
कारण सांगताच घरचेही अवाक
नवी दिल्ली : 'तारक मेहता का अलटा चष्मा' या लोकप्रिय मालिकेतून घराघरात पोहोचलेले अभिनेते गुरुचरण सिंग गेल्या अनेक दिवसांपासून बेपत्ता होते. त्यांच्या वडिलांनी याबाबत दिल्ली पोलिसांत तक्रार नोंदवली होती. त्यानंतर पोलिसांनी वेगाने तपासकार्य सुरु केले. सीसीटीव्ही फुटेज, गुरुचरण यांच्या मोबाईलचे लोकेशन अशा अनेक गोष्टींमार्फत शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. पोलिसांनी 'तारक मेहता का अलटा चष्मा'च्या सेटवर जाऊन सर्व कलाकारांचीही चौकशी केली. मात्र, त्यांचे वेतन थकवले असल्याचीही कोणती समस्या नव्हती. त्यामुळे पोलिसांच्या हाती काहीच धागेदोरे लागत नव्हते. मात्र, आज अचानक तब्बल २५ दिवसांनंतर बेपत्ता गुरुचरण सिंग आपल्या घरी परतले आहेत. त्यांनी बेपत्ता झाल्याचे कारण सांगितल्यानंतर घरचेही अवाक झाले आहेत.
गुरुचरण सिंग घरी परतल्यानंतर पोलिसांनी त्याची चौकशी केली. पोलिसांना त्यांनी सांगितलं की, "मी संसारिक जीवन सोडून धार्मिक प्रवासाला निघालो होतो. दरम्यान, मी अमृतसर, नंतर लुधियाना आणि इतर अनेक शहरांतील गुरुद्वारांमध्ये बरेच दिवस राहिलो. तेव्हा मला वाटलं की आपण घरी परतावे. त्यामुळे मी घरी परतलो."
२२ एप्रिल रोजी गुरुचरण सिंग घरातून निघाला होते. मात्र ते बेपत्ता झाल्याची बातमी २६ एप्रिल रोजी समोर आली. त्यानंतर त्यांच्या वडिलांनी आपल्या मुलाबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुचरण २४ एप्रिलपर्यंत दिल्लीत जाणार होते. यानंतर त्यांचा मोबाईल बंद झाला.
'तारक मेहता का उल्टा चष्मा' मुळे मिळाली लोकप्रियता
'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेतील रोशन सिंग सोढी या भूमिकेमुळे गुरुचरण सिंग यांना विशेष लोकप्रियता मिळाली. २००८-२०१३ पर्यंत ते या शोचा भाग होते. यानंतर त्यांनी शोचा निरोप घेतला. त्यांच्या लोकप्रियतेमुळे त्यांना शोमध्ये परत बोलावण्यात आले. पण २०२० मध्ये गुरुचरण यांनी पुन्हा वडिलांची काळजी घेण्यासाठी 'तारक मेहता का उल्टा चष्मा' सोडला होता, असं म्हटलं जातं.