- फिरता फिरता : मेघना साने
इस्रायलमधील घनघोर युद्धाच्या बातम्या ऐकून माझे अंत:करण तीळतीळ तुटत आहे. २०१० आणि २०११ साली मी इस्रायलमध्ये कार्यक्रमाच्या निमित्ताने गेले होते, तेव्हा तेथे शांतता होती. मी मुक्तपणे त्या देशात फिरू शकले होते. तेथे ‘मायबोली’ मासिकाने साजरा केलेला महाराष्ट्र दिन कायमचा स्मरणात कोरून आले होते.
इस्रायलमध्ये ३०,००० हून अधिक मराठी भाषिक आहेत, असं सांगितलं तर खरं वाटणार, नाही एखाद्याला. पण धर्माने ज्यू असलेली ही मंडळी मराठीला मायबोली मानतात आणि मराठीचा मोठा उत्सव साजरा करतात. अनेक पिढ्या कोकणात राहिल्यानंतर कोकणातून इस्रायलमध्ये स्थलांतरीत झालेली ही मंडळी महाराष्ट्रात असताना मराठीत बोलत होती. कारण ती सर्व मराठी शाळेत शिकलेली आहेत. महाराष्ट्राने आम्हाला प्रेम दिले. जगातील इतर देशांनी ज्यू लोकांचा छळ केला होता. परंतु महाराष्ट्रात आम्हाला स्वातंत्र्य होते आणि आमचे सणही साजरे करायचो. असे तेथील नागरिक मला सांगत होते.
इस्रायलमधील ज्यू मराठी लोकांनी मराठी भाषेच्या छताखाली एकत्र यायचे ठरवले. सुरुवातीला मासिक छापण्याचे प्रयत्न झाले. पण छापण्याचे तंत्र तेवढे विकसित नव्हते म्हणून सुरुवातीला लेख हाताने लिहून, त्या लेखांचे झेरॉक्स काढणे वगैरे प्रकार झाले. नागेश सोगावकर हे इस्रायलचे जणू साने गुरुजीच! त्यांनी स्वतःच्या हस्ताक्षरात पुस्तके लिहून त्याच्या प्रती बेने इस्रायलींना पुरवल्या. ‘याद’ मासिकाचेही ते संपादक होते. हळूहळू आणखी मासिके निघत गेली. त्यापैकी ‘याद’, ‘पारिजात’, ‘शालोम’, ‘गुब्बासेर’, ‘अंकुर’ ही फारशी तग धरून राहिली नाहीत. १९८५ साली नोहा मस्सीलसारख्या कवी, लेखक व्यक्तिमत्त्वाने पुढाकार घेतला आणि ‘मायबोली’ त्रैमासिक आकाराला आले. फ्लोरा सॅम्युअल यांच्यावर संपादनाची जबाबदारी सोपवून, मासिकाची सजावट नोहा करीत. डेव्हिड कांदळकर, आयझॅक आवासकर, मोझेक चांडगावकर, पेसाह चेरीकर यांची ‘मायबोली’च्या वाटचालीत फार महत्त्वाची भूमिका होती. ‘मायबोली’ नावारूपाला आले. तसेच रेचल गडकर संपादित ‘शैली’ मासिकही गेली दोन दशके सुरू आहे. सध्या इस्रायलमधून ‘मायबोली’ हे मराठी त्रैमासिक निघते. ठाण्यातील विवेक मेहेत्रे यांच्या उद्वेली बुक्सतर्फे अंकाची मांडणी, संपादन व छपाई होते. त्याच्या प्रती इस्रायलला रवाना केल्या जातात.
२०१० साली ‘मायबोली’च्या पन्नासाव्या अंकाचे प्रकाशन आणि ‘मायबोली’तर्फे मराठी जनांचे संमेलन ५ मे रोजी इस्रायलमध्ये आयोजित केले होते. रामले येथील हेखॉल तरतूद हॉल येथे हा समारंभ इस्रायलमधील सरकारी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आणि त्यांच्या मदतीने आयोजित केला होता. सरकारी अधिकाऱ्यांची हिब्रू भाषेत भाषणे झाल्यानंतर मायबोलीचे संपादक नोहा मस्सिल यांनी महाराष्ट्र दिनावर भाषण करून खड्या आवाजात ‘महाराष्ट्र गीत’ गायले. टाळ्यांच्या कडकडाट झाला, तेव्हा मी भानावर आले. इस्रायलमध्ये अस्खलित मराठीत हे गीत आपण चालीसकट ऐकत आहोत, यावर माझा विश्वास बसत नव्हता.
महाराष्ट्र दिनाच्या या कार्यक्रमात पोवाडा, लावणी असे कार्यक्रम स्थानिक कलाकारांनी सादर केले. जेवणाच्या मध्यंतरानंतर मी माझा ‘कोवळी उन्हे’ हा एकपात्री कार्यक्रम सादर केला. या कार्यक्रमाला ४०० ज्यू मंडळी उपस्थित होती. त्यांना मराठी कथा, कविता कळत होत्या. ‘कोवळी उन्हे’चे कार्यक्रम मी दहा वर्षं करतच आले होते.
पण येथेही योग्य त्या ठिकाणीच दाद मिळत होती. इस्रायलमध्ये एकपात्री कार्यक्रम सादर करणारी, मी महाराष्ट्रातील पहिली महिला आहे.
२०११ साली मी व माझे पती हेमंत साने पुन्हा आमंत्रित होतो. ‘नाते सुरांचे मायबोलीचे’ हा मराठी गाण्यांचा आमचा कार्यक्रम घेऊन, आम्ही तिथे गेलो होतो. या कार्यक्रमात मराठी गाण्यांव्यतिरिक्त बंगाली, गुजराती, मल्याळी गाण्यांची झलकही हेमंत साने सादर करणार होते. तालमीच्या वेळी ऑर्गनवाले म्हणाले, “कोणी हिब्रू गाण्याची फर्माईश केली तर?” आम्ही तयारीला लागलो. नोहा मस्सील यांनी देवनागरीत शब्द लिहून दिले. ऑर्गनवाल्याकडून हेमंत साने यांनी हिब्रू गाण्याची चाल शिकून घेतली. दुसऱ्या दिवशी मराठी गाण्यांचा कार्यक्रम रंगला. मी निवेदन करीत होते. विविध भाषांतील गाण्यांचा आयटम सुरू झाला आणि खरोखर हिब्रू गाण्याची फर्माईश झाली. हेमंत साने यांनी तेथील लोकप्रिय हिब्रू गीत सादर करून टाळ्या घेतल्या.
आमचा दौरा आठवडाभराचा होता आणि त्यात तीन कार्यक्रम होते. महाराष्ट्र दिनाचा कार्यक्रम झाला. त्यानंतर १४ मेला इस्रायलचा स्वातंत्र्य दिन होता. त्याच्या पूर्वसंध्येला देशात आबालवृद्ध एकत्र येऊन लढाईत आजवर शहीद झालेल्या योद्ध्यांना आदरांजली देतात. इस्रायलमध्ये १८ वर्षांवरील प्रत्येक मुलामुलीला तीन वर्षं तरी सैनिकी शिक्षण अनिवार्य आहे. यामुळे काही घरातील तरुण मुलेही लढाईत हुतात्मा झालेली असतात. त्यामुळे स्वातंत्र्य दिनाच्या आदल्या दिवशीच्या कार्यक्रमात तेथील मंत्री अशा दुःखी झालेल्या पालकांना भेटतात. त्यांच्या दुःखात सामील होतात. त्यानंतर रात्री ९ नंतर सुरू होतो, स्वातंत्र्य दिनाचा उत्सव. या उत्सवासाठी आमचा ‘नाते सुरांचे मायबोलीचे’ हा कार्यक्रम घेऊन आम्ही तेथे गेलो होतो. रामले, नमस्कार हॉटेल आणि एलात मिळून तीनही कार्यक्रमांत एक सांगण्यासारखी गोष्ट घडली. कार्यक्रमाचे अखेरीस भारताचे राष्ट्रगीत गायले गेले आणि त्यानंतर हिब्रू भाषेत इस्रायलचे राष्ट्रगीत गायले गेले. आणखी एक. आमच्या‘दिल की आवाज’या हिंदी मराठी गीतांच्या कार्यक्रमात ‘तू गंगा की मौज मै जमुना का धारा’ या ‘बैजू बावरा’मधील गीताला तिन्ही कार्यक्रमांत वन्स मोअर आला. वास्तविक हे गीत भैरवी रागातील होते, तरी रसिकांच्या आग्रहास्तव हेमंतने ते पुन्हा गायले.