सुरक्षेच्या कारणास्तव घेतली खबरदारी
मुंबई : देशभरात निवडणुकीची (Loksabha Election 2024) रणधुमाळी सुरु आहे. सर्व पक्षातील दिग्गज नेत्यांकडून प्रचाराचा धडाका लावला जात आहे. अशातच निवडणुकीचे चारही टप्पे पार पडले असून आता पाचव्या टप्प्यासाठी सर्व पक्ष सज्ज झाले आहेत. मुंबईत २० मे रोजी पाचव्या टप्प्यात मतदान होणार असून मतदानाला केवळ चार दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे मुंबईत सर्व पक्षांकडून प्रचाराला जोर देण्यात आला आहे.
या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील महायुती उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज मुंबई दौऱ्यावर आले आहेत. पंतप्रधानांचा आज मुंबईत रोड शो होणार आहे, तर उद्या शिवाजी पार्कवर सभा होणार आहे. मोदी यांच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा सज्ज झाली असून मुंबईतील अनेक ठिकाणी वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबईत आज सायंकाळी रोड शो होत असून या रोड शोसाठी ‘मेट्रो १’च्या प्रवाशांना वेठीस धरण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या सूचनेनुसार मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेडने (एमएमओपीएल) ‘घाटकोपर – अंधेरी – वर्सोवा मेट्रो १’ मार्गिकेवरील जागृती नगर स्थानक – घाटकोपर स्थानकांदरम्यानची सेवा सायंकाळी ६ वाजल्यापासून पूर्णत: बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईकरांची गैरसोय होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येते.