पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
मुंबई : मुंबई चैत्यभूमीतून प्रेरणा घेते, हे आमचे सरकार आहे. ज्यांनी देश व जगभरात डॉ. बाबासाहेबांचे पंचतिर्थ विकसित केले आहेत. शिवतिर्थच्या या भूमीत कधीकाळी बाळासाहेब ठाकरे व वीर सावरकरांचा आवाज घुमत होता. मात्र, आज विश्वासघाती आघाडीला पाहून त्यांच्या आत्म्याला किती दु:ख झाले असेल. नकली शिवसेनावाल्यांनी शिवसैनिकांच्या बलिदानाला धोका दिला, सत्तेसाठी ते राम मंदिराला विरोध करणाऱ्यांसोबत गेले. सत्तेसाठी हे मुंबई हल्ल्यानंतर पार्टी करणाऱ्या लोकांसोबत गेले, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नाव न घेता उद्धव ठाकरेंनाही आपल्या भाषणातून लक्ष्य केले.
दादर येथील शिवाजी पार्कमधील मैदानावर महायुतीच्या उमेदवारांसाठी आयोजित करण्यात आलेल्या प्रचारसभेत पंतप्रधान मोदी बोलत होते. राज ठाकरेंनंतर पंतप्रधान मोदींनी नेहमीप्रमाणे मराठीतून भाषणाला सुरुवात केली. मोदींनी आपल्या भाषणात विकास कामांचा उल्लेख करत, पुढील २०४७ पर्यंतच्या भारताचे स्वप्न दाखवले. मुंबईतील शिवाजी पार्कवरुन पुन्हा एकदा नकली शिवसेना म्हणत उद्धव ठाकरेंना लक्ष्य केले. काँग्रेससह इंडि आघाडी म्हणत इंडिया आघाडीवर हल्लाबोल केला.
माझ्याकडे १० वर्षाचे रिपोर्ट कार्ड आहे, आणि पुढच्या २५ वर्षांचा रोडमॅप आहे. पण इंडिया आघाडीकडे काय आहे? जेवढे पक्ष तेवढे पंतप्रधान त्यांच्याकडे आहेत. मुंबईकरांनी बाहेर पडून जास्तीत जास्त मतदान करावे, त्यांचे प्रत्येक मत हे मोदींना जाणार. यावेळी इतिहासातील सर्व रेकॉर्ड मोडणार असून भारत जगातला सर्वात बलशाली देश आणि तिसरी महाशक्ती म्हणून उभारणार आहे, असा विश्वास नरेंद्र मोदींनी व्यक्त केला. नरेंद्र मोदी यांनी, मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी आहे, असं सूचक विधान करत विकसित भारताचा रोडमॅप मतदारांसमोर मांडला.
मंदिरांवर, मंगळसुत्रांवर इंडिया आघाडीची नजर
इंडी आघाडीकडे काय आहे, जेवढी माणसे तेवढ्या घोषणा. इंडिया आघाडीची नजर आपल्या मंदिरांवर आहे, महिलांच्या मंगळसुत्रावर आहे. काँग्रेसच्या जाहीरनाम्यानुसार तुम्ही तुमच्या मुलांना तुमची संपत्ती देऊ शकणार नाहीत, तुमच्या संपत्तीतील निम्मा हिस्सा त्यांचे सरकार घेणार आहे. व्होट जिहादवाल्यांना ती संपत्ती देण्याचे काम ते करणार आहेत. काँग्रेसला अस्तित्व वाचवण्यासाठी ही निवडणूक लढवायची आहे. देशातील लाखो गुंतवणूकदार आज मार्केटसोबत जोडले आहेत. पण, इंडी आघाडीवाले जे कट रचत आहेत, त्यांचा उद्देश देशातील गुंतवणूकदारांचा हा विश्वास तोडण्याचे काम करत आहे, असे म्हणत इंडिया आघाडीच्या धोरणांवर व जाहिरनाम्यावर मोदींनी हल्लाबोल केला.
‘राहूल गांधींकडून शब्द घेऊन दाखवा’
मी राष्ट्रवादीच्या नेत्याला चॅलेंज देतो, राहुल गांधी वीर सावरकर यांच्याबद्दल अपशब्द बोलणार नाहीत, असा शब्द घेऊन दाखवा, असे आव्हानच मोदींनी जाहीर सभेतून शरद पवारांना दिले. मला माहितीय तो शब्द राहुल गांधी देणार नाहीत, कारण निवडणुका संपताच ते पुन्हा वीर सावरकर यांच्याबद्दल अपशब्द बोलणार आहेत. मोदींनी आपल्या भाषणातून नकली शिवसेना म्हणत उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला. नकली शिवसेनेचे जेवढे परिवर्तन झाले आहे, तेवढा बदल देशातील कुठल्याच पक्षात आजपर्यंत झाला नाही, असेही मोदींनी म्हटले.
हा मोदीच संविधानाचा मोठा रक्षक
आर्टीकल ३७० हटवणारा मोदीच संविधानाचा सर्वात मोठा रक्षक आहे, जे आज संविधान डोक्यावर घेऊन नाचत आहेत, त्यांनी संविधानाला अपंगत्व केल्याची टीका मोदींनी केली. पंडित नेहरुंनी चित्रवाले संविधान ठेऊन टाकले, आता हे लोक संविधानच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम करत आहेत. दलित, मागास वर्गाचं आरक्षण मी कधीच हटवू देणार नाही, असे मोदींनी म्हटले.
आम्ही २५ कोटी भारतीयांना दारिद्र्य रेषेतून वर आणले
नरेंद्र मोदी उपस्थितांना संबोधित करताना म्हणाले की, मुंबईमध्ये पुढच्या काळात रेकॉर्डब्रेक गुंतवणूक येणार आहे. येत्या काही वर्षांतच जेव्हा मी तुमच्यामध्ये येईन, तेव्हा आपण जगातीत तिसरी सर्वात मोठी आर्थिक शक्ती बनलेले असू, ही माझी गॅरंटी आहे. मी तुम्हाला गॅरंटी देण्यासाठी आणि तुमच्या मुलांना विश्वास देण्यासाठी आलो आहे की, मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन. त्यामुळे नरेंद्र मोदी २४ बाय ७, २०४७ च्या मंत्रासह काम करत आहे, असे मोदी म्हणाले. यावेळी नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. ते म्हणाले की, काँग्रेसने २०१४ मध्ये सत्ता सोडली तेव्हा देशाची अर्थव्यवस्था ११ व्या क्रमांकावर होती. मात्र आम्ही देशाच्या अर्थव्यवस्थेला पाचव्या क्रमांकावर आणलं आहे. काँग्रेसचे पंतप्रधान आपल्या भाषणांमधून गरीब गरीब असा मंत्र जपायचे. मात्र आम्ही २५ कोटी भारतीयांना दारिद्र्य रेषेतून वर आणले आहे, असेही मोदींनी यावेळी सांगिलते.
‘मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा’
राज ठाकरे यांनी मोदींकडं मराठी माणसाकडून असलेल्या काही अपेक्षा व्यक्त केल्या. त्यापैकी पहिली अपेक्षा मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा. पंतप्रधान झाल्यानंतर ही अपेक्षा पूर्ण होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. त्यानंतर दुसरा विषय देशाच्या अभ्यासक्रमात देशात मराठ्यांचे जे सव्वाशे वर्षे मराठ्यांचं साम्राज्य होतं त्यांचा समावेश शालेय जीवनापासून करावा. तिसरा विषय समुद्रात शिवछत्रपतींचा पुतळा उभा रहावा, तसेच शिवरायांच्या गडकिल्ल्यांना पूर्वीच वैभव परत प्राप्त व्हावं यासाठी एक आंतरराष्ट्रीय समिती स्थापन करण्याचीही मागणी त्यांनी केली. त्यानंतर गेल्या १८-१९ वर्षे मुंबई-गोवा महामार्ग हा अजूनही खड्ड्यात आहे तो लवकरात लवकर व्हावा. तसेच संविधान बदलणार असल्याचा जो विरोधक प्रचार करत आहेत, त्यांची तोंड तुम्ही कायमची बंद करावीत. ओवैसींसारखे जे अड्डे आहेत ते एकदा तपासून घ्या, तिथे माणसे घुसवा, देशाचे सैन्य घुसवा आणि हा देश कायमचा सुरक्षित करुन टाका, असेही राज ठाकरे यावेळी म्हणाले. शेवटची अपेक्षा व्यक्त करताना राज ठाकरे म्हणाले, मुंबईची लोकल ट्रेनच्या यंत्रणेवर केंद्र सरकारने बारीक लक्ष द्यावे, निधी द्यावा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
‘शिवसेनाप्रमुखांचे नाव घेण्याचा उद्धव यांना अधिकार नाही’
उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांच्या संपत्तीचे वारसदार आहेत. मात्र, आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे वारसदार आहोत, जीव गेला तरी बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही. शिवाजी पार्क मैदानात गर्व से कहो हम हिंदू है ही डरकाळी घुमत होती, पण आता उबाठाला हिंदू म्हणायची लाज वाटू लागली आहे. बाळासाहेब ठाकरेंचे नाव घेण्याचा यांना नैतिक अधिकार नाही. तुम्ही आता बाळासाहेबांचा नाव घेण्याचा अधिकार सोडलेला आहे. काँग्रेसमध्ये उबाठा लोळत आहेत, बिघडलेलं पोरगं चुकीच्या वाटेला लागले, असे आपण म्हणतो. त्यात हे म्हणतात माझा बाप चोरला, अरे हे काय खेळणं आहे का? आम्हाला फक्त बाळासाहेबांचे विचार हवेत, तीच आमची संपत्ती आहे. उबाठाला हिंदू म्हणवून घ्यायची लाज वाटत आहे, हिंदूहृदयसम्राट म्हणायला जीभ कचरू लागली आहे, मतांसाठी लाचारी सुरू असल्याची टीका एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली. माणूस किती बदलला हे पाहू शकतो, पण इतक्या वेगाने रंग बदलताना सरडा पाहिला नाही, असे म्हणत उद्धव ठाकरे हे रंग बदलणारे सरडा असल्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टीका केली.
‘उद्धव ठाकरे हिंदू बांधवांना विसरले’
‘शिवाजी पार्कवर बोलत असताना बाळासाहेब ठाकरेंची गर्जना आठवते. ते म्हणायेच, माझ्या तमाम हिंदू माता आणि भगिनींनो हीच गर्जना आम्ही उद्धव ठाकरे यांच्याकडून ऐकायचो. पण इंडिया आघाडीची बैठक झाली, त्यांनी सांगितले हे चालणार नाही. तेव्हापासून उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले. ही शोकांतिका आहे. बाळासाहेबांची सभा व्हायची तेव्हा भगवा झेंडा, कडवट हिंदू, शिवरायांचे मावळे असे शब्द ऐकायला मिळायचे. आता उद्धव ठाकरेंच्या भाषणात बाप चोरला, घरी बसून काम करणार, गझनी, माझे कुटुंब माझी जबाबदारी यापलिकडे काही ऐकायला येत नाही’, असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी लगावला.
‘विरोधकांकडे विकासाचा मुद्दा राहिलेला नाही’
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला. गेल्या दहा वर्षात मोदींनी देशाला पुढे नेण्याचे काम केले. त्यांचे कणखर नेतृत्व देशाला प्रगतीच्या शिखरावर घेऊन जाणार आहे. म्हणूनच आपल्याला तिसऱ्यांदा त्यांना पंतप्रधान करण्याचा संकल्प करायचा आहे. विरोधकांकडे विकासाचा मुद्दा राहिलेला नाही. आम्ही सातत्याने विकासाबद्दल बोलतोय. पण विरोधक त्याला फाटा देत आहे. नको ती भाषणं करत आहेत. विरोधकांची भाषणे काढून बघा. त्यांचे शब्द बघा. आपण महाराष्ट्राला सुसंस्कृत राज्य म्हणतो, पण कुठल्या प्रकारची भाषा वापरतात. विरोधक कुठलाही मुद्दा काढून समाजात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे.