तर प्रिय वाचकांनो...



“मिसेस देशपांडे” नव्या हेड सरांनी हाक मारली. वैदेही वहीचा गठ्ठा बाजूला सारून नि डोळ्यांवरला चष्मा सारखा करीत, लगबगीने त्यांच्या रूममध्ये गेली.
“बसा.”
“नको सर. मी उभीच बरीय. सारा वेळ बसून असते.”
“अहो, वर्गात उभ्याने शिकवता ना मिसेस देशपांडे?”
“विसरलात मोठे सर? आज शुक्रवार! शुक्रवारी साऱ्या वर्गात निबंधाचा तास असतो ना, आम्ही मराठीचे शिक्षक.”
“अरे हो!”
“विसरलात? अर्थात कामाच्या रगाड्यात वार वगैरे किती लक्षात ठेवणार?” वैदेही म्हणाली.
“तसं नाही हो मिसेस देशपांडे.”
“मग कसं?”
“एकदा वेळ काढून तुमच्या घरी यायचं आहे.”
“घरी?”
“हो. घरी!”
“तुमची काही हरकत?” हेड सरांनी विचारले.
“नाही हो. पण घरी मी एकटीच असते. बरं नाही दिसणार ते.”
“आता काय बरं नि काय वाईट? मिसेस देशपांडे आपण पोरक्यातले पोर वयातले राहिलो आहोत का?”
“मग म्हणून तर म्हणते. मोठे सर…”
“मोठे सर, मोठे सर काय वैदेही?”
“मग काय म्हणू?”
“हेमंत म्हण!”
“नको नको नको. त्रिवार नको.”
“एकवार तरी म्हण वैदेही.”
“नको रे हेमंत!”
“थँक्यू वैदेही.”



तिच्या डोळ्यांत अश्रू उभे राहिले. काळाचे पडदे झरझर झिरपले. पोरवय डोळ्यांसमोरून एखाद्या सरकचित्रागत सरकू लागले. तो शाळेत खेळलेला लगोरीचा डाव. आपला अचूक नेम. लगोरी फोडल्यावर हेमंतची झालेली चिडचिड नि मग आपले ठरवून हरणे. त्याला लक्षात नाही, अशा बेताने पत्करलेली हार नि त्याचा होणारा आनंद डोळ्यांत टिपून ठेवायची धडपड! सारे सारे आठवणीचे कवडसे नजरेसमोरून सरकले.



ती बीए. बीएड. झाली नि नोकरीत चिकटली. तो मात्र स्कॉटलंडला पदवीधर, द्विपदवीधर, डॉक्टरेट झाला नि डायरेक्ट या शाळेचा हेड म्हणूनच नियुक्त झाला.
“लगोरी आठवते का गं?”
“चांगलीच आठवते.”
“मला बरं वाटावं, म्हणून तू हार पत्करायचीस ना?”
“हो! आता खोटं कशाला बोलू?”
“खूप बरं वाटलं.”
“पण मला खूप ऑकवर्ड वाटतंय मोठे सर.”
“तू माझ्या केबिनमध्ये आहेस वैदेही.”
“म्हणून तर म्हणत्येय.”
“सरळ हेमंत म्हणून हाक मार बघू!”
“काही तरीच काय हो हेड सर?”
“बैस ना! सैलावून बैस.”
“बरं बाई. बसते.”
“आता कशी? थांब मी शिपाईमामांना सांगतो.” तो उठला.
“विठूमामा, मी काही महत्त्वाचे बोलतो आहे बाईंशी.”
“हो सर. कोणाला आतमध्ये पाठवणार नाही मी.”
“शहाणा आहेस.”
“होय सर. मी बाहेर थांबतो. तुमची मीटिंग झाली की सूचना द्या मला. मगच आत येईन.”
“बरं.” त्याला आवश्यक त्या सूचना देऊन, हेड सर आत परत आले. आपल्या उच्चासनावर बसले.
“वैदेही...”
“काय मोठे सर?”
“हेमंत म्हण.”
“नको सर. मोठे सरच छान आहे. आपल्या खुर्चीचा मान आहे तो.”
ती गोड हसली. फार वेधक होतं, ते हसू...
(क्रमश:)

Comments
Add Comment

ऋषी लोमश

महाभारतातील मोतीकण : भालचंद्र ठोंबरे प्रदीर्घ दीर्घायुष्य लाभलेले महर्षी म्हणून पुराणात यांचा उल्लेख आहे.

विमा : हमी की फसवणूक?

संवाद : निशा वर्तक  “इन्शुरन्स काढा…, भविष्य सुरक्षित ठेवा…” हे वाक्य आपण किती सहज ऐकतो! आजारपण, अपघात,

नाना देही, नाना रूपी तुझा देव आहे...

नॉस्टॅल्जिया : श्रीनिवास बेलसरे खूप पूर्वी भारतीय कुटुंबसंस्था अतिशय मजबूत होती. ती जवळजवळ अभेद्यच आहे असे

मित्र नको, बाबाच बना!

आनंदी पालकत्व : डाॅ. स्वाती गानू असे कोणते बाबा असतात का ज्यांना मुलांवर प्रेम करायला आवडत नाही. मुलांनी आपल्याला

महापालिकांत चुरस

विशेष : डॉ. अशोक चौसाळकर  महापालिका निवडणुकीमध्ये राज्यभरात जोरदार लढत रंगणार आहे. या निवडणुकीमध्ये भाजप आणि

‌ध्रुव ६४ : भारताचे धुरंधर यश

तंत्रवेध : डॉ. दीपक शिकारपूर भारताने स्वतःचे स्वदेशी मायक्रोप्रोसेसर विकसित करण्याच्या प्रवासातील एक