Wednesday, May 14, 2025

महामुंबईब्रेकिंग न्यूजराजकीयमहत्वाची बातमी

उद्धव ठाकरे डरपोक, पराभव दिसू लागल्याने डोक्यावर परिणाम झाल्यामुळे निराधार आरोप; आशिष शेलारांचे टीकास्त्र

उद्धव ठाकरे डरपोक, पराभव दिसू लागल्याने डोक्यावर परिणाम झाल्यामुळे निराधार आरोप; आशिष शेलारांचे टीकास्त्र

  • आधी त्यांनी ईव्हीएम मशीनच्या नावाने बोंबा ठोकल्या

  • मग मतांच्या टक्केवारीवर प्रश्नचिन्ह उभे केले

  • आता बोटाच्या शाईवरून निराधार आरोप करणे हा चक्क पळपुटेपणा


मुंबई : लोकसभा निवडणुकीचे (Lok Sabha Elections) राज्यातील चार टप्पे पार पडले आहेत. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांकडून काही मतदारसंघात पैसे वाटप केल्याचा आरोप केला आहे. ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी देखील काही मतदारसंघात मतदारांच्या बोटाला आधीच शाई लावली जाते, असा आरोप केला. त्या आरोपाला आता भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.


आशिष शेलार यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी बोलताना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केले. यावेळी उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेविषयी विचारले असता ते म्हणाले की, उद्धव ठाकरेंसारखा निवडणुकीला घाबरणारा दुसरा डरपोक माणूस मी पाहिला नाही. आधी त्यांनी ईव्हीएम मशीनच्या नावाने बोंबा ठोकल्या. ईव्हीएम मशीनच्या विरोधात सुप्रीम कोर्टात गेले. तो विषय संपत नाही, तोच ज्या भागात निवडणुका झाल्या आहेत, तिथल्या मतांच्या टक्केवारीवर प्रश्नचिन्ह उभे केले. आता बोटाच्या शाईवरून आरोप करायला लागले. आपला निवडणुकीतला पराभव स्पष्ट दिसत असल्याने उद्धव ठाकरे निराधार विधानं करत आहेत. निराधार आरोप करणे हा पळपुटेपणा आहे, अशी टीका शेलार यांनी केली.


शिवसैनिकांवर हात उचलणाऱ्या पोलिसांचं काय करायचं हे मी सत्ता आल्यावर बघुन घेईन, असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला होता. त्यावर बोलताना शेलार म्हणाले की, बघुन घेईन म्हणजे काय? उद्धव ठाकरेंना ही दडपशाहीची भाषा शोभत नाही. उद्धव ठाकरेंची भाषा म्हणजे, चोर मचाये शोर, अशी टीका शेलारांनी केली.


मोदीजी उद्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही नकली म्हणतील. आता आरएसएसलाही धोका आहे. भाजप आरएसएसवरही बंदी आणेल, असे वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केले. त्याविषयी विचारले असता शेलार म्हणाले की, मला वाटते की, उद्धव ठाकरे नुसते भ्रम पसरण्याचे काम करत आहे. आम्ही सगळ्या संस्था वैचारिक दृष्ट्या एक आहोत. मात्र आमची कार्यपद्धती वेगळी आहे. आमचे रुप विश्वरूप दर्शनासारखे आहे. त्यामुळे काहींच्या डोक्यावर परिणाम झाला आहे, असा खोचक टोला शेलारांनी लगावला.

Comments
Add Comment