मुंबईकरांच्या विकासाला कौल देणारी निवडणूक

Share

सोमवारी २० मे रोजी मुंबई शहरातील सहा लोकसभा मतदारसंघांसाठी मतदान होणार आहे. सहा लोकसभा मतदारसंघांसाठी महायुतीने तसेच महाविकास आघाडीने आपली राजकीय प्रतिष्ठा पणाला लावल्याचे गेल्या काही दिवसांपासून पाहावयास मिळत आहे. भाजपाकडून पंतप्रधान मोदींसह केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नारायण राणे, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यापासून भाजपाचे पदाधिकारी, स्थानिक भागातील नेतेमंडळी, त्यांच्या जोडीला एकनाथ शिंदेंची शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी, राज ठाकरेंची मनसे, तसेच महायुतीतील इतर संघटना मुंबईमध्ये प्रचाराची राळ उठवत आहेत. दुसरीकडे उबाठा सेना, काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी प्रचाराची जबाबदारी सांभाळताना मुंबई पिंजून काढत आहेत. मुंबईसह ग्रामीण भागातील तीन आणि ठाणे, कल्याण, भिवंडी, पालघर अशा राज्यातील तेरा लोकसभा मतदारसंघांत सोमवारी मतदान होत असून या मतदानानंतर राज्यातील निवडणूक टप्पा पूर्णपणे संपुष्टात येणार आहे.

भाजपाच्या नेतेमंडळींच्या कानाकोपऱ्यांतील प्रचारसभा, रोड शो पाहिल्यावर ‘अब की बार, चारसो पार’ भाजपा व त्यांच्या मित्र मंडळींनी गांभीर्याने घेतलेले पाहावयास मिळत आहे. ही निवडणूक महायुती तसेच महाआघाडीसाठी प्रतिष्ठेची असल्याने कधी नव्हे ती देशामध्ये प्रथमच लोकसभेची निवडणूक अटीतटीची होत असल्याचे पाहावयास मिळत आहे. महायुतीला नरेंद्र मोदी यांना सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवायचे असल्याने प्रत्येक जागा ते गांभीर्याने लढवत असल्याचे देशभरात पाहावयास मिळाले आहे. महायुतीच्या प्रचारसभांमधील भाषणांमध्ये विकासाच्या मुद्द्यांवर भर दिला जात असून दहा वर्षांमध्ये मोदी सरकारने काय विकासकामे केली आहेत? सत्ता मिळाल्यावर कोणत्या कामांना प्राधान्य दिले जाणार आहे, याची माहिती जनतेसमोर सादर केली जात आहे. दुसरीकडे महाआघाडीकडे बोलण्यासारखे काही नसल्याने केवळ व्यक्तिगत टीका करण्यावरच त्यांच्याकडून भर दिला जात असल्याने अरे आता तरी विकासावर, देशातील प्रकल्पांवर बोला रे, असे सांगण्याची वेळ आलेली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यावर चिखलफेक करण्याशिवाय महाविकास आघाडीच्या वक्त्यांकडून फारसे काही बोलले जात नसल्याने जनतेलाही मतदान कोणाला करावे, हेही एव्हाना कळून चुकले असणार. गद्दार, खोके, खंजीर हे शब्द वारंवार कानावर पडल्याने मतदारही या प्रकाराला आता एव्हाना कंटाळले असणार. देशाचे नेतृत्व कोणी करावे, देशाचा कारभार कोणी चालवायचा हा निर्णय घेणारी ही निवडणूक आहे. हा काही भावबंदकीतला वादाचा विषय नाही, व्यक्तिगत आरोप करायला हे काही कोणाच्या घरातील वाटप नाही, हेही महाआघाडीला समजत नसल्याचा सूर आता सर्वसामान्यांकडून आळविला जाऊ लागला आहे. मुळातच या मोदी सरकारच्या दहा वर्षांच्या काळात केलेल्या विकासकामांची यादी आहे. मोदी राजवटीत कोणत्याही केंद्रीय मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झालेले नाहीत अथवा कोणालाही तुरुंगवारी करावी लागलेली नाही, याचेही मतदारांना निश्चितच मतदान करण्यापूर्वी अवलोकन करावे लागणार आहे. याउलट महाआघाडीतील अनेक नेत्यांना तुरुंगवारी करावी लागलेली आहे. भ्रष्टाचारात अनेकांचे हात अडकल्याचे ईडी चौकशीत स्पष्ट झालेले आहे.

महायुतीचे वक्ते सर्रासपणे महाविकास आघाडीतील नेतेमंडळींच्या भ्रष्टाचारावर खुलेआमपणे बोलत असताना महाआघाडीकडून याला प्रत्युत्तर न देता केवळ व्यक्तिगत चिखलफेक करण्याचा एककलमी कार्यक्रम राबविण्यात येत आहे. मुळात आपला पक्ष का फुटला, पक्षासाठी रक्त आटवणारी, जीवाचे रान करणारी माणसे संघटनेला नाही तर आपल्याला सोडून का गेली? याचे आत्मपरीक्षण करण्याची वेळ आता पवार-ठाकरेंवर खऱ्या अर्थाने आलेली आहे; परंतु ते घडलेल्या घटनेपासून बोध न घेता या गोष्टींचे खापर भाजपावर फोडत असल्याचे पाहिल्यावर ‘आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी’ असा प्रकार पवारांच्या राष्ट्रवादीकडून आणि उबाठा सेनेकडून गेल्या काही महिन्यांपासून सतत सुरू आहे. मुळात कार्यकर्ते अथवा पदाधिकारी सोडून गेले तर एकवेळ समजण्यासारखे आहे.

राजकीय महत्त्वाकांक्षा, तिकीट नाकारणे, सत्तेतील पद न मिळणे अशा कारणांमुळे कोणी सोडून गेले तर तेही लोकांना समजण्यासारखे आहे; परंतु आपल्या घरातील पुतण्या, सख्खा भाऊ, भावजय, चुलत भाऊ असे एकामागोमाग एक आपणाला सोडून जातात, तीन-साडेतीन दशके पक्षवाढीसाठी घरदार सोडून सतत कार्य करणारे मातब्बर सोडून जातात आणि ते एकटेदुकटे नाही तर सर्वाधिक संख्येने निघून जातात, आपल्याला जवळची माणसेच नाही तर आपला पक्ष, आपले निवडणूक चिन्हही गमवावे लागले आहे. सर्व चुकीचे आणि आपणच बरोबर असा ठेका पवार-ठाकरेंकडून चालविला जात आहे. पक्ष व पक्षचिन्ह तसेच जवळचे सहकारी, घरातील सदस्य गमवावे लागल्याबाबत कोणताही शोध व त्यातून बोध घेण्यास पवार-ठाकरे आजही तयार नाहीत.

कोव्हिड काळातील भ्रष्टाचार असो अथवा बंगल्यांचा विषय, साखर कारखान्यांचा विषय यासह अनेक मुद्द्यांवर महायुतीकडून प्रचारादरम्यान आरोप केले जात असताना महाआघाडीकडून त्यावर कोणतेही उत्तर दिले जात नाही. महाआघाडीच्या अनेक नेत्यांची ईडी चौकशी सुरू आहे. लोकसभा निवडणुकीनंतर ऑक्टोबर महिन्यात महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघांत ३६ विधानसभा मतदारसंघाचा समावेश होत असून त्यालगतचे ठाणे, भिवंडी, कल्याण, पालघर मतदारसंघांची बेरीज केल्यास एमएमआर क्षेत्रातील तब्बल ६० विधानसभा मतदारसंघांतील मतदारांचा कल या मतदानातून स्पष्ट होणार आहे. मतदार राजा डोळे उघडे ठेवून प्रचारातील घडामोडी पाहत असणार. मतदारांना नक्कीच देशाचा विकास हवा आहे. राजकीय चिखलफेकीतून एकवेळ मनोरंजन होऊ शकते, देशाचा विकास नाही. ज्यांच्याकडे विकासाचे व्हिजन आहे, मतदारही त्यांचीच पाठराखण करणार, हे स्पष्ट आहे. बाकी मनोरंजन करायला राजकीय सारीपाटातील बाकीची मंडळी आगामी काळातही प्रामाणिकपणे काम करतच राहतील, यात काही शंका नाही.

Recent Posts

Ranjeet Nimbalkar : राहुल गांधींनी पंढरपुरच्या वारीत कॅट वॉक करायला येऊ नये!

यांचा वारीतला सहभाग केवळ राजकीय फायद्यासाठी भाजपाच्या माजी खासदारांची विरोधकांवर बोचरी टीका सोलापूर : आषाढी…

11 mins ago

Nitesh Rane : गुजरातच्या बसवर टीका करणारा मविआचा नेता अदानींचा खास ड्रायव्हर!

आमदार नितेश राणे यांचा रोहित पवारांना अप्रत्यक्ष टोला कोणाची बुद्धी लहान याबाबत राहुल गांधी आणि…

42 mins ago

Hathras Stampede : हाथरस चेंगराचेंगरी प्रकरणातील भोलेबाबाचा गलिच्छ प्रकार उघडकीस!

भोलेबाबा करायचा दुधाची अंघोळ; खीर बनवून वाटला जायचा प्रसाद लखनऊ : काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशच्या…

1 hour ago

Pune Crime : पैसे परत न केल्याने शिक्षित डॉक्टरने कोयता हाती घेत केला तरुणाचा खून!

गुंडांच्या साथीने पुण्यात डॉक्टरचे भयानक कृत्य पुणे : पुण्यात सातत्याने चित्रविचित्र गुन्हेगारीच्या घटना (Pune Crime)…

3 hours ago

Pune porsche accident : अखेर धनिकपुत्राने लिहिला ३०० शब्दांचा निबंध!

बालहक्क मंडळाकडे वकिलांमार्फत केला सादर पुणे : पुण्यातील कल्याणीनगर भागात एका अल्पवयीन मुलाने मद्यधुंद अवस्थेत…

3 hours ago

Accident News : भीषण अपघात! मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गावर तीन वाहनांची जोरदार धडक

तिन्ही गाड्यांचा चक्काचूर; एकाचा जागीच मृत्यू पुणे : सध्या अनेक मार्गांवर मोकळा रस्ता दिसताच वाहनचालक…

3 hours ago