- मनस्विनी : पूर्णिमा शिंदे
मरणाचे स्मरण असावे जन्म आणि मृत्यू सत्य, असत्य, दिवस-रात्र अमावस्या, पौर्णिमा, भरती-ओहोटी यासारखं निसर्गचक्रानुसार नियतीचे चक्र सुरूच असते. जन्म-मृत्यूचा फेरा कोणालाही चुकला नाही आणि कळला नाही. जीवन म्हणजे संघर्ष आलाच. संघर्ष म्हटला की, मानवी स्वभावाप्रमाणे षडरिपू आलेच. मानवी जीवनाची ही नाव पैलतीरी न्यायची असते आपली आपल्यालाच. मानवी शरीराचे, मनाचे नाते हे भौतिक, अधिक सुखाशी आहे. या सुखासाठी माणूस हा पराधीन झाला. स्वतःवरचा ताबा, भान सुटले आणि मानव हा अडचणीत आला. संघर्षाचे वर्म पचवता पचवता तो पापी झाला. पाप मग ते पंचेंद्रिय, कर्मेंद्रियातून होऊ लागले.
गांधीजींची एक गोष्ट आठवते. त्या गोष्टीतील तीन माकडे म्हणतात चांगले ऐका, चांगले बोला, चांगले पाहा. आज आपण आपल्या हातातील कोणत्याही गोष्टीचा अति तेथे माती असा वापर करतो. काही नाही केले तरीही कणाकणाने पापांचा संचय वाढतो. अभद्र बोलणे, मारणे, डिवचणे, भांडणे, अद्वातद्वा बोलणे, अश्लाघ्य भाषा हे सारे काही जीवन जगताना माणसाच्या हातून जाणते-अजाणतेपणे कर्म होतच असतं. कधी जाणून-बुजून, हेतू पुरस्कर होतं. तर कधी अनाहूतपणे. माणसाला आपल्या कर्माची जाणीव करून देण्यासाठी पाप-पुण्याचा हिशोब असतो. “कर्माज रिटर्न” म्हटलं जातं. निसर्गचक्रानुसार नियती ही आपण केलेल्या कर्माची आपल्याच हातांनी ओंजळ भरून आपल्याला परतफेड करत असते. म्हणून नेहमी मरणाचे स्मरण असावे. आपण जिथे जाऊ तिथे ज्या गोष्टी करू. त्या जीवनात आलेल्या प्रत्येक क्षणाक्षणाला विचारपूर्वक केलेली कृती ही आपल्याला आपल्या पाप पुण्यापर्यंत घेऊन जाते. उदा कोण! कसा ! कधी ! कुठे चुकला, वागला, कोणत्या व्यक्तीची काय चूक झाली? त्याचे परिणाम काय? अशा छोट्या गोष्टींमधून घडत जातं. मानवी जीवनामध्ये सुखदुःखाचे जीवन व्यतीत करताना जन्म झालेल्या माणसाचा मृत्यू अटळ असतोच. जन्माला आल्यानंतर त्याचे स्वभाव, व्यक्तिमत्त्व, कार्य यातून तो माणूस म्हणून कसा जगला हे गणलं जातं.
मोहम्मद पैगंबर यांची गोष्ट आहे. ते रोज ज्या घरासमोरून त्या वाटेवर एक स्त्री रोज कचरा फेकत असे. सतत कचरा फेकत असणारी स्त्री तीन-चार दिवस दिसत नाही आणि कचराही फेकत नाही. हे पाहून तेथील व्यक्तींना मोहम्मद पैगंबर विचारतात, त्या बाई कुठे आहेत? तेव्हा त्यांना समजलं की, त्यांना बरं नाही. त्या अंथरुणाला खिळलेल्या आहेत. म्हणून त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी मोहम्मद पैगंबर त्यांच्या घरी जातात. ती खूप ओशाळलेली असते की, मी इतकं रोज त्यांच्या अंगावर कचरा टाकते आणि हे मात्र मला भेटायला आलेले आहेत! या केलेल्या चुकीबद्दल माफी मागून ती त्यांची अनुयायी बनते. ते म्हणतात असे कसे? तुम्ही तर कचरा टाकून का होईना पण माझे स्वागत करत होतात! आणि तो कचरा जरी रोज टाकला तरी मला तो स्वागतासाठीच होता असे मोहम्मद पैगंबर म्हणाले.
गौतम बुद्ध एकदा झाडाखाली ध्यानस्थ बसले होते आणि त्यांचा तपस्या भंग करण्याचा प्रयत्न मुलांनी खेळताना केला. ज्या झाडाखाली बसले होते त्या झाडाला मुलांनी दगड मारला. तो दगड नेमका गौतम बुद्धांच्या कपाळाला लागला आणि रक्त वाहू लागले. तरी सुद्धा त्यांनी हसतच त्या मुलांचं स्वागत केले ते त्यांना ओरडले नाही. तुम्हाला काही हवं आहे का? असे विचारले. आपल्या रोजच्या जीवनात येणाऱ्या गोष्टीत आपण किती चिडतो, रागावतो, दुखावतो म्हणून माणसाने आपल्या या सर्व मानवी विकृतीचं आधी दफन केलं पाहिजे. मानवाने सर्वांना समजून घेण्याची कला शिकलं पाहिजे. कारण प्रत्येक गोष्टीचा शेवट असतो. तसा माणसाचाही शेवट आहेच आणि हे मृत्यू अंतिम अटळ सत्य.
एकदा एक मनुष्य एका विद्वानाकडे गेला आणि विचारलं माझं आयुष्य किती? तो म्हणाला सातच दिवस! सात दिवस तो माणूस अतिशय सुंदररीत्या, सदाचाराने, विवेकाने वागला. वाईट कृत्य, व्यसन केले नाही. बायका, मुलांना मारले नाही. सर्वांशी प्रेमाने वागला. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून त्या विद्वानाकडे पुन्हा धावत विचारायला आला. माझं आयुष्य सातच दिवस सांगितलेलं! मग आता सांग वर दोन दिवस उलटून गेले व माझा मृत्यू कधी? त्यावेळी त्या विद्वानाने असे उत्तर दिले की, तू माणूस म्हणून वागलास पण अविचाराने! जेव्हा तुझ्या मृत्यूचे स्मरण होते तेव्हा मात्र तू विवेकाने वागलास आणि जेव्हा विवेकाने वागलास तेव्हा तू चांगला वागलास! हे मरणाचे स्मरण करून देण्यासाठी तुला मी सात दिवस दिले होते. कसे वाटले तुला? तो माणूस म्हणाला खूप चांगले वाटले! आता मी असाच वागणार!! म्हणून विवेकाचे स्थान काय आहे?
विवेकाचे फळ ते सुख! अविवेकाचे फळ ते दुःख!! विवेक सांगतो. मी देह नाही, मन नाही, बुद्धी नाही, अहंकार नाही. मी आत्मा आहे या विवेकरूपाने संत आपणांस मोक्ष प्राप्तीकडे घेऊन जातात. माया म्हणजे काय तर मायेचं गाठोडं सुटता सुटत नाही. ती चंचल असते. भोवळ आल्यासारखी, कावीळ झाल्यासारखी दिसते. ती दिसते खरी पण ती नाश पावते. मनाला सत्य वाटते पण ती सदैव खोटी असते. सद्वस्तू म्हणजे परब्रह्म. हे दिसत नाही पण असते खरे आणि ते कधीच नाश पावत नाही.
“जन्म-मृत्यू यापासून सुटला या नाव जाणिजे मोक्ष झाला” मृत्यूच्या कचाट्यातून जो सुटला त्यास मोक्ष मिळाला. असेच खरे! म्हणून माणसाने माणसाशी माणसासारखे वागावे आणि मरणाचे स्मरण असावे हेच खरे!