Tuesday, December 10, 2024
Homeसाप्ताहिकरिलॅक्समिळून सारे ‘आनंदयात्री...!’

मिळून सारे ‘आनंदयात्री…!’

  • राजरंग : राज चिंचणकर

महाराष्ट्रातल्या विविध वृद्धाश्रमांत अनेक ज्येष्ठ मंडळी त्यांचे जीवन व्यतित करत आहेत. अनेकविध कारणांनी या मंडळींना वृद्धाश्रमांत पाऊल टाकावे लागते. या मंडळींसाठी वृद्धाश्रमांत जीवनाला पूरक अशा सोयी-सुविधा असल्या, तरी त्यांना गरज असते ती जिव्हाळा, आपुलकी आणि गप्पा रंगवण्यासाठी कुणाच्या तरी सोबतीची! ‘आपली माणसे’ दुरावली असली, तरी वृद्धाश्रमांतल्या सोबतच्या मित्रमंडळींसह हे सर्व जण आयुष्य जगत असतात. या मंडळींकडे समाजातले काही घटक मात्र सामाजिक बांधिलकी म्हणून लक्ष देत असतात आणि त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होत असतात.

अशा मंडळींच्या जीवनात आनंद फुलवण्यासाठी ‘आपण आनंदयात्री प्रतिष्ठान’ हा परिवार कटिबद्ध आहे. समाजातल्या ज्येष्ठ मंडळींच्या जीवनात आनंदाचे क्षण यावेत, या हेतूने कला व सांस्कृतिक व्यासपीठाच्या माध्यमातून हा परिवार कार्यरत आहे. दरवर्षी प्रतिष्ठानचे कार्यकर्ते विविध वृद्धाश्रमांतल्या मंडळींना एकत्र आणत, त्यांच्याकडून सांस्कृतिक कलाविष्कार सादर करून घेत असतात. समाजाचे आपण काही देणे लागतो, याची जाणीव ठेवत हा परिवार नाट्य, संगीत, खेळ अशा माध्यमातून ज्येष्ठ मंडळींना आनंद देण्याचा प्रयत्न करत असतो. पण केवळ ‘कार्यक्रम पाहून’ त्यांना आनंद मिळवून देणे इतकाच यामागचा उद्देश नसतो; तर या ज्येष्ठ मंडळींना त्यात प्रत्यक्ष सहभागी करून घेत, त्यांच्यातल्या सुप्त कलागुणांना व्यासपीठ मिळवून देण्याचे महत्त्वाचे कार्यही हा परिवार करत असतो. सध्याच्या एकूणच जगरहाटीच्या पार्श्वभूमीवर, या परिवाराने सांस्कृतिक व सामाजिक भान ठेवत घेतलेला हा वसा दखल घेण्याजोगा आहे. कला व सांस्कृतिक क्षेत्राच्या मुख्य प्रवाहात या मंडळींना आणून, त्यांच्यात आनंद तरंग फुलवण्याचे कार्य याद्वारे होत आहे.

या उद्दिष्टांच्या अंतर्गत वृद्धाश्रमांतल्या मंडळींसाठी दरवर्षी ‘आनंदोत्सव आनंदयात्रींचा’ या आनंद सोहळ्याचे आयोजन या परिवाराकडून करण्यात येत असते. या सोहळ्यात मुंबई आणि मुंबईच्या जवळच्या परिसरातील अनेक वृद्धाश्रमांतल्या मंडळींमध्ये दडलेले सुप्त कलागुण सर्वांना अनुभवता येतात आणि त्यांच्यातले हे गुण सांस्कृतिक विश्वाला आगळे परिमाण मिळवून देतात. गेली ७ वर्षे ‘आपण आनंदयात्री प्रतिष्ठान’ मे महिन्यात एखादे नाट्यगृह घेऊन हा आनंदोत्सव साजरा करत असते. मुंबईसह पालघर, पनवेल, कर्जत ते जुन्नरपर्यंतच्या विभागातली ज्येष्ठ मंडळी यात त्यांचे सादरीकरण करतात. या आनंदोत्सवात ते अगदी एखाद्या सणासाठी सजावेत तसे नटूनथटून येतात आणि पूर्ण दिवस हा कलेचा उत्सव आनंदात साजरा करतात. यंदा रविवार, १९ मे रोजी दादर-माटुंगा कल्चरल सेंटर येथे पूर्ण दिवस ही मंडळी हा सोहळा साजरा करणार आहेत.

‘आनंदोत्सव आनंदयात्रींचा’ या विषयी बोलताना ‘आपण आनंदयात्री प्रतिष्ठान’चे संस्थापक अध्यक्ष प्रमोद सुर्वे सांगतात, “हा एक असा प्रवास आहे, ज्यात सगळे फक्त आणि फक्त आनंदी राहतात. काही काळापूर्वी, सर्व जण सोबत असतानाही मी स्वतः एका फेजमध्ये एकाकी आणि भीतीयुक्त जीवन जगत होतो. प्रत्येक गोष्टीत निराशा दिसत होती. हळूहळू त्यातून बाहेर आल्यावर जाणवले की, सर्व जण सोबतीला असतानाही येणारा एकाकीपण जर इतका विदारक असेल, तर खरोखरच एकाकी असणाऱ्या व्यक्ती कसे जगत असतील? यातून मनात विचार आला की, जे लोक एकाकी पडल्याच्या मानसिक अवस्थेत आहेत, त्यांना आनंद देण्याचे कार्य सुरू करायचे. मग मी, उदय दरेकर, अभय चव्हाण, माधुरी करंडे, अविरत साळवी, सुनील खोबरेकर, विजय कोळवणकर, उदय मोहिते आदी ‘बेस्ट’ उपक्रमातल्या कलाकार मंडळींना मी सोबत घेतले. त्यातून वेगवेगळ्या वृद्धाश्रमांना भेट द्यायला आम्ही सुरुवात केली. आमच्या लक्षात आले की, त्या लोकांना कलेच्या सान्निध्यात आनंद मिळतोय. मग आम्ही त्यांच्यातले कलाकार उभे करायला लागलो. वर्षभरात २०० ते २५० आई-बाबा विविध कलांच्या माध्यमातून सर्व दुःख विसरून त्यात रमायला लागले. पुढे आम्ही आमचा आवाका वाढवला. महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या वृद्धाश्रमांत जाऊन, कलानंद कसा घ्यायचा याचे आम्ही त्या लोकांना प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली. आज ५० आनंदयात्री या कामात कार्यरत आहेत. दर महिन्याला वेगवेगळ्या वृद्धाश्रमांत जाऊन, विविध सण त्यांच्या कलेच्या सादरीकरणातून साजरे करत, त्यांच्यासोबत आम्हीही आनंदी क्षण जगत असतो.”

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -