Monday, February 17, 2025
Homeसाप्ताहिकश्रध्दा-संस्कृतीभगवंताचे प्रेम वाढविण्याची कृती करावी!

भगवंताचे प्रेम वाढविण्याची कृती करावी!

अध्यात्म – ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराज

जगात देवाणघेवाण हा नियमच आहे. लाकडाचे दोन तुकडे जोडायचे असतील, तर प्रत्येकाचा थोडा थोडा भाग तासून नंतर एकमेकांत बसवितात आणि मग उत्तमरीतीने सांधा बसतो. त्याप्रमाणे प्रत्येक माणसाने आपापले दोष जर थोडे थोडे तासून टाकले, तर परस्पर प्रेमाचा सांधा खात्रीने उत्तम बसेल. याकरिता विचाराने आणि काळजीने वागणे जरूर आहे. घरामध्ये काय किंवा बाहेर काय, प्रेमाचा धाक असावा, भीतीचा धाक असू नये. जसे आई आणि मुलांचे प्रेम असते, तसेच भगवंतावर श्रद्धा ठेवावी. नेहमी आपले वर्तन चांगले ठेवावे.

असा नियम आहे की, ज्या भक्ताचे भगवंतावर प्रेम आहे, तो भजनामध्ये नाचत असताना त्याचा स्पर्श दुसऱ्याला झाला की, तोही भगवंताच्या भक्तीत तल्लीन होऊन नाचू लागतो. भगवंताचे प्रेम हे एक मोठे वेड आहे, ते ज्याला लाभेल, तो भाग्याचा खरा! एक भगवंताचे प्रेम लागले की, वाणीमध्ये सर्व चांगले गुण येतात. पुस्तके वाचून किंवा नुसत्या बुद्धीने जगाची अशाश्वतता केव्हाही कळणार नाही. भगवंताचे प्रेम वाढले की, ती आपोआप कळू लागते.

एखाद्या माणसाचे तोंड आल्यावर, पोटामध्ये भूक असूनसुद्धा त्याला खाता येत नाही किंवा अन्नाला चव लागत नाही. त्याचप्रमाणे आतमध्ये भगवंताचे प्रेम असून सुद्धा आपण बाहेर प्रपंचामध्ये आसक्त असल्यामुळे, भगवंताच्या नामाची गोडी वाटत नाही. तोंड बरे व्हायला, जसे प्रथम औषध घ्यावे, त्याचप्रमाणे नामाची गोडी यायला आपण प्रपंचाची आसक्ती कमी करावी.

ही प्रपंचाची आसक्ती सोडणे किंवा कमी करणे हे फार कठीण काम आहे, त्याकरिता भगवंताबद्दल आपलेपणा, अनुसंधान आणि सत्संग हेच तीन उपाय आहेत. भगवंत हा बहुरूपी आणि अनंत ठिकाणी नटणारा असा आहे म्हणून त्याच्या प्राप्तीसाठी अनंत साधने असली पाहिजेत. ज्याच्या त्याच्या मनोरचनेप्रमाणे जो तो आपले साधन करील. पण या सर्व साधनांमध्ये भगवंताचे प्रेम हे सर्वसामान्य असले पाहिजे. भगवंताचे प्रेम हे कोणत्याही साधनाचा प्राण आहे.

ते प्रेम मागण्यासाठी रोज भगवंताची प्रार्थना करावी. ज्याला भगवंताचे प्रेम येईल, तो सृष्टीकडे कौतुकाने पाहील. भक्त भगवंताच्या भक्तीत तल्ली झाला की, त्याच्याआड दुसरे काहीही येऊ शकत नाही. भगवंताच्या नामाला नीती हे पथ्य आहे. ते सांभाळून जो वागेल, त्याचे भगवंतावरचे प्रेम वाढेल. भगवंतावर अत्यंत निष्ठा ठेवा, प्रेम ठेवा. भगवंत हा कष्टसाध्य नसून सुलभसाध्य आहे. जो हिनाहून हीन आणि अडाण्यांतला अडाणी आहे, त्यालासुद्धा मिळणारा असा भगवंत आहे.

तात्पर्य : ज्याला भगवंताचे प्रेम यावे असे वाटते, त्याने नाम घेणे, हाच एक मार्ग आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -