Friday, July 5, 2024
Homeनिवडणूक २०२४LS Election : शिवतिर्थावर आज ‘मोदी-राज’ अवतरणार!

LS Election : शिवतिर्थावर आज ‘मोदी-राज’ अवतरणार!

मुंबई : मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार (LS Election) करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची दादरमधील शिवाजी पार्कवरील मैदानात शुक्रवारी, सायंकाळी प्रचारसभा आयोजित करण्यात आली आहे. या प्रचारसभेत पंतप्रधान मोदी व राज ठाकरे हे महाआघाडीचा कसा समाचार घेतात, काय तोफ डागतात, याची उत्सुकता मुंबईकरांसह ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली व सभोवतालच्या उपनगरातील रहीवाशांना लागून राहीली आहे.

गुरुवारी कल्याण-डोंबिवली, ठाणे व अन्यत्र अवकाळी पाऊस पडल्याने शुक्रवारी महायुतीच्या शिवाजी पार्कवरील सभेवर अवकाळीचे सावट निर्माण झाले आहे. मुंबईतील या प्रचारसभेसाठी भाजपा, शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी, मनसे व महायुतीतील इतर राजकीय मित्र संघटनांकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. मातोश्रीपासून शिवाजी पार्क अवघ्या काही अंतरावर तसेच शिवसेना भवनापासून हाकेच्या अंतरावर असल्याने पंतप्रधान मोदी व मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे इंडिया आघाडी व उबाठा सेनेचे कसे वस्त्रहरण करतात, याचीच राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे.

शुक्रवारी शिवाजी पार्कवर महायुतीची सांगता सभा पार पडणार आहे. दरम्यान, उद्याच्या शिवाजी पार्कमधील महायुतीच्या सभेला तिन्ही पक्षांचे नेते उपस्थित राहणार आहेत. काल पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रॅलीमध्ये अजित पवार उपस्थित नव्हते, पण शुक्रवारी होणाऱ्या सभेला मात्र अजित पवार हजेरी लावणार असल्याचे महायुतीच्या नेत्यांकडून सांगण्यात येत आहे.

शिवसेनेला दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान गेली दोन वर्षे मिळाले नव्हते. त्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या प्रचारसभेत बोलताना, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोणते गौप्यस्फोट करणार आहेत, यावरही राजकीय चर्चा सुरु झालेली आहे. ही निवडणुक महायुतीसाठी प्रतिष्ठेची असल्याने लोकसभेच्या मुंबईतील सहाही मतदारसंघातील मतदारांवर या सभेचा प्रभाव पडणार असल्याने सभेसाठी महायुतीकडून जय्यत तयारी गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. कडेकोट पोलीस बंदोबस्त शिवाजी पार्क परिसरात असून गर्दीचा उच्चांक या सभेला होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -