Sunday, July 14, 2024
Homeताज्या घडामोडीकाँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष प्रतापराव भोसले यांचे निधन

काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष प्रतापराव भोसले यांचे निधन

सातारा : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री आणि काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष प्रतापराव भोसले यांचे त्यांच्या सातारा जिल्ह्यातील भुईंज गावी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९० वर्षांचे होते.

त्यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद व वेदनादायी आहे, अशा शब्दांत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भोसले यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे.

प्रतापराव भोसले यांचा राजकीय प्रवास सातारा जिल्ह्यातील भुईंज गावच्या सरपंचपदापासून सुरु झाला. वाई खंडाळा विधानसभा मतदारसंघातून त्यांनी चार वेळा विजय संपादन करुन राज्याच्या विधानसभेत प्रतिनिधित्व केले.

कॅबिनेट मंत्री म्हणून त्यांनी सातारा जिल्ह्याच्या विकासात मोठे योगदान दिले. त्यानंतर सातारा लोकसभा मतदारसंघातून १९८४, १९८९ आणि १९९१ अशा तीन लोकसभा निवडणुकीत विजय संपादन करुन ते लोकसभेत गेले. या काळात त्यांनी अनेक महत्त्वाच्या समित्यांवर काम केले.

१९९७ साली काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी त्यांची नियुक्ती झाली. त्यांच्या कार्यकाळात झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला विजय मिळवून देत राज्यात सत्ता आणली. प्रतापराव भोसले यांना पक्षाने जी जबाबदारी दिली ती त्यांनी समर्थपणे पार पाडली. संधीचे सोने करत त्या पदाला न्याय देण्याचे काम त्यांनी केले.

आपल्या कारकिर्दीत त्यांनी राजकारणाबरोबर कृषी, सहकार, शैक्षणिक क्षेत्रातही भरीव काम केले. शासनाच्या विविध योजना सातारा जिल्ह्यात राबवण्याचे काम त्यांनी केले. त्यांच्या निधनाने कधीही न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी भोसले कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे, असे नाना पटोले म्हणाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -