बेदम मारहाण…कपड्यांशिवाय घराबाहेर उभं केलं आणि…
नवी दिल्ली : आई आणि मुलाच्या पवित्र नात्याला कलंक लागणारा एक धक्कादायक प्रकार दिल्ली येथे घडला आहे. दिल्ली येथील गुरुग्राममध्ये एका आईने आपल्या आठ वर्षाच्या पोटच्या मुलाचा खून केल्याची ह्दय पिळवटून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. क्षुल्लक कारणावरुन जन्मदात्रीने तिच्या मुलाचा गळा दाबून हत्या केली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुग्राममध्ये सेक्टर १८ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका आईने आपल्या आठ वर्षाच्या मुलाचा गळा दाबून खून केला. या मुलाचा दोष एवढाच होता की तो शाळेतून परत आला तेव्हा त्याचा ड्रेस मळलेला होता. तसंच तो शाळेत काही पुस्तकं विसरुन आला होता. मात्र, यामुळे संतापलेल्या आईने त्याला बेदम मारहाण करून कपड्यांशिवाय घराबाहेर उभं केलं. तसेच काही वेळाने त्या मुलाने काहीतरी मिळवण्याचा हट्ट केला असता आईने त्याचा गळा दाबून खून केला.
दरम्यान, महिलेचा पती संध्याकाळी घरी परतला असताना मुलगा बेशुद्ध अवस्थेत असल्याचं त्याने पाहिलं. तातडीने मुलाला उपचारासाठी खासगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी मुलाला मृत घोषित केलं. या घटनेची माहिती मिळताच सेक्टर-१८ पोलीस स्टेशन घटनास्थळी पोहोचले. तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करून आरोपी महिलेला अटक केली असून सध्या आरोपी महिलेची चौकशी सुरू आहे. ही महिला रागीट स्वभावाची असून तिला स्वतःच्या मुलाची हत्या केल्याचा थोडाही पश्चाताप झाला नाही, असे गुरुग्राम पोलिसांनी सांगितले.