फेरीवाल्यांवर कारवाई करत तब्बल ‘इतका’ दंड केला वसूल
पुणे : रेल्वे गाड्या आणि स्थानकांमध्ये अनधिकृत फेरीवाल्यांचा मोठ्या प्रमाणात सुळसुळाट दिसून येतो. या अनधिकृत फेरीवाल्यांकडून प्रामुख्याने खाद्यपदार्थांची विक्री केली जाते. हे खाद्यपदार्थ चांगल्या दर्जाचे नसल्यामुळे प्रवाशांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे आता रेल्वे सुरक्षा दलासह वाणिज्य विभागाने अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. यामध्ये ५६० फेरीवाल्यांना पकडून त्यांच्याकडून तीन लाखांहून अधिक दंड वसूल करण्यात आला आहे. मध्य रेल्वेमध्ये रेल्वे सुरक्षा दल आणि रेल्वेच्या वाणिज्य विभागाने गाड्या, स्थानकांवर अनधिकृत फेरीवाल्यांविरुद्ध कारवाईची मोहीम राबवली.
या मध्ये पुणे, दौंड, मिरज, सातारा, अहमदनगर, कोपरगाव, बेलापूर या प्रमुख स्थानकांवर कारवाई करण्यात आली. विनापरवाना खाद्यपदार्थ, बाटलीबंद पाणी विकणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली. या मोहिमेमध्ये २७ एप्रिल ते १२ मे या कालावधीत ५६० फेरीवाल्यांना पकडण्यात आले. त्यातील ३५१ फेरीवाल्यांवर न्यायालयात खटला दाखल करून त्यांच्याकडून तीन लाख १७ हजार ४२५ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच फेरीवाल्यांकडून एक हजार ९४५ पाण्याच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. याशिवाय रेल्वेच्या अधिकृत स्टॉलवर खाद्यपदार्थ आणि पाण्याच्या बाटल्यांची जास्त किमतीने विक्री करणाऱ्या विक्रेत्यांकडून ६० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
पुणे रेल्वे स्थानक परिसरात विक्रेते छापील किमतीऐवजी जास्त पैसे प्रवाशांकडून उकळत आहेत. त्याचबरोबर अनधिकृत कंपन्यांच्या उत्पादनांची विक्री केली जात असल्याच्या तक्रारी अनेक प्रवाशांनी केल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांची लूट करणारे विक्रेते आणि फेरीवाले यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.