Tuesday, July 9, 2024

मी एकलव्य… 

  • टर्निंग पॉइंट : युवराज अवसरमल

ज्येष्ठ अभिनेत्री निर्मिती सावंत यांचा सुपुत्र अभिनय सावंत याने मनोरंजनाच्या क्षेत्रात आपले करिअर करण्याचा निर्धार पक्का केला आहे. त्याची एक नवीन वेबसीरिज येणार आहे.  अभिनयचे शालेय शिक्षण दादरच्या पोर्तुगीज चर्चजवळील अवर लेडी ऑफ सलवेशन  बॉईज स्कूल येथे झाले. शाळेमध्ये ऑपेरा कार्यक्रमात  अल्लाउद्दीनचा दिवा सांभाळणारा जीन त्याने साकारला होता. महाराष्ट्र राज्य शासनाच्या नाट्य स्पर्धेत ‘डबल क्रॉस’ नावाचे नाटक त्याने केले होते, त्यामध्ये अपहरण केलेल्या लहान मुलाची भूमिका त्याने केली होती. नेहरू सायन्स सेंटरच्या ‘कल्पना एक आविष्कार अनेक’ या उपक्रमातून देवेंद्र पेमच्या  एकांकिकेमधून  त्याने  काम केले. अकरावी, बारावी त्याने सेंट झेवियर्स कॉलेजमधून केले. त्यानंतर त्याने बी. एम. एस. हा कोर्स सिद्धार्थ कॉलेजमधून केला. ‘गंगुबाई नॉन मॅट्रिक’ मालिकेसाठी त्याने अनेक कथा सुचवल्या. ‘ही पोरगी कोणाची’ या चित्रपटासाठी व कॉन्स्टेबल कामना कामतेकर या मालिकेसाठी त्यांने कार्यकारी निर्माता म्हणून काम केले.  त्याने संकलनाचे काम शिकून घेतले, केवळ निरीक्षणाने तो संकलन शिकला. एखादी गोष्ट एकलव्यासारखी शिकण्याची त्याची वृत्ती पुढे वाढतच गेली आणि यामुळे अनेक नव्या गोष्टी त्याने आत्मसात केल्या. ‘ही पोरगी कोणाची’ या चित्रपटाच्या वेळी त्याच्या मेकिंगच्या वेळी त्याने संकलनाचे कार्य केले. नंतर त्याने शॉर्ट फिल्म केली.

त्यानंतर त्याने एमपीएससी, यूपीएससीचा अभ्यास करण्यास सुरुवात केली. त्यावेळी तो पूर्णपणे मनोरंजन क्षेत्रापासून दूर गेला होता. दिल्लीला जाऊन त्याने यूपीएससीची  परीक्षा दिली होती. त्यानंतर त्याच्या जीवनात टर्निंग पॉइंट आला, ‘श्रीमंत दामोदर पंत’ या चित्रपटांमध्ये त्याला भूमिका करण्याची संधी मिळाली. मोहन नावाची व्यक्तिरेखा साकारण्याची संधी त्याला मिळाली. त्यामध्ये सोनू निगमने गायलेल्या गाण्यावर अभिनय करण्याची संधी त्याला मिळाली. गाणे होते- ‘मॅचिंग मॅचिंग नवरा’ पाहिजे. या चित्रपटाचे दिग्दर्शक केदार शिंदे  व  कलावंत भारत जाधव यांच्याकडून भरपूर त्याला शिकायला मिळाले. त्यानंतर ‘अकल्पित’ नावाचा चित्रपट  त्याने केला. त्यामध्ये स्क्रिझोफेनिया मनोरुग्णाची भूमिका त्याने साकारली होती. त्यावेळी  त्याचे वय २५ वर्षे होते आणि त्या चित्रपटांमध्ये ४० वयाच्या मनोरुग्णाची भूमिका साकारण्याचे आव्हान त्याच्यापुढे होते. त्या चित्रपटांमध्ये रेणुका शहाणे, मोहन आगाशे, निर्मिती सावंत, अतुल तोडणकर हे कलावंत होते. त्या

नंतर ‘नकटीच्या लग्नाला यायचं’ या झी वाहिनीवरील मालिकेत त्याने काम  केले. त्यामध्ये विनोदी भूमिका साकारण्याची संधी त्याला मिळाली. या मालिकेमुळे तो  घराघरात पोहोचला. उषा प्रवीण गांधी या फिल्म्स स्कूलसाठी त्यांने एक  इंग्लिश चित्रपट लिहिला व दिग्दर्शित  केला. या इंग्लिश चित्रपटाला चांगलाच प्रतिसाद मिळाला. हा चित्रपट त्या फिल्म स्कूलमध्ये बेस्ट स्क्रीनप्ले म्हणून दाखविला जातो. नंतर त्याने ‘देवा शप्पथ‘ या मालिकेमध्ये मनुष्यरुपी हनुमानाची भूमिका साकारली. त्यानंतर त्याने सोनी वाहिनीवरील ‘नवरी मिळे नवऱ्याला’ ही मालिका केली. ही मालिका प्रचंड गाजली. त्यामध्ये उदय आल्हादराव भालेराव ही विनोदी व्यक्तिरेखा  साकारण्याची संधी त्याला मिळाली. त्यामध्ये त्याच्यासोबत देविका दप्तरदार, किशोर कदम हे कलावंत आहेत. या चित्रपटाचा  सिनेमाटोग्राफर तेजस ओक होता. जर्मनीमध्ये सिनेमॅटोग्राफरचा कोर्स करण्यासाठी तो तेथे गेला होता, तेव्हा त्याला या चित्रपटाचे लेखक व दिग्दर्शकाकडून शिफारस पत्र हवे होते व ते देताना अभिनयला खूप आनंद झाला. त्याच्या कामाची दखल  घेतल्याचा त्याला गर्व वाटला. एक नवीन वेबसीरिज तो लिहून दिग्दर्शित करणार आहे. तसेच चित्रपट व मालिकेच्या निर्मिती क्षेत्रात देखील उतरण्याचा त्याचा मानस आहे, त्याच्या या भविष्याच्या वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -