
- विशेष : लता गुठे
रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेली झाडे आणि त्यांच्या एकमेकांमध्ये गेलेल्या फांद्या यामुळे रस्त्यावर कायम सावली असायची. पण वाढत्या लोकसंख्येमुळे अनेक झाडांची बेसुमार तोड करण्यात आली आहे. पुढील काळात माणसाला सुसह्यपणे जगण्यासाठी मोठ्या प्रमाणात झाडांची लागवड करणे गरजेचे आहे. जमिनीचा टाहो कमी करण्यासाठी...‘वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे’ हा संत तुकाराम महाराजांचा अभंग, प्रत्येकाला वृक्षसंपदेचे महत्त्व पटवून देणारा आहे, तो अंगीकारायला हवा, तरच पुढील पिढ्या सुखाने, आनंदाने जगतील.
मागच्या आठवड्यात नगर जिल्ह्यामध्ये पाथर्डी येथे माहेरी जाऊन आले आणि एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, ती म्हणजे बाहेर पेटलेला उन्हाच्या आगीचा वणवा इतका जास्त होता की, दुपारी १२च्या नंतर गाडीतील एसीही काम करेनासा झाला. बाहेर ४१ °अंश तापमान होते. बाजूला नांगरलेली जमीन टाहो फोडत होती आणि रस्त्यांच्या बाजूला तुरळक उभी असलेली पानगळ झालेली झाडे उघड्या अंगाने असह्यपणे हुसासे टाकत होती. रस्त्याच्या बाजूला पसरलेली शहरे, इमारती, भरधाव वेगाने धावणाऱ्या गाड्या आणि रस्ता रुंदीकरणासाठी पूर्वी कापलेली मोठमोठी झाडे, वाढलेली प्रचंड उष्णता यांमुळे मृगजळाचा महापूर रस्त्यावर ओसंडून वाहत होता. हे सर्व पाहताना आईची ओवी आठवली...
उन्हाळ्याचं ऊन, झाडाला नाही पान
जंगल पाखराचं, उदास झालं मन
पानझड झालेली झुडपं उदासपणे उघड्या अंगाने उन्हात होरपळून निघाली होती. हे पाहताना मनात सारखा विचार येत होता... कधी माणसांचे डोळे उघडतील? पूर्वी रस्त्याच्या बाजूला मोठमोठी वडाची, पिंपळाची, लिंबाची झाडं असायची त्यामुळे रस्त्याने जाताना थंडावा जाणवायचा. यावर्षी महाराष्ट्रात पाऊस कमी पडल्यामुळे दुष्काळ आहे. नद्या, पाण्याचे पाणवठे आणि शेततळी कोरडी ठणठणीत झाली आहेत. शिरूरची घोड नदी ओलांडली आणि पुढे सुप्याच्या आसपास असलेले हिरवे शिवार पाहून जरा हायसं वाटलं. लगेच उष्णतेचा काटा खाली आला. जिथे पाणी, पाण्याखालची जमीन, आजूबाजूला असलेली हिरवीगार झाडं त्यामुळे उष्णतेचा परिणाम कमी जाणू लागला.
एक मोठं कापलेलं झाड पाहून, काही दिवसांपूर्वी कुठे तरी एक बातमी वाचलेली आठवली, ती बातमी अशी होती की, पुणे महानगरपालिकेकडून साधारण ३०० झाडांची कत्तल करण्यात येणार आहे. रस्त्यांचं रुंदीकरण आणि पार्किंग उपलब्ध करून देण्यासाठी या झाडांची कत्तल करण्यात येत असल्याचं महापालिकेकडून सांगण्यात आलं आहे. या बातमीचा विचार मनाला चटका लावून गेला. कित्येक वर्षांपासून उभी असलेली डेरेदार झाडं आणि ती कापल्यानंतर ओसाड होणारा परिसर या कल्पनेनेच अंगावर काटा आला आणि मुंबईमध्येही आजूबाजूला पाहिलं की, आपल्या लक्षात येतं, सर्रास होत असलेली झाडांची कत्तल. मान्य आहे की, आपल्याकडे प्रचंड प्रमाणात लोकसंख्या वाढत आहे, त्यावर काही कंट्रोल नाही. सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी इमारती, पूल आणि रस्ते रुंदीकरण होणे या गोष्टी प्रत्येक शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात केल्या जात आहेत. त्याबरोबरच तोडलेली झाडे परत लावली गेली आहेत का? त्याचे संगोपन आणि संवर्धन करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. आधीच जळण्यासाठी, फर्निचर, दरवाजे, खिडक्यांसाठी झाडे तोडली गेली आहेत. वन खात्याने डोंगर-पठारावर काही प्रमाणात झाडे लावली आहेत, ही जमेची बाजू आहे; परंतु प्रत्येक व्यक्तीने आपले कर्तव्य समजून शक्य होईल, तिथे झाडे लावायला हवीत. आणखी काही प्रमाणात शेततळे निर्माण होणे गरजेचे आहेत.
मी २००७ रोजी विलेपार्ले येथे राहायला आले. त्यावेळी मे महिन्यामध्येही भर दुपारी रस्त्याने चालताना, कधीही ऊन लागत नव्हते, कारण रस्त्याच्या दोन्ही बाजूला उंच वाढलेली झाडे आणि त्यांच्या एकमेकांमध्ये गेलेल्या फांद्या यामुळे रस्त्यावर कायम सावली असायची; परंतु आता उंच इमारतीची संख्या वाढत चालल्यामुळे, रस्ता रुंदीकरणाच्या कारणामुळे रस्त्याच्या बाजूची अनेक मोठमोठी झाडे तोडली गेली आहेत आणि पुन्हा झाडे लावण्यासाठी रस्त्याच्या बाजूला कुठेही जागा ठेवली नाही आणि जी झाडं उभी आहेत त्यांच्या मोठमोठ्या फांद्या वर्षातून दोन ते तीन वेळा कापल्या जातात. त्यामुळे झाडांचे फक्त शेंडे उरतात आणि कालांतराने अशी झाडे मृत पावतात. माझ्या घराच्यासमोर पिंपळाचं आणि गुलमोहराचं झाड आहे. या झाडाच्या मोठमोठ्या फांद्या तोडल्या की, मनाला वेदना होतात आणि हिरव्यागार फांद्यांची कटिंग करून, त्याची लाकडं ट्रकमध्ये भरून घेऊन जाताना पाहिलं की असं वाटतं, किती निर्दयपणे झाडांची कत्तल करून, त्याचे हात-पाय तोडून ही माणसे ट्रकमध्ये घालून घेऊन जात आहेत. या विचाराने माझ्यासारख्या सर्जनशील कवयित्रीच्या मनाला होणारी वेदना असह्य होते.
वाढणारी भरमसाट लोकसंख्या आणि लोकांना राहण्यासाठी प्रत्येक वर्षी हजारोंच्या संख्येने इमारती उभ्या राहतात. त्यामुळे सर्वच शहरांमध्ये सिमेंटची जंगल वाढली आहेत. रस्ता रुंदीकरण, गाड्यांची भरमसाट वाढ यांमुळे तापमानात प्रचंड प्रमाणात वाढ होत आहे. जर ही वाढ अशीच होत गेली, तर याचे परिणाम भविष्यामध्ये काय होतील, याचा आपण आज विचार केला नाही, तर आपल्या सर्वांनाच अशा नैसर्गिक आपत्तींना तोंड द्यावे लागेल... याचा विचार व्हायला हवा. फक्त विचारच नाही, तर ठोस पाऊल उचलायला पाहिजे.
‘झाडे लावा, झाडे वाढवा’, ‘पाणी आडवा पाणी जिरवा’ अशा घोषणा आपण फक्त देत आहोत; परंतु त्याची अंमलबजावणी किती प्रमाणात केली जाते? यावर मात्र विचार होत नाही. ग्रामीण भागामध्ये अजूनही याविषयी गांभीर्याने पाहिलं जात नाही, तिथे राहणाऱ्या लोकांचे विचारपरिवर्तन होत नाही. पिकांना विसावा नको म्हणून बांधावरची झाडं तोडली जातात. तिथे कोणताही नियम त्यांना लागू होत नाही. एक वर्षे पाऊस पडला नाही, तर किती प्रमाणात उष्णतेचा दाह वाढला आहे, याची जाणीव घराबाहेर पडल्यानंतर प्रकर्षाने होते. वरील कारणांचा हवामान आणि पृथ्वीच्या तापमानावर परिणाम होत आहे. यामुळे वातावरणात नैसर्गिकरीत्या निर्माण होणाऱ्या हरितगृह वायूंमध्ये प्रचंड प्रमाणात भर पडते, ज्यामुळे हरितगृह परिणाम आणि ग्लोबल वॉर्मिंग वाढते. याचा परिणाम माणसांच्या शरीरावरही मोठ्या प्रमाणात होत असतो.
माणसाच्या शरीरातील उष्णता वाढल्याने, रक्तदाब कमी होतो, त्यामुळे अनेकांना थकवा जाणवतो. काही माणसांच्या नाकातून रक्त प्रवाह वाहू लागते. तसेच अशक्तपणा येतो, अस्वस्थता निर्माण होते. शरीराची उष्णता वाढून, उष्माघाताने जीवावरही बेतू शकते, त्यामुळे याकडे दुर्लक्ष करू नये. ज्यांना उष्णतेचा त्रास आहे, त्यांना वारंवार अंगावर फोड येण्याची समस्या निर्माण होते. उघड्यावर राहणारे प्राणी, पक्षी मरतात. यावर आता प्रत्येकाने जाणीवपूर्वक विचार केला गेला पाहिजे आणि येणाऱ्या पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात झाडांची लागवड करायला हवी, तरच पुढील काळात माणसाला सुसह्यपणे जगता येईल.
डोळे उघड माणसा
ऐक माझं तू मागणं
पाहा जरा भुईकडं
टाहो फोडते जमीन
हा जमिनीचा टाहो कमी करण्यासाठी...
‘वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे’ हा संत तुकाराम महाराजांचा अभंग, प्रत्येकाला वृक्षसंपदेचे, वनसंपदेचे महत्त्व पटवून देणारा आहे, तो अंगी कारायला हवा, तरच पुढील पिढ्या सुखाने, आनंदाने जगतील.