Wednesday, March 19, 2025
Homeताज्या घडामोडीKolhapur news : मुलाला वाचवताना तिघांचा नदीत बुडून मृत्यू! कोल्हापुरात घडली भीषण...

Kolhapur news : मुलाला वाचवताना तिघांचा नदीत बुडून मृत्यू! कोल्हापुरात घडली भीषण दुर्घटना

हसन मुश्रीफांनी घटनेची दखल घेत तातडीने आर्थिक मदत करण्याच्या दिल्या सूचना

कोल्हापूर : कोल्हापुरातून (Kolhapur) एक भीषण दुर्घटना समोर आली आहे. बुडत असलेल्या भाच्याला वाचवण्याच्या नादात मामा, मामाची मुलगी आणि मामाची बहिण असे तिघेजण नदीत उतरले. परंतु नदीचा प्रवाह प्रचंड असल्याने बुडणार्‍या मुलासकट तिघांचाही नदीत बुडून मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणी तिघांचे मृतदेह सापडले असून भाच्याचा अजूनही शोध घेतला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूर जिल्ह्यातील कागल (Kagal) तालुक्यातील बस्तवडेमध्ये वेदगंगा नदीवर (Vedganga River) असणाऱ्या बंधाऱ्यात बुडून चौघांचा मृत्यू झाला. शाळकरी मुलाला वाचवण्याच्या नादात एकमेकांना मिठी मारल्याने हा भयंकर प्रकार घडला. जितेंद्र विलास लोकरे (वय ३६, रा. मुरगूड ता. कागल), त्याची बहीण रेश्मा दिलीप येळमल्ले (वय ३४), भाचा हर्ष दिलीप येळमल्ले (वय १७, दोघे रा. अथणी, कर्नाटक) आणि मामाची मुलगी सविता अमर कांबळे (वय २७ रा. रुकडी, ता. हातकलंगले) अशी त्यांची नावे आहेत. तिघांचे मृतदेह गावकऱ्यांनी शोधून काढले आहेत. हर्षचा शोध काल रात्री नऊ वाजेपर्यंत सुरुच होता. आज पुन्हा रेस्क्यू पथकाकडून शोध घेतला जाणार आहे.

नेमकं काय घडलं?

आणूर गावच्या जत्रेसाठी हे सर्वजण जमले होते. काल दुपारच्या सुमारास ते वेदगंगा नदीकडे गेले होते. काळम्मावाडी धरणाचे पाणी वेदगंगा नदीत सोडल्याने नदीतील पाण्याचा प्रवाह मोठा होता. कपडे धुण्यासाठी आणि आंघोळीसाठी नदीत उतरले असतानाच हर्ष खोल पाण्यामध्ये बुडाला. आरडाओरडा करण्यात आल्यानंतर शेजारी असणारा मामा जितेंद्र पाण्यात उतरला. पाठोपाठ रेश्मा, साधना व सविता सुद्धा उतरल्या. मात्र, पाण्याचा प्रवाह मोठा असल्याने भीतीपोटी मिठी मारल्याने ते नदीत बुडाले.

चौघे बुडताना काठावर असलेल्या जितेंद्र लोकरे यांच्या मुलीने पाहिल्याने आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. यावेळी मासे पकडण्यास आलेल्या अवधूत यांनी गावातील प्रमोद पाटील यांना बोलावून नदीत उडी मारली. साधना लोकरे यांना वाचवण्यात त्यांना यश आलं. मात्र, इतर तिघांचा मृत्यू झाला. तिघांचे मृतदेह त्यांनी काठावर आणले. हर्षला शोधण्याचे काम सुरू होते. मात्र रात्रीपर्यंत त्याचा मृतदेह न सापडल्याने आज पुन्हा एकदा शोधमोहीम हाती घेतली जाणार आहे.

हसन मुश्रीफांनी घेतली घटनेची दखल

दरम्यान, परदेशवारीवर असलेल्या वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी या घटनेची तातडीने दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी संपर्क साधला. तसेच कागलच्या तहसीलदारांशी सुद्धा संपर्क साधला. मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून या सर्व मृतांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळण्यासाठी तातडीने प्रस्ताव करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे व तहसीलदार अमरदीप वाकडे यांना दिल्या आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -