माझे कोकण: संतोष वायंगणकर
महाराष्ट्रातील कोकण प्रांत वैशिष्ट्यपूर्ण आहे. इथे पिकणाऱ्या फळांचं कौतुक जगाला आहे. सृष्टीसौंदर्य, समुद्रकिनारा, खाडी असं बरंच काही सौंदर्य आहे. त्यामुळे सौंदर्याने नटलेला हा प्रदेश समाधानी वृत्तीने जगण्या-वावरणाऱ्यांचा असलेला आहे. सर्वकाही आहे; परंतु कोकणात काहीच नाही अशी मानसिकता आणि समजूत आपणच करून घेतली आहे. कोकणात कोकण रेल्वे येण्यापूर्वी काहीच नाही म्हणून आपणच गळा काढत होतो. कोकणातून महाराष्ट्राच्या राजधानीतून आणि देशाच्या राजधानीतूनही रेल्वे धावू लागल्या. त्या अगदी आपल्या राज्याच्या सीमेपलीकडच्या तीन-चार राज्यांत रेल्वे जाते. कोकणात रेल्वे धावू लागली की, रेल्वेच्या वेगाने कोकणात विकासप्रक्रियाही वेग घेईल असं सर्वांनाच वाटत होतं; परंतु कोकणात आजच्या घडीला सर्वच व्यवसायात कोकणचा टक्का कमी होऊन परप्रांतीयांची संख्या फार मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.
कोकणामध्ये परप्रांतीय आले, ते व्यवसायात स्थिरावले म्हणून कोणीही बोटं मोडण्याची आवश्यकता नाही. व्यवसाय उद्योगासाठी परप्रांतीयांच्या अंगी असणारे गुण आपल्यामध्ये नाहीत. संयमाचा प्रचंड अभाव आपल्यामध्ये आहे. कोणताही व्यवसाय, उद्योग उभारण्यासाठी व्यवसायात स्थिरता येण्यासाठी काही सोसण्याची मानसिकता हवी. कोकणातील जे व्यावसायिक सहनशिलतेने कष्ट करत राहतात ते आपोआपच स्थिरावलेलेच दिसतात. गेल्या दहा-पंधरा वर्षांमध्ये कारागिरीत उत्तर प्रदेश, कर्नाटक, बिहारचे तरुण दिसतात. उसाचा रस, ज्युस सेंटर चालवणारे सर्वच परप्रांतीय आहेत. अगदी सहज म्हणून या अशा रसवंती चालविणाऱ्यांकडे विचारलं तर ते सांगतात कोण सांगतो दहा वर्षे झाली. कोण म्हणतो पाच वर्षे झाली. मुंबई-गोवा महामार्ग क्रमांक ६६ या महामार्गाचे चौपदरीकरण झाले. या महामार्गाच्या दोन्ही बाजूला शहरातील चौकातील मुख्य जागांवर जवळपास सर्वच परप्रांतीय दिसतात. अपवादानेही स्थानिक तरुण दृष्टीस पडत नाहीत. कोकणात काही काम नाही, काय करायचं? असा प्रश्न घेऊन वावरणारे अनेक तरुण दिसतात.
आज महामार्गावरील रस्त्यांच्या बाजूला उभ्या असलेल्या रसवंती सेंटर, ज्युस सेंटरला जागेचं भाडं नाही की काही नाही; परंतु व्यवसाय उभा राहण्यासाठी आवश्यक असणारा ‘संयम’ त्या परप्रांतीयांपाशी असतो. म्हणूनच परक्या मुलखातही ‘तुमका किती ग्लासा रस देव’ यासारखी अस्खलित मालवणी भाषेतील वाक्य सहज बोलून जातात. काही वर्षांनंतर हा परप्रांतातून आलेला आहे की इथलाच कोकणातलाच मालवणी मुलखातला आहे हेच कळेनासं होतं. इतका इथल्या भागाशी जुळून घेतात. बेकरी, टायर या उद्योगात केरळ, राजस्थानी लोकांनी पाय रोवलेत. एक आठवलं म्हणून सांगतो, कोकणातील स्विटमार्ट व्यवसायात गुजराती किंवा राजस्थानी दिसतात. कुडाळच्या पुरोहित स्विटमार्टचे जालमसिंह पुरोहित यांनाही कुडाळात अनेक वर्षे झाली.
कोकणात कोकण रेल्वे सुरू झाली तेव्हा कुडाळ रेल्वे स्थानकावरील टी-स्टॉल पुरोहित यांनी घेतला. रेल्वेत जेवण, स्नॅक तेव्हा पुरोहितच पुरवीत असत. कदाचित आजही तेच पुरवत असावेत. एका कोकणवासीयांशी जालमसिंह पुरोहित बोलत होते. जालमसिंह मालवणी खूप छान बोलतात. त्या मालवणी मुलखातल्या मुंबईकर चाकरमान्याशी संवाद सुरू असताना तो चाकरमानी जालमसिंह म्हणाला बरा झाला, या खाना-बिना पुरवूचा कॉन्ट्रॅक्ट तुम्हीच आपल्या मालवणी माणसान घेतल्यान ता. नायतर कोणतरी गुजराती, राजस्थानी मारवाड्यानं घेतल्यानं आसता. जालम मनात हसले. पण त्यातही ते समाधानी होते की, आपण या मुलखाशी किती जोडले गेले आहोत त्याचाही त्यांना आनंद झाला.
व्यावसायिकता अंगी असावी लागते किंवा ती अंगी वसवावी लागते तरच ते शक्य होते. नाहीतर ती शक्य नसते. कोकणातील अलीकडे काही तरुण शेतीत रमताना दिसतात. म्हणूनच कोकणातील कृषीक्षेत्रात वाढ झालेली दिसते. कलिंगड, भाजीपाला करताना अनेक तरुण दिसतात; परंतु पूर्णत: सर्वकाही निसर्गावर अवलंबून राहावे लागते. कलिंगडाच्या बाबतीत अनेक तरुण शेतकरी तोट्यात जातात; परंतु झालेलं नुकसान पुढच्या वर्षी भरून निघेल याच आशेवर नव्याने सुरुवात करतात. कोकणात सध्या गेली काही वर्षे पर्यटन बहरत आहे. कोकणात पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांची संख्या दरवर्षी वाढत आहे. पर्यटनाच्या व्यवसायात कोकणातील सर्वसामान्यजनही जोडले गेले आहेत. आज असंख्य कुटुंब पर्यटन व्यवसायामुळे स्थिरावली आहेत; परंतु या व्यवसायातही सचोटी हवी. येणारा ग्राहक वारंवार आपल्याकडे आलाच पाहिजे यासाठी त्या ग्राहकाला आपण जपले पाहिजे. तसं घडत नसेल तर यापुढच्या काळात कोकणातील सर्वच व्यवसायिकांनी ही काळजी घेण्याची अत्यंत आवश्यकता आहे.
कोकणातील काही तरुणांना आपल्याच कामाची लाज वाटते. मुंबई-पुणेसारख्या शहरात जाऊन पाच-दहा हजार रुपयांत इथला तरुण काम करेल; परंतु कोकणातील रस्त्याच्या कडेला एखाद्या लिंबू सरबताचा स्टॉल चालवायला लाज वाटते. कोणताही व्यवसाय करण्यासाठी अधिकचे कष्ट घेण्याची तयारी असायला हवी. आपल्याकडे नोकरी, व्यवसायाला प्राधान्य दिले जात नाही. अधिकचे कष्ट घेण्याची मानसिकता नाही. कोणत्याही बाजारात विश्वासार्हता निर्माण करावी लागते. ती सहजतेने निर्माण किंवा प्राप्त करता येत नाही. ती जपावी लागते. केवळ विश्वासार्हतेमुळेच व्यवसायात गतीमानतेने प्रगती करता येऊ शकते. पूर्वपिढीचे व्यवसाय आजच्या पिढीने सोडले आहेत. कोकणातील प्रमुख बाजारपेठेत म्हणूनच कोकणचा मूळ व्यापारी कुठे दिसत नाही. परप्रांतीय या व्यवसायात मोठ्या प्रमाणात आले आहेत.
‘येवा कोकण आपलाच आसा’ म्हणत आपले पूर्वपिढीचे असलेले व्यवसाय अनेक तरुणांनी बंद केलेत. परप्रांतीयांनी व्यवसाय थाटले आहेत आणि विशेष म्हणजे ते अतिशय चांगल्यारितीने व्यवसायात स्थिरावले आहेत. खुल्या बाजारपेठेत कोणालाही रोखता येणारे नाही. या स्पर्धेत टिकून राहावे हीच खरी कसोटी आहे. यामध्ये आपला व्यवसाय उभा करून त्यात ठामपणाने उभे राहिले पाहिजे. कोकणात जर परप्रांतीय येऊन स्थिरावत असतील आणि आपल्या कोकणातील तरुण नोकरीच्या शोधात मुंबई गाठत असतील, तर ते दुर्दैवच म्हणावं लागेल. जो व्यवसाय परभागातून येऊन इथे करत असतील, तर आपल्याकडील तरुण का करीत नाहीत? या प्रश्नाचं उत्तर लाज वाटते. कष्ट नकोत असचं असू शकतं. नाही का ?