
जाणून घ्या सविस्तर माहिती
मुंबई : नवे आर्थिक वर्षात अनेक बँकांकडून अनेक बदल करण्यात आले होते. याच नव्या आर्थिक वर्षातील दुसऱ्या महिन्यात भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांसाठी एक आनंदाची बातमी हाती लागली आहे. गेल्या वर्षभराच्या काळात सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी मोठ्या प्रमाणात नफा (Profit) कमवला आहे. या बँकांनी मागील वर्षभरात १.४ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त नफा मिळवला आहे. त्यामुळे सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची स्थिती चांगली असल्याचे दिसून येते.
मिळालेल्या माहितीनुसार, अलिकडच्या काळात सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचा नफा वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. २०२२-२३ मध्ये एकूण नफा हा १,०४,६४९ कोटी रुपयांचा मिळाला आहे. गेल्या वर्षभरात सार्वजनिक क्षेत्रातील १२ बँकांपैकी ११ बँकांच्या नफ्यात वाढ झाली असून केवळ एका बँकेची घट झाली असल्याची माहिती मिळाली आहे.
'या' बँकेच्या नफ्यात किती झाली वाढ
- दिल्लीच्या पंजाब नॅशनल बँकेचा निव्वळ नफा २२८ टक्क्यांनी वाढून ८२४५ कोटी रुपये झाला आहे.
- युनियन बँक ऑफ इंडियाच्या नफ्यात ६२ टक्क्यांची वाढ झालीय. एकूण नफा हा १३,६४९ कोटी रुपये झाली आहे.
- सेंट्रल बँक ऑफ इंडियाचा नफा ६१ टक्क्यांच्या वाढीसह २,५४९ कोटी रुपये झाला आहे.
- बँक ऑफ इंडियाच्या नफ्यात ५७ टक्क्यांची वाढ झाली आहे. बँकेनं ६,३१८ कोटी रुपयांचा नफा कमावला आहे.
- बँक ऑफ महाराष्ट्रच्या नफ्यात ५६ टक्क्यांची वाढ झालीय. या बँकेनं ४०५५ कोटी रुपयांचा नफा मिळवला.
- चेन्नईच्या इंडिया बँकेने ५३ टक्क्यांच्या वाढीसह ८,०६३ कोटी रुपयांचा नफा मिळवला.
- बँक ऑफ बडोदाने आणि कॅनरा बँकेनं देखील १०,००० कोटींहून अधिक नफा मिळवला आहे.
स्टेट बँक इंडिया आघाडीवर
२०२३-२४ या आर्थिक वर्षात मिळवलेल्या नफ्यात स्टेट बँक इंडिया (SBI) ही बँक सर्वात आघाडीवर आहे. १,४१,२०३ कोटी रुपयांच्या नफ्यात स्टेट बँक इंडियाचा वाटा हा ४० टक्क्यांहून अधिक आहे. एसबीआयने २२ टक्के अधिक नफा मिळवला असून हा नफा ६१,०७७ कोटी रुपये असल्याची माहिती मिळाली आहे.
या बँकेच्या नफ्यात झाली घट
दरम्यान, पंजाब आणि सिंध बँकेचा वार्षिक निव्वळ नफा ५५ टक्क्यांनी घसरुन या बँकेचा नफा ५९५ कोटी रुपयांवर आला आहे. त्यामुळे या बँकेच्या नफ्यात मोठी घट झाली आहे.