मध्यरात्री नेमकं काय घडलं?
पुणे : पुण्यात गुन्हेगारीची (Pune Crime) समस्या अत्यंत गंभीर बनत चालली असून दिवसेंदिवस पुण्यातून धक्कादायक बातम्या समोर येत आहेत. कधी खून, कधी गोळीबार, कधी कोयता हल्ला यामुळे पुणे पार हादरून गेलं आहे. या सगळ्या घटना किरकोळ वादातून होत असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड घबराहट निर्माण झाली आहे. त्यातच पुण्यात पुन्हा एकदा कोयता हल्ल्याची घटना घडली आहे. कोथरुड (Kothrud) परिसरात चार ते पाच जणांच्या कोयता गँगच्या (Koyta gang) टोळक्याने २२ वर्षीय तरुणाची हत्या करत खळबळ उडवून दिली आहे.
पुण्यातील कोथरूड परिसरात काल मध्यरात्री एका तरुणाची कोयत्याने वार करत निर्घृणपणे हत्या करण्यात आली. श्रीनिवास शंकर वत्सलावर (वय २२, राहणार लक्ष्मी नगर डहाणूकर कॉलनी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे कोथरुड परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
नेमकं काय घडलं?
श्रीनिवास हा रात्री त्याच्या मित्रासोबत घरी निघाला होता. त्याचवेळी कर्वे नगर परिसरातील गांधी चौकात पाच सहा जणांच्या टोळीने त्याला आणि त्याच्या मित्राला अडवलं आणि श्रीनिवासवर जोरदार वार करायला सुरुवात केली. हा सगळा प्रकार पाहून श्रीनिवासचा मित्र पळून गेला. श्रीनिवासवर करण्यात आलेले वार इतके जोरात होते की, श्रीनिवास रस्त्यातच रक्ताच्या थारोळ्यात पडला.
रात्र असल्याने फार रहदारी नव्हती मात्र तरीही काही आजूबाजूच्या लोकांनी श्रीनिवासला पाहून त्यांची मदत केली आणि त्याला जवळच्या खासगी दवाखान्यात दाखल केलं. मात्र त्यापूर्वीच श्रीनिवासचा जीव गेला होता. याबाबतचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत अलंकार पोलीस स्टेशन येथे सुरू होती. पोलीस सध्या या घटनेचा कसून तपास करत आहेत. रात्री त्याच्यासोबत असलेल्या मित्राची देखील पोलीस चौकशी करत आहेत. मात्र, या हल्ल्यामागील कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही.