१६ जणांचा मृत्यू तर ७५ जखमी
मुंबई : मुंबई आणि इतर परिसरात अवघ्या काही क्षणांसाठी पडलेल्या पावसाने जनजीवन विस्कळीत केले. घाटकोपरमधील (Ghatkopar) महाकाय होर्डिंग या वादळी वाऱ्यामुळे पेट्रोल पंपावर पडले (Hoarding Collapse). या दुर्घटनेत एकूण १६ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. गेल्या तीन दिवसांपासून सेन्सर आणि श्वान पथक, NDRFच्या मदतीने होर्डिंगच्या ढिगाऱ्याखाली कोणी अडकले आहे का याचा शोध घेतला जात होता. आता तब्बल ६३ तासानंतर या दुर्घटनेचे बचावकार्य अखेर पुर्ण झालं असल्याची माहिती मुंबई पालिकेने (Mumbai Municipality) दिली.
मुंबई पालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी दिलेल्या माहितीनुसार, घाटकोपरमधील होर्डिंग मृत्यूकांडातील बचावकार्य पुर्ण झालं आहे. या दुर्घटनेत १६ दणांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर ७५ जन जखमी झाले आहेत. या बचावकार्यात मुंबई महानगरपालिका, मुंबई पोलीस, एमएमआरडीए, एनडीआरएफ, महानगर गॅस या सर्व यंत्रणांनी समन्वय साधत बचावकार्य पुर्ण केलं. दुर्घटनेच्या ठिकाणी संपुर्ण तपासणी करण्यात आली असून यामध्ये अन्य कोणतीही व्यक्ती अडकलेली नाही. आता होर्डिंगचा मलबा हटवण्याचे काम सुरू आहे. या दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांच्या कुंटुबीयांना त्वरीत मदत दिली जाईल.
अनाधिकृत होर्डिंगबाबत कारवाई
पालिकेने मुंबईतील अनाधिकृत होर्डिंग बाबतीत कारवाया हाती घेतल्या आहेत. होर्डिंगसाठी ठरवलेली मानके म्हणजेच त्यांची पायाभरणी, हवा जाण्याची सोय ही सर्व मानके ठरवून दिलेली आहे. रेल्वेला देखील त्याप्रमाणे आदेश दिले आहेत या मानकांचे पालन झाले पाहिजे. होर्डिंग लावताना परवानगी घेणे आवश्क आहे. सर्व नियम पाळले गेले पाहिजे, असं मुंबई पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी सांगितले.
पुणे, नागपूरात महापालिका अलर्ट
मुंबईत घाटकोपरमध्ये झालेल्या घटनेनंतर पुणे, नाशिक आणि नागपूरसारख्या शहरातदेखील अशा घटनांचा मोठा धोका आहे. त्यात अवकाळी आणि वादळी पावसाने मोठ्या आणि किरकोळ घटना घडल्या आहे. या घटना घडू नये, यासाठी महापालिकाने खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. पुण्यात अनधिकृत होर्डिंग्सवर थेट कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर नागपुरमध्ये दोन विशेष पथक तयार करून शहरातील सर्व होर्डिंगचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले असून त्यांची सुरक्षितता तपासली जात आहे.