Thursday, July 18, 2024
Homeसंपादकीयतात्पर्यहोर्डिंग माफियांना आवर घाला!

होर्डिंग माफियांना आवर घाला!

रवींद्र तांबे

दिनांक १३ मे, २०२४ रोजी सायंकाळी ४.३०च्या सुमारास वादळी वाऱ्यामुळे घाटकोपर पूर्वेकडील द्रुतगती मार्गालगत असलेल्या पेट्रोल पंपाच्या बाजूला लावलेले महाकाय होर्डिंग पेट्रोल पंपावर कोसळले. या दुर्घटनेत आतापर्यंत १७ लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. म्हणजे अनेक लोकांना आपल्या जीवाभावाची माणसे गमवावी लागली आहेत. आता धुसफूस करून काय उपयोग? त्यासाठी आता होर्डिंग माफियांना आवर घालावा लागेल. या दुर्घटनेत जवळजवळ ८५ पेक्षा जास्त लोक जखमी झाले असून अनेक मोठमोठ्या गाड्यांचे नुकसान झाले आहे.

बृहन्मुंबई महापालिकेने ४० बाय ४० फुटांची होर्डिंग मुंबईतील घाटकोपरमधील छेडानगर परिसरात लावण्याची परवानगी दिली होती. तर मग १२० बाय १२० फुटांची होर्डिंग लागली कशी? ती सुद्धा २५० टन वजनाची. होर्डिंग लावल्यानंतर ४० फूट आहे की १२० फूट आहे हे कुणीच पाहिले नाही का? परवानगी दिली असेल, तर होर्डिंग लावल्यानंतर होर्डिंगची पाहणी झाली का? या प्रश्नांची उत्तरे राज्यकर्त्यांना शोधावी लागतील. कारण त्यांचे प्रतिनिधित्व राज्यकर्ते करीत असतात. असे जर झाले असते तर आज १७ निष्पाप नागरिकांना आपल्या जीवाला मुकावे लागले नसते. त्यांची चूक तर काय पेट्रोल पंपावर गाडीत पेट्रोल भरायला आले ही चूक? या दुर्घटनेचा त्रास परिसरातील नागरिकांना सुद्धा झाला आहे. याचा विचार होणे आवश्यक आहे. तेव्हा प्रशासनाला केवळ परवानगी देऊन चालणार नाही, तर त्यावर योग्य नियंत्रण असायला हवे. त्यासाठी आता राज्यात ज्या ठिकाणी होर्डिंग लावण्यात आलेले आहेत त्यांची तपासणी पावसाळ्यापूर्वी प्रशासनाला करावी लागेल. अजून पावसाळा सुरू झालेला नाही. तेव्हा राज्यातील प्रत्येक नगर/महानगरपालिकेला सतर्क राहावे लागणार आहे.

ज्या ठिकाणी दुर्घटना घडली त्या ठिकाणी ६ मे रोजी मी प्रत्यक्षात संध्याकाळी जाऊन पाहणी केली. पेट्रोल पंपाच्या बाजूला होर्डिंग लावण्यात आले होते. मात्र त्याचा पाया मजबूत न केल्यामुळे वादळाच्या जोरामुळे ते होर्डिंग उन्मळून पडले. वरती चकाचक दिसत असले तरी पक्के बांधकाम केलेले दिसत नव्हते. साध्या दगडांची भरणी केलेली होती. होर्डिंगचा दोन्ही बाजूला धोका होता. होर्डिंग विरुद्ध बाजूला पडली असती तर बाजूची हिरवळ पायदळी तुडविली गेली असती. सेवक वर्ग त्या ठिकाणच्या गाड्यांच्या काचांचा खच बाजूला करीत होते तसतसे त्या खालील साचलेले रक्त दिसत होते. तेवढेच अग्निशामक दलाचे जवान त्यावर पाणी मारत होते. हे पाहून माझ्या डोळ्यांत पाणी आले. अजून बरेच काम बाकी असले तरी या घटनेचा हादरा पोलीस वसाहतीतील रहिवाशांना झाला आहे. अजून तेवढ्याच उंचीच्या पोलीस वसाहतीच्या बाजूला दोन होर्डिंग आहेत. त्यातील एक पेट्रोल पंपाच्या बाजूला असून त्यावर जाहिरात लावण्यात आलेली आहे. तर एक खूपच मोडकळीस आलेली होर्डिंग दिसत आहे. मुख्य म्हणजे रस्त्याच्या पलीकडे माता रमाबाई नगर आहे. त्यामुळे हे ठिकाण म्हणजे नागरिकांचे वर्दळीचे ठिकाण आहे.

आता प्रत्येक होर्डिंगची तपासणी केली जाईल. त्यात तपासणी करताना तज्ज्ञ व्यक्तीची निवड करून त्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येईल. त्यानंतर समिती अभ्यास करून शासनाला पाहणी अहवाल सादर करेल. तेव्हा आपण सर्वांनी या दुर्घटनेचा गांभीर्याने विचार केला पाहिजे. कोणतेही काम कायदेशीरपणे व्हायला हवे. जर काम चुकीच्या पद्धतीने झालेले असेल, तर त्याला कायदेशीररीत्या आळा घालायला हवा. आळा घातला असता तर अशी दुर्दैवी घटना घडली नसती. तेव्हा कोणीही कायद्याच्या चाकोरीच्या बाहेर जावून काम करू नये. यात निष्पाप जीवांचा बळी जातो. आता जरी शासनाने आर्थिक मदत केली तरी होर्डिंग माफियांवर कायदेशीर कारवाई होणे आवश्यक आहे. त्याचबरोबर संबंधित विभागाने परवानगी दिली असेल, तर त्यांच्यावर सुद्धा कारवाई व्हायला हवी. कारण ना हरकत प्रमाणपत्र त्यांनी दिलेले असेल त्याची फी सुद्धा घेतली असेल. त्यामुळे त्यांच्या अखत्यारीत येत असल्यामुळे त्यावर नियंत्रण असायला हवे. जर त्यांचे नियंत्रण असते तर आज पेट्रोल पंपावर अशी दुर्घटना घडली नसती. म्हणजे होर्डिंग माफियावाले जेवढे या दुर्घटनेला जबाबदार आहेत तेवढेच परवानगी देणारे आहेत. त्याचबरोबर जाहिरात लावणारे सुद्धा जबाबदार आहेत.

पेट्रोल पंपावरील दुर्घटनेत मदत कार्य करणाऱ्या एनडीआरएफचे जवान, पोलीस दल, अग्निशामक दलाचे जवान, महानगरपालिकेचे सेवक, स्थानिक नागरिक, समाजसेवक आणि इतर यांनी जी मेहनत घेतली त्यामुळे अनेक नागरिकांचे जीव वाचले आहेत. तेव्हा असे प्रकार होऊ नयेत यापेक्षा अशा घटना घडतातच कशा याचा विचार होणे आवश्यक आहे.
पेट्रोल पंपावरील एकच खांबा होर्डिंगच्या कचाट्यातून सुटला आहे. त्या खांबावर “भारत पेट्रोलियम” एवढीच ओळख पेट्रोल पंपाची शिल्लक राहिली आहे. आता जरी मुंबईतील घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेमुळे पंतनगर पोलीस ठाण्यात पेट्रोल पंपाचे मालक भावेश भिंडे व जाहिरात कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात आला तरी या दुर्घटनेने अनेक नागरिकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. खेदाची बाब म्हणजे, यातील प्रमुख आरोपी भावेश भिंडे यांना राजस्थानमधील उदयपूर येथून गुरुवारी अटक करण्यात आली तरी या दुर्घटनेत निरपराध नागरिकांना आपल्या जीवाला मुकावे लागले याचे काय? या दुर्घटनेचा राज्यातील सुजाण नागरिकांनी विचार करणे आवश्यक आहे. तेव्हा अशा होर्डिंग माफियांना आवर घालण्यासाठी महाराष्ट्र राज्याच्या प्रशासनाला कायदेशीरपणे कारवाई करावी लागेल. तरच होर्डिंग माफियांना आवर बसेल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -