दी लेडी बॉस: अर्चना सोंडे
वयाच्या २३ व्या वर्षी तिला कर्करोग झाला. मात्र तिने हिंमतीने त्यावर मात केली आणि ओला आणि उबेरसारख्या एग्रीगेटर मॉडेलचा वापर करून स्वतःची चार्टर विमान वाहतूक सेवा देणारी कंपनी सुरू केली. अवघ्या दहा वर्षांत कंपनीने ४०० कोटी रुपयांची उलाढाल केली. ही गोष्ट आहे दिल्लीस्थित जेटसेटगो एव्हिएशन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडच्या संस्थापक कनिका टेकरीवालची.
कनिकाचा जन्म भोपाळमधील मारवाडी व्यावसायिक कुटुंबात झाला. या कुटुंबाची देशभरात मारुती डीलरशिप होती. कौटुंबिक व्यवसायात फूट पडल्यानंतर कनिकाचे वडील अनिल टेकरीवाल यांनी रिअल इस्टेटचा व्यवसाय सुरू केला. तिची आई सुनीता ही गृहिणी आहे आणि तिला कनिष्क नावाचा एक लहान भाऊ आहे. कनिका अवघ्या सात वर्षांची असताना लॉरेन्स स्कूल, लव्हडेल, उटी येथे चौथीत दाखल झाली. ती एक निवासी शाळा होती. ती वर्गातील सर्वात लहान मुलगी होती. तिला बोर्डिंगमध्ये असणे कधीच आवडले नाही; परंतु आपले पालक आपल्यासाठी सर्वोत्तम विचार करतील हा तिला विश्वास होता. १०वी नंतर ती भोपाळला परतली आणि २००५ मध्ये जवाहरलाल नेहरू स्कूलमधून वाणिज्य शाखेत १२वी पूर्ण केली. त्यानंतर बीडी सोमानी इन्स्टिट्यूट (२००५-०८) मधून व्हिज्युअल कम्युनिकेशन आणि डिझायनिंगमध्ये पदवी मिळवण्यासाठी ती मुंबईला आली.
हॉस्टेलमध्ये राहिल्याने तिला मुंबईमध्ये राहणे अवघड वाटले नाही. लहानपणापासून ड्रायवर असणाऱ्या कारमधून फिरणारी कनिका आयुष्यात पहिल्यांदाच बसमध्ये चढायला शिकली. मुंबईने तिला स्ट्रीट स्मार्टनेस शिकवला. तिने अर्धवेळ कामही केले. १७ व्या वर्षी ती डिस्नेच्या एका इव्हेंटमध्ये सहभागी झाली. त्याचे तिला ३०० रुपये मिळाले. कॉलेजमध्ये असताना, तिने इंडिया बुल्सच्या रिअल इस्टेट विभागाच्या डिझायनिंग विभागातही काम केले होते. नंतर तिला कंपनीच्या विमान वाहतूक विभागात हलवण्यात आले, जिथे तिला विमान उद्योगातील अनेक लोकांना भेटण्याची संधी मिळाली.
तिने कंपनीसाठी तीन विमाने आणि एक हेलिकॉप्टर खरेदी केले. ती कराराच्या प्रत्येक पैलूकडे लक्ष द्यायची. मग ते खरेदी करण्यासाठी योग्य विमानात प्रवेश करणे किंवा कराराची तांत्रिकता शोधणे किंवा अंतिम किमतींवर बोलणी करणे असो. विमान वाहतूक व्यवसायामध्ये उतरण्याचे बाळकडू तिला इथेच मिळाले. जेव्हा तिने २००८ मध्ये पदवी पूर्ण केली तेव्हा तिच्या पालकांनी तिला सांगितले की, ती एकतर तिचे पदव्युत्तर शिक्षण घेऊ शकते किंवा लग्न करू शकते. तिने पहिला पर्याय निवडत जानेवारी २००९ मध्ये इंग्लंडच्या कॉव्हेंट्री युनिव्हर्सिटीमध्ये एक वर्षाच्या एमबीए प्रोग्रामसाठी प्रवेश घेतला. इंग्लंडमध्ये सुद्धा विमान वाहतूक व्यवसायाशी तिचा संबंध सुरूच राहिला. एरोस्पेस रिसोर्सेसमध्ये तिला नोकरी मिळाली. आंतरराष्ट्रीय विमान कंपनीत गोष्टी कशा काम करतात हे तिला शिकायला मिळाले. या कंपनीतच जेटसेटगोची कल्पना जन्माला आली.
एमबीए केल्यानंतर ती इंग्लंडमध्ये राहिली. २०११ मध्ये, तिला कॅन्सर झाल्याचे कळले आणि तिच्या पायाखालची जमीनच जणू सरकली. त्यावेळी ती फक्त २३ वर्षांची होती. या कठीण समयी तिच्या आई-बाबांनी तिची सेवा शुश्रूषा केली. त्यांच्यामुळेच आपण वाचलो ही भावना कनिकाच्या मनात कायम आहे. जगप्रसिद्ध व्यावसायिक सायकलस्वार लान्स आर्मस्ट्राँगची प्रेरक पुस्तके तिने वाचायला सुरुवात केली. त्याने टेस्टिक्युलर कॅन्सरशी लढा दिला आणि जिंकलादेखील. त्याच्या शब्दांनी कनिकाला खरोखर प्रेरणा दिली आणि हिंमतीने कॅन्सरसोबत लढण्यास स्फूर्ती दिली. तिने १२ केमोथेरपीची सत्रे आणि एक वर्ष रेडिएशन पूर्ण केले. कर्करोगावर कनिकाने मात केली.
कर्करोगावर मात केल्यानंतर तिने जेटसेटगो सुरू केले. तिने काही पैसे गुंतवत चार्टर्ड फ्लाइट बुक करण्यासाठी एक ॲप तयार केला. पहिली दोन वर्षे व्यवसाय चालवण्यासाठी ग्राहकांकडून आगाऊ रक्कम आणि विक्रेत्यांकडून उधारी घेतली. २०१४ मध्ये, व्यवसायाने चार्टर्ड अकाऊंटंट आणि ऑक्सफर्ड मॅनेजमेंट ग्रॅज्युएट असलेले सुधीर पेरला सह-संस्थापक म्हणून कंपनीत सामील झाले.
जेटसेटगोने १ लाख विमान प्रवाशांना सेवा दिल्या आणि ६००० उड्डाणे चालवली. यांमध्ये बहुतेक कॉर्पोरेट्स, सेलिब्रिटी, राजकारणी आणि इतर महत्त्वाच्या व्यक्तींचा समावेश होता. जेटसेटगो सहा आसनी ते १८ आसनी विमानापर्यंत चार्टर फ्लाइट्सची रेंज ऑफर करतात. दिल्ली-मुंबई, मुंबई-बंगळूरु आणि हैदराबाद-दिल्ली हे कंपनीचे सर्वाधिक उड्डाण करणारे क्षेत्र आहेत. त्यांची सुमारे पाच टक्के उड्डाणे वैद्यकीय आणीबाणीसाठी वापरली जातात, हे विशेष. कनिका विमान वाहतूक सल्लागार म्हणून देखील सेवा देते तसेच विमान खरेदी करू इच्छिणाऱ्या व्यक्तींना देखील व्यावसायिक सल्ला देते. आज जेटसेटगो दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि हैदराबाद येथे सुमारे २०० हून अधिक कर्मचारी आणि कार्यालयांसह ४२० कोटी रुपयांची उलाढाल करणारी कंपनी बनली आहे. कंपनीच्या ताफ्यात सध्या स्वतःची दहा विमाने आहेत.
कनिकाचा प्रवास कोणत्याही व्यक्तीसाठी प्रेरणादायी आहे. कर्करोगासारख्या जीवघेण्या आजारावर मात करून ४०० कोटी रुपयांची कंपनी उभारणे हे येरा गबाळ्याचे काम नक्कीच नाही. हे धाडस करणारी कनिका टेकरीवाल खऱ्या अर्थाने लेडी बॉस आहे.