- क्राइम : अॅड. रिया करंजकर
देशामध्ये आज बिकट परिस्थिती चालू आहे. सुशिक्षित बेरोजगारी वाढत असून, नोकरीच्या शोधासाठी अनेक बेरोजगार शहराच्या दिशेने वाटचाल करत आहेत. अनेक तरुणांना योग्य मार्गदर्शन न मिळाल्याने, व्यसनाच्या आहारी जाण्याचे प्रमाण वाढले आहे. व्यसनासाठी काहीही करण्याची तयारी या तरुणांची असते. बाहेरच्या प्रांतातून आलेले हे लोक मुंबईमध्ये रेल्वेच्या पटरीच्या बाजूला झोपड्या बांधून राहू लागले आहेत. बेरोजगारी, व्यसनाधीनतेमुळे तरुणांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. पैशासाठी ही लोकं कुठल्याही थराला जायला तयार असतात. या तरुणांचा घोळका अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. तसेच ब्रीजच्या आडोशाला तरुण किंवा गर्दुल्ले आडोशाला थांबलेले असतात. अनेक वेळा सिग्नल लागल्यामुळे ट्रेन स्लो होतात किंवा थांबलेल्याही असतात. ट्रेनमध्ये गर्दी असल्यामुळे ट्रेनच्या प्रवेशद्वारावर काही लोकं उभी असतात, त्यांच्या हातात मोबाइल किंवा गळ्यामध्ये, हातामध्ये मौल्यवान दागिने असतात आणि त्याचाच फायदा हे गर्दुल्ले उचलतात आणि चोऱ्या करून प्रसार होतात.
रेल्वेने सुरक्षिततेसाठी रेल्वे पोलीस महिलांच्याही डब्यामध्ये तैनात असतात. अशाच प्रकारे एका रेल्वे पोलिसाने आपली ड्युटी संपवून, रेल्वेनेच आपल्या घरी जायला निघाले होते. ते रेल्वेच्या दरवाजाजवळ उभे राहून, आपला मोबाइल बघत होते. पोलिसांची ड्युटी संपल्यामुळे, ते पोलिसांच्या गणवेशामध्ये नव्हते. त्यांनी सिव्हिल युनिफॉर्म घातला होता. त्यामुळे ते पोलीस आहेत, हे कोणाच्याही लक्षात येत नव्हतं. सिग्नलमुळे ट्रेन स्लो झाली आणि त्याच वेळी ब्रीजच्या आडोशाला बसलेल्या गर्दुल्ल्यांपैकी एकाने पोलिसाच्या हातावर फटका मारला. त्यामुळे त्यांच्या हातात असलेला मोबाइल खाली पडताच, तो मोबाइल घेऊन गर्दुल्ला पळत सुटला. ट्रेन स्लो असल्यामुळे पोलिसांनी उतरून, त्या चोराचा पाठलाग केला असता, तो जवळच्याच असणाऱ्या झोपडपट्टीत शिरला. त्या ठिकाणी अगोदरच त्याचे साथीदार जमा झाले होते. त्यात त्या पोलिसाची आणि गर्दुल्ल्याच्या साथीदारांची झटापट सुरू झाली आहे.
त्याचवेळी त्यांच्यातील एकाने त्या पोलिसाला मागून इंजेक्शन मारलं. इंजेक्शन मारल्यावर पोलीस बेशुद्ध झाले आणि त्यांच्या तोंडात काही तरी टाकण्यात आले. हे सर्व गर्दुल्ले तो मोबाइल घेऊन, तिथूनही प्रसार झाले. तेथील काही लोकांनी या पोलिसाला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आणि तीन दिवस ते मृत्यूशी झुंज देत होते. तिसऱ्या दिवशी गर्दुल्ल्याने मारलेल्या इंजेक्शनमुळे त्या पोलिसाचा मृत्यू झाला. आपण पोलीस आहोत आणि त्या गर्दुल्ल्याला आपण पकडू असा विचार त्या पोलिसाने केला होता, पण त्यांना माहीत नव्हतं की, पुढे आपल्यासाठी काय वाढून ठेवलेले आहे. ज्यांनी त्यांच्यावर हल्ला केला, त्याने इंजेक्शन मारलं त्यालाही माहीत नव्हतं की, सामान्य माणूस आहे की पोलीस आहे. किमती वस्तूंसाठी गर्दुल्ले जीवाशी खेळतात. त्या १५,००० किंवा २०,००० च्या एका मोबाइलसाठी हे गर्दुल्ले कोणाच्याही जीवाची पर्वा करत नाहीत.
एका मोबाइलसाठी एका पोलिसाने आपला जीव मात्र गमावला. या गर्दुल्ल्याला मात्र आयुष्यभराची शिक्षा मिळाली, कारण आपण ज्यांच्याबरोबर जे काय करतोय, ते पोलीस आहेत, याचीच कल्पना नव्हती.
चोरीतून मिळणाऱ्या पैशासाठी स्वतःचं कुटुंब पोसता येतं, स्वतःचं व्यसन करता येतं, पण त्याच्या या कृत्यामुळे एका कुटुंबाचा आधार ही लोकं हिरावून घेतात, याचं त्यांना भान नसतं. व्यसनाधीन झालेली पिढी सर्रासपणे पटरीच्या आजूबाजूला दिसत असून, दिवसातून एकदा तरी ही लोकं ट्रेन स्लो झाल्यावर दरवाजावर उभे असलेल्या लोकांच्या हातावर फटका मारून बॅग, मोबाइल, किमती वस्तू चोरणे असे प्रकार सर्रास घडतात. तसेच आपण विरोध केला, तर त्यांच्याजवळ असलेल्या धारदार वस्तूंनी धमकावण्याचा प्रयत्न करतात. अशा व्यक्तींपासून सावध राहणे गरजेचे आहे. अशी व्यक्ती समोरच्याचा जीवही घ्यायला मागे-पुढे बघत नाहीत.
(सत्यघटनेवर आधारित)