यवतमाळ : अनेकदा मृत्यूच्या दाढेतून रुग्णांना बाहेर काढण्याचं काम डॉक्टरांकडून केलं जातं त्यामुळे डॉक्टरांना देवाचं दुसरं रुप मानलं जातं. प्रत्येक ठिकाणी डॉक्टरांना मानाचं स्थान दिला जातो. मात्र काही ठिकाणी डॉक्टरांच्या वाईट कृतीमुळे वैद्यकीय क्षेत्र बदनाम झाला आहे. अशातच यवतमाळ जिल्ह्यात डॉक्टरांकडून एक धक्कादायक प्रकार घडल्याची माहिती उघडकीस येत आहे. यवतमाळमधील गळवा येथे डॉक्टरांकडून एका रुग्णाच्या आईला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, यवतमाळ येथील श्याम ज्ञानेश्वर तिजारे हा व्यक्ती काही दिवसांपासून वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयात उपचार घेत होता. मात्र, आज श्यामचे निधन झाले. दरम्यान, मृतक रूग्णाची आई अन्नपूर्णा तिजारे ही डॉक्टरांना बोलविण्यासाठी गेली असता तिला दोन डॉक्टरांनी मारहाण केली. या घटनेनं शासकीय रुग्णालयात खळबळ उडाली आहे. डॉक्टरांनी केलेली मारहाण तसेच दोन इंजेक्शन दिल्यामुळेच मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप अन्नपूर्णा तिजारे यांनी केला. मृत श्यामच्या आईने मुलाचे शव ताब्यात घेण्यास नकार देत मारहाण करणाऱ्या दोन्ही डॉक्टरांना त्वरीत निलंबित करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, मृत रुग्णाच्या आईशी डॉक्टरांनी गैरवर्तन केल्याची तक्रार ऑफिसमध्ये दाखल करण्यात आली आहे. रुग्णाला टीबी, डायबिटीज असून तीन दिवसापासून प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती नातेवाईकांना देण्यात आली होती. याप्रकरणाची सखोल चौकशी नेमण्यात आलेल्या समितीकडून करण्यात येत आहे. चौकशी अहवाल आल्यानंतरच संबंधित दोषींवर कारवाई करण्यात येईल, असे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. गिरीश जतकर यांनी सांगितले.