वंचितच्या प्रकाश आंबेडकरांची टीका
मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवारी पुन्हा एकदा महाविकास आघाडीच्या नेत्यांवर निशाणा साधला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे हे धर्मवादी नेते आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे धर्मनिरपेक्षवादी नव्हे तर संधीसाधू नेते आहेत, असा दावा आंबेडकर यांनी केला.
प्रकाश आंबेडकरांनी शुक्रवारी एका मराठी वृत्तवाहिनीशी संवाद साधताना उपरोक्त दावा केला. ते म्हणाले की, शरद पवार हे धर्मनिरपेक्ष असल्याचा खोटा दावा केला जातो. ते धर्मनिरपेक्ष अर्थात सेक्युलर नाहीत. मी स्वतः त्यांना सेक्युलर मानत नाही. ते संधीसाधू आहेत. याचप्रमाणे शिवसेना नेते उद्धव ठाकरे हे धर्मवादी आहेत हे आता उघड झाले आहे, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.
खासगीकरणाच्या माध्यमातून मागासवर्गीयांच्या नोकऱ्या घालवण्याचा प्रकार सुरू असल्याचा आरोपही प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी केला. खासगीकरणाच्या माध्यमातून येथील मागासवर्गीयांच्या आणि वंचितांच्या नोकऱ्या हिरावून घेतल्या जात आहेत. खासगीकरण कशासाठी हवे आहे? मालमत्ता लोकांची आहे आणि ती लोकांचीच राहिली पाहिजे हे सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे, असे ते म्हणाले.
मुंबईत निवडणुकीचा तमाशा सुरू
सध्या लोकसभा निवडणुकीचा तमाशा सुरू आहे. त्यात बाप एका पक्षात आहे, तर पोरगा दुसऱ्या पक्षातून निवडणूक लढवत आहे. सत्ता आपल्या कुटुंबातून जाऊ नये अशी ही परिस्थिती आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाची महाविकास आघाडीशी युती असल्याचा कांगावा केला जातो. पण प्रत्यक्षात मुंबईच्या एकाही सभेत राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचा कार्यकर्ता दिसला नाही. एवढेच नाही तर काँग्रेसचेही कार्यकर्ते कुठे दिसले नाही. कदाचित मुंबईत तमाशा होणार आहे. या तिन्ही पक्षांचे नेते या तमाशात सहभागी होतील, असेही प्रकाश आंबेडकर यावेळी महाविकास आघाडीला टोला हाणताना म्हणाले.
प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात राजकीय भूकंप होणार असल्याचाही अंदाज वर्तवला. लोकसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे भाजपसोबत जातील. कारण त्यांच्यामागे चौकशीचा ससेमिरा लागला आहे. विशेषतः त्यांना स्वतःचे राजकीय पुनर्वसनही करून घ्यायचे आहे. त्यामुळे त्यांच्यापुढे भाजपसोबत जाण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. संधीसाधू राजकारण करणारे शरद पवारही भाजपसोबत जातील, असेही ते यावेळी बोलताना म्हणाले.