कधी जाहीर होणार निकाल?
मुंबई : केंद्रीय माध्यमिक परीक्षा मंडळ म्हणजेच CBSE बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परिक्षांचे निकाल लागल्यानंतर आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्ड म्हणजेच HSC आणि SSC बोर्डाकडून परीक्षा दिलेल्या विद्यार्थी व त्यांच्या पालकांना निकालाचे वेध लागले आहेत. लवकरच अॅडमिशन प्रकिया सुरु होईल त्यामुळे वेळेत निकाल लागला तर पुढचे नियोजन करणे सोपे होईल, या दृष्टीने विद्यार्थी निकालाची वाट पाहत आहे. त्यातच बोर्डाने निकालासंदर्भात मोठी अपडेट दिली आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात बारावी आणि दहावीच्या परीक्षा झाल्या होत्या. दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल लवकरच जाहीर होणार आहे. बारावीचा निकाल येत्या आठवड्यात जाहीर होईल अशी माहिती आहे. तर दहावीचा निकाल मे महिन्याच्या शेवटी जाहीर होऊ शकतो.
यंदा बारावीच्या परीक्षेसाठी १५ लाख १३ हजार ९०९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. बारावीची परीक्षा नऊ विभागीय मंडळांतर्फे आयोजित करण्यात आली होती. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या पुणे ,नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर , अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण नऊ विभागीय मंडळांतर्फे परीक्षेचं आयोजन केलं जातं. बारावीचा निकाल तयार करण्याचं काम अंतिम टप्प्यात असून येत्या आठवड्यात निकाल जाहीर होऊ शकतो.
तर दहावीचा निकाल मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात जाहीर होऊ शकतो. दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या उत्तर पत्रिका तपासणीचं काम बोर्डाकडून पूर्ण झालं असून आता निकाल तयार करण्याचं काम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती आहे. महाराष्ट्रात दहावीच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात वाढली आहे. दहावीला १६ लाख ९ हजार ४४४ विद्यार्थ्यांची नोंदणी केली गेली होती. आता सर्वांनाच निकालाची प्रतिक्षा आहे.