आशिया खंडातील सगळ्यात मोठे धरण असलेल्या जिल्ह्यातच सर्वाधिक टँकर्सची गरज
छत्रपती संभाजीनगर : राज्यात उन्हाचा तडाखा बसत असून मराठवाड्याला (Marathwada) याचा भीषण फटका बसत आहे. मुंबईत पडलेल्या अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) मुंबईचे जनजीवन विस्कळीत केले तर दुसरीकडे मराठवाड्यात धरणे आटल्याने लोकांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. हवामानाची स्थिती बदलली असून कधी ऊन, कधी पाऊस याचा काहीच अंदाज बांधता येत नसल्याने लोकांचे हाल होत आहेत. राज्यात वळीव पावसाचा तडाखा सुरू असला, तरी पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष वाढत असून सध्या राज्यातील लहान मोठ्या धरणांमध्ये केवळ २५ टक्के पाणीसाठा आहे.
मराठवाड्यात पाणी संकट अधिकच गडद होत चालले आहे. धरणांतील पाणीसाठा कमी होत असल्याने टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे. मराठवाड्यातील ७ जिल्ह्यांत तब्बल १ हजार ७०६ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. सध्या राज्यातील मोठ्या प्रकल्पांमध्ये उपयुक्त पाणीसाठा केवळ २३.४३ टक्के असून, मागील वर्षीच्या तुलनेत १२ टक्क्यांनी कमी झाला आहे. मध्यम प्रकल्पांत ३५ टक्के, तर लघू पाटबंधारे प्रकल्पांत २७ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. अनेक गावांमध्ये विहिरी कोरड्या पडल्या आहेत. पाण्याविना शेततळी सुकली आहेत. तर ग्रामीण भागातील स्त्रिया दिवसभर पाणी कसं पुरवायचं याचे नियोजन करताना दिसत आहेत.
कोणत्या जिल्ह्यात किती टँकर्सने पाणीपुरवठा?
छत्रपती संभाजीनगर : ६५६ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.
जालना : ४८८ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.
बीड : ३८२ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.
परभणी : ५ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.
नांदेड : १६ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.
धाराशिव : १३१ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.
लातूर : २१ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.
आठ दिवसाला एक टँकर
छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात आशिया खंडातील सर्वात मोठे धरण ज्या पैठण तालुक्यामध्ये आहे त्या पैठण तालुक्यात सर्वाधिक टँकर्सची गरज निर्माण झाली आहे. पैठण तालुक्यातील १२४ घरं असलेल्या अब्दुलपुरतांडा गावात आठ दिवसाला एक टँकर पाणी येतं. या गावाच्या घराघरासमोर पाण्याचे ड्रम पाहायला मिळतात. या ड्रमची संख्या जवळपास ५०० आहे.