- कोकणी बाणा : सतीश पाटणकर
मुंबई शहरात अनेक पर्यटन स्थळे, प्राचीन, प्रसिद्ध मंदिरांचा वारसा लाभला आहे. मलबार टेकडीवर वसलेले प्राचीन शिवमंदिर म्हणजे बाबुलनाथ मंदिर होय. मुंबईतील उंच शिवमंदिर म्हणून या मंदिराची ख्याती आहे. मंदिराच्या आतील आवारात केवळ शिवाचीच नाही, तर गणपती, पार्वती आणि मारुती यांचीही छोटेखानी मंदिरे आहेत. या मंदिराचे नाव बाबुलनाथ दिले, कारण टेकडीवर बाभळीचे झाड होते, या झाडाखालीच हे मंदिर बांधण्यात आल्याचे आख्यायिकेमध्ये सांगितले आहे.
मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. तसेच मुंबई शहराला महाराष्ट्राची राज्य राजधानी म्हणून ओळखले जाते. याशिवाय हे शहर जगातील एक प्रमुख पर्यटनस्थळ आहे. या शहरात अनेक प्रसिद्ध पिकनिक स्पॉट पाहायला मिळतात. खरं तर शहरात पर्यटकांसाठी अनेक प्रसिद्ध ठिकाणे आहेत. शिवाय शहरात अनेक प्राचीन आणि प्रसिद्ध मंदिरे आहेत. मुंबईमध्ये असलेल्या अनेक शिवमंदिरांपैकी एक असलेले रम्य आणि देखणे शिवालय म्हणजे बाबुलनाथ. मलबार हिलवर वसलेले हे प्राचीन शिवमंदिर म्हणजे मुंबईचा ऐतिहासिक वारसा. १७८० मध्ये या ठिकाणी मंदिर उभारण्यात आले. हे मंदिर बांधण्याच्या वेळी ही जागा मुंबईतील पारशी समुदायाकडे होती. पारशी समुदायाचा मंदिर उभारण्यास तीव्र विरोध होता. शेवटी न्यायालयात हे प्रकरण गेल्यानंतर या मंदिराचा मार्ग मोकळा झाला. १८९० मध्ये बडोद्याचे सयाजीराव गायकवाड आणि काही गुजराती व्यापाऱ्यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. पुढे मुंबईतील उंच शिवमंदिर म्हणून या मंदिराची ख्याती वाढली आणि भाविकांची गर्दी होऊ लागली. आजही दर सोमवारी या मंदिरात भक्तगणांचा ओघ वाढलेला असतो.
भक्तगणांचा सतत येथे वावर असतो. श्रावण महिना, महाशिवरात्र आणि अन्य महत्त्वाच्या धार्मिक दिवशी येथे भाविकांच्या रांगाच रांगा पाहायला मिळतात. गिरगाव चौपाटीजवळून जाणाऱ्या बाबुलनाथ रोडवरून या मंदिराकडे जाता येते. मलबाल हिलवर असलेल्या या मंदिरामध्ये जाण्यासाठी पायऱ्या आहेत. तत्पूर्वी मंदिराकडे जाण्यासाठी लागणारे प्रवेशद्वार अतिशय भव्य व सुंदर आहे. काळ्य़ा पाषाणातील या प्रवेशद्वारावर सुंदर नक्षीकाम केलेले आहे.
पायऱ्या चढून वर गेल्यावर मंदिराचा मोठा सभागृह लागतो. सभागृहाचे खांब आणि मंदिर अतिशय सुंदर असून नक्षीकामाने भरलेले आहे. अनेक देव-देवतांच्या मूर्ती मंदिराच्या खांबावर कोरलेल्या आहेत. हे संगमरवरी मंदिर नागर स्थापत्यकलेचा नमुना समजले जाते. मंदिराच्या आतील आवारात केवळ शिवाचीच नाही, तर गणपती, पार्वती आणि मारुती यांचीही छोटेखानी मंदिरे आहेत. मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात प्रवेश केल्यावर, बाबूलनाथाचे शिवलिंग दिसते. या शिवलिंगावर सतत दही व दुधाचा अभिषेक सुरू असतो. हे तीर्थ गोमुखातून बाहेर पडते आणि ते घेण्यासाठी भाविकांची सतत झुंबड उडत असते.
या मंदिराचे नाव बाबूलनाथ का पडले, याबाबत बऱ्याच आख्यायिका आहे. मात्र या टेकडीवर बाभळीचे झाड होते, या झाडाखालीच हे मंदिर बांधण्यात आल्याने, ‘बाबुलनाथ’ असे बोलले जाते. या मंदिरातील शिवलिंग आणि मूर्ती या बाराव्या शतकातील म्हणजे राजा भीमदेवच्या काळातील आहेत. त्याकाळी येथे छोटेखानी मंदिर होते, मात्र काळाच्या ओघात ते जमिनीत गाडले गेले. १८व्या शतकात येथे उत्खनन करण्यात आले आणि तिथे काळ्य़ा दगडातील शिवलिंग आणि मारुती, गणपती, पार्वती यांच्या मूर्ती सापडल्या. तिथे आणखी एक पाचवी मूर्ती सापडली होती, मात्र उत्खननादरम्यान ती भंग पावल्याने, तिचे समुद्रात विसर्जन करण्यात आले.
(लेखक मुख्यमंत्र्यांचे माजी माहिती अधिकारी आहेत)