
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीमध्ये (Loksabha Election) प्रत्येक राजकीय पक्ष आपल्या विजयासाठी जोरदार तयारी करत आहे. त्यात जनतेचा कौल पाहता भाजपाच्या पदरी विजय पडणार, अशी चिन्हे निर्माण झाली आहेत. मात्र, ही लोकशाही (Democracy) असल्यामुळे जनतेचं मत काय असेल, याचा अंदाज बांधणं कठीण आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांना एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान एक प्रश्न विचारण्यात आला. ज्यावर अमित शाह यांनी दिलेलं उत्तर चर्चेत आलं आहे.
भाजपाला बहुमताचा आकडा गाठता आला नाही, तर भाजपाकडे प्लॅन बी काय आहे? असा प्रश्न या मुलाखतीमध्ये अमित शाह यांना विचारण्यात आला होता. त्यावर ते म्हणाले की, आम्हाला तशी कोणतीही शक्यता वाटत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या योजनांचा लाभ मिळालेला ६० कोटींचा जनाधार आमच्याकडे आहे. या लाभार्थी गटात कोणत्याही एका जाती-धर्माचे, वयोमानाचे लोक नाहीत. आम्ही ४ कोटी गरिबांना घरे दिलीत, आणखी ३ कोटी निवडून आल्यानंतर देणार आहोत. ३२ कोटी आयुष्यमान कार्ड दिलीत ज्याचा फायदा ६० कोटींना ५ लाखापर्यंतचे उपचार मोफत मिळतील. १४ कोटी घरात नळातून पाणी दिलं. १० कोटींहून अधिक घरात गॅस सिलेंडर दिलेत. १२ कोटी घरी शौचालय बनवलं आहे. १ कोटी ७१ लाख गरीब महिलांना लखपती दिदी बनवलं आहे. आणखी ३ कोटी महिलांना लखपती दिदी बनवायचं आहे. ११ कोटी शेतकऱ्यांना वर्षाला ६ हजार त्यांच्या बँक खात्यात थेट दिले जातात. प्रत्येक गरिबाला दरमहिना ५ किलो धान्य मोफत दिले जाते.
तसेच या ६० कोटी लोकांनी कधी निवडणूक प्रक्रिया आणि देशाच्या अर्थव्यवस्थेत त्यांचा वाटा आहे याचा विचार कधी केला नव्हता. स्वातंत्र्यानंतर एक पंतप्रधान असा आला, ज्यांनी ६० कोटी जनतेसाठी योजना बनवल्या आणि त्या जमिनीवर पोहचवल्या. २ लाख गावात भारत नेट पोहचलं आहे. डिजिटल व्यवहारात जगात भारताचं नाव घेतले जाते. राष्ट्रीय महामार्ग १ लाख ५० हजार किमीचे बनलेत. दिवसाला २८ किमी हायवे बनतो. ग्रामीण भागात रस्ते सुधारले. विमानतळे वाढवण्यात आली. १ जीबी डेटाची किंमत २६९ रुपये आधी होती ती आज १० रुपये झालीय. या लाभार्थ्यांना नरेंद्र मोदी काय आहेत आणि त्यांच्यासाठी ४०० जागा का जरूरी आहेत, याची कल्पना आहे, असंही अमित शाह यांनी सांगितले.
पराभव झाल्यास भाजपाला 'प्लॅन बी'ची गरज?
आम्हाला प्लॅन बी ची गरजच नाही, कारण आमचा प्लॅ ए यशस्वी होणार आहे. प्लॅन बी तेव्हाच बनवावा लागतो जेव्हा प्लॅन ए यशस्वी होण्याची शक्यता ६० टक्क्यांहून कमी असते. शतप्रतिशत नरेंद्र मोदी प्रचंड बहुमताने निवडून येतील असा मला विश्वास आहे. हा देश सुरक्षित राहावा. देश समृद्ध व्हावा. जगात सन्मान व्हावा. हा देश आत्मनिर्भर आणि विकसित भारत बनायला हवा हे प्रत्येक भारतीयाला वाटते. गेल्या १० वर्षात जगात भारताचा सन्मान वाढलाय हे प्रत्येकाला वाटतं असं विधान अमित शाह यांनी केलं.
आरक्षणाच्या मुद्द्यावरही केलं भाष्य
दरम्यान, काहीजण व्हॉट्सअप आणि चॅनेल पाहतात. परंतु आम्ही लाखो किमी दौरे करून कोट्यवधी लोकांसोबत जनसंपर्क करतोय हे कुणाला दिसत नाही. जोपर्यंत भाजपाचा एक तरी खासदार संसदेत आहे तोपर्यंत एससी, एसटी आणि ओबीसी यांच्या आरक्षणाला कुणीही धक्का लावू शकत नाही. नरेंद्र मोदी यांच्याशिवाय मोठा एससी, एसटी आणि ओबीसींच्या आरक्षणाचा कुणी समर्थक नाही असंही अमित शाहांनी आरक्षण रद्द करण्यावरून झालेल्या आरोपावर भाष्य केले.
दक्षिणेतील राज्यात भाजपा हा एकमेव मोठा पक्ष होईल
भाजपाकडून उत्तर भारत आणि दक्षिण भारत असा दुजाभाव केल्याचा आरोप काँग्रेसने केला होता. यावर बोलताना अमित शाह म्हणाले, “केरळ, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटकमध्ये भाजपा हा सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर येईल. “एखादा नेता राज्याला स्वतंत्र देश म्हणून घोषित करत असेल तर हे आक्षेपार्ह आहे. हा देश कधीच वेगळा होऊ शकत नाही. काँग्रेसचा मोठा नेता देशाच्या विभाजनाबद्दल विधान करतो आणि काँग्रेस पक्ष त्या विधानाचा साधा निषेधही करत नाही किंवा त्यापासून अंतरही राखत नाही. देशातील नागरिकांनी काँग्रेसचा अजेंडा समजून घ्यावा. दक्षिणेतील राज्यात भाजपा हा एकमेव मोठा पक्ष म्हणून समोर येईल.”