संजय राऊतांच्या टीकेवर मनसेचे संदीप देशपांडे यांचे प्रत्युत्तर
मुंबई : मनसेने महायुतीला (Mahayuti) जाहीर पाठिंबा दिल्यापासून ठाकरे गट आणि मनसेमध्ये (Thackeray Group vs MNS) आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. त्यातच लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची आज एकत्र शिवाजी पार्कवर (Shivaji Park) जाहीर सभा होणार आहे. यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी टीका केली. राज ठाकरे ज्यांच्याबद्दल सवाल उठवतात, त्यांच्याबरोबरच जातात, ही राज ठाकरे यांची खासियत आहे अशी टीका राऊत यांनी केली. यावर आता मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे.
संदीप देशपांडे म्हणाले, संपलेल्या पक्षावर बोलत नाही म्हणणाऱ्यांना आज रोज मनसेवर का बोलावं लागतंय? या लोकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. ज्यादिवशी राज ठाकरेंनी बिनशर्त पाठिंबा दिला तेव्हापासून संजय राऊत पिसाळले आहेत. त्यामुळे ते वाट्टेल ती विधानं करतायेत. ४ जूननंतर ज्या संजय राऊतांनी शरद पवारांकडून उबाठा संपवण्याची सुपारी घेतलीय ते सामनामध्ये संपादकच काय कारकून म्हणूनही राहणार नाही असा पलटवार मनसे नेते संदीप देशपांडे यांनी संजय राऊतांवर केला आहे.
मनसे नेते संदीप देशपांडे म्हणाले की, आज महाराष्ट्रातल्या तमाम हिंदुत्ववादी लोकांना या सभेची उत्सुकता आहे. दोन कट्टर हिंदुत्ववादी नेते पहिल्यांदाच एका व्यासपीठावर येणार आहेत. केवळ राज्यातील नव्हे देशातील जनतेचे लक्ष या सभेवर असेल. सगळ्यांसारखी आम्हालाही उत्सुकता आहे. आम्हाला संपणारे बोलणारे ४ जूननंतर स्वत:च संपणार आहेत, असंही देशपांडे म्हणाले.