Tuesday, July 2, 2024
Homeताज्या घडामोडीCloudburst : अरे बाप रे! मे महिन्यात इतका पाऊस कसा झाला? हवामान...

Cloudburst : अरे बाप रे! मे महिन्यात इतका पाऊस कसा झाला? हवामान विभागालाही पडला प्रश्न

चिपळूणात ढगफुटी, अडरे गावात अर्ध्या तासात रेकॉर्डब्रेक पाऊस, नद्या दुथडी भरुन वाहू लागल्या

चिपळूण : राज्यातील अनेक भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वादळी वा-यांसह जोरदार पाऊस होताना दिसत आहे. परंतु, चिपळूणमध्ये रविवारी अर्धा तास ढगफुटीसदृश मुसळधार पाऊस (Cloudburst) झाला. या पावसाचे व्हिडिओ समोर येत आहेत. मे महिन्यात पाण्यासाठी वणवण करावी लागत असताना या पावसाने अडरे, अनारी परिसरातल्या नद्या दुथडी भरुन वाहत आहेत. चक्क मे महिन्यात इतका पाऊस कसा झाला, असा प्रश्न हवामान विभागाला देखील पडला आहे.

सह्याद्री भागातील गावांमध्ये पडलेला हा मुसळधार पाऊस चर्चेचा विषय बनला आहे. मुसळधार पावसामुळे नद्या प्रवाहित झाल्यामुळे गावातील पुलाचे काम करण्यासाठी आणलेले साहित्य देखील या पाण्याच्या प्रवाहातून वाहून गेले. जुलै मध्ये ज्या प्रमाणात पाऊस पडतो त्या प्रमाणात पाऊस इथल्या ग्रामस्थांनी मे महिन्यात अनुभवला. या गावातील पाण्याने तुडुंब भरुन गेलेली शेतं आणि दुथडी भरुन वाहणा-या नद्यांचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत.

अडरे आणि अनारी या गावांमध्ये अचानक इतका पाऊस कसा झाला, याविषयी हवामान खात्याकडून अद्याप कोणतेही स्पष्टीकरण आलेले नाही. हवामान खात्याने राज्याच्या अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला होता. परंतु, चिपळूणमध्ये अवघ्या अर्ध्या तासात प्रमाणाबाहेर पाऊस झाला आहे.

दरम्यान, भारताच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असलेले नैऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सून अंदमानात दाखल झाल्याची घोषणा हवामान खात्याकडून आता केव्हाही होऊ शकते. नैऋत्य मान्सून मालदीव, कोमोरिनच्या काही भागात आणि बंगालच्या उपसागराच्या काही भागासह निकोबार बेटे आणि दक्षिण अंदमानच्या समुद्रात दाखल झाले आहेत.

गेल्या २४ तासांत निकोबार बेटांवर मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला आहे. त्यामुळे मान्सून दक्षिण अंदमानच्या समुद्रात दिलेल्या वेळेत दाखल झाल्याचे मानले जात आहे. त्यामुळे आता नियोजित वेळेनुसार सर्वकाही पार पडल्यास ३१ मे रोजी केरळात मान्सून दाखल होण्याचा अंदाज आहे. त्यानंतर ७ जूनपर्यंत मान्सून तळकोकणात दाखल होईल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -