Monday, April 21, 2025
HomeदेशPM Narendra Modi : नकली शिवसेना, नकली राष्ट्रवादीचं काँग्रेसमध्ये विलीनीकरण नक्की!

PM Narendra Modi : नकली शिवसेना, नकली राष्ट्रवादीचं काँग्रेसमध्ये विलीनीकरण नक्की!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नाशिकमधून घणाघात

एक नेता कृषी मंत्री असताना सरकारने शेतकऱ्यांची अजिबात चिंता केली नव्हती; नाव ने घेता मोदींनी केली शरद पवारांवर टीका

नाशिक : लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात प्रचाराचा रंग आणखी चढू लागला आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडण्याची एक संधी सोडत नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनीही देशभरात प्रचारसभांचा धडाका लावला आहे. आज नाशिकच्या पिंपळगाव येथे महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे (Hemant Godse) आणि भारती पवार (Bharti Pawar) यांच्या प्रचारार्थ सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला अनेक दिग्गज नेत्यांची उपस्थिती होती. पंतप्रधान मोदींनी या सभेत काँग्रेस आणि विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. ‘नकली शिवसेना, नकली राष्ट्रवादीचे काँग्रेसमध्ये विलीनीकरण नक्की होणार’, असा घणाघात त्यांनी केला.

लोकसभा निवडणुकीनंतर शरद पवार गटाचे काँग्रेसमध्ये विलिनीकरण होऊ शकते. तसेच अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केले होते. या वक्तव्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर जोरदार निशाणा साधला. मोदी म्हणाले, ‘तुम्ही मागील १० वर्षात माझे काम पाहिले आहे. मी आज तुमच्याकडे तिसऱ्या टर्मसाठी आशीर्वाद मागण्यास आलो आहे. काँग्रेसचे इतके हाल आहेत की, त्यांचे महाराष्ट्रातील एक नेते म्हणतायत मतदान संपल्यावर काँग्रेसमध्ये विलीन होऊन जावे. आपले दुकान बंद करावे. त्यांना वाटते की, सगळे एकत्र आले की विरोधक बनतील, असे त्यांचे हाल आहेत’, असा टोला पंतप्रधान मोदींनी शरद पवारांना लगावला.

नकली शिवसेना विलिन झाली की बाळासाहेबांची आठवण येईल

नकली शिवसेना आणि नकली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काँग्रेसमध्ये विलीनीकरण हे नक्की आहे. मात्र ज्या दिवशी नकली शिवसेनेचे विलीनीकरण हे काँग्रेसमध्ये होईल, त्या दिवशी मला सर्वात जास्त बाळासाहेब ठाकरेंची आठवण येईल.बाळासाहेब म्हणायचे की, ज्या दिवशी शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन होईल, त्या दिवशी मी माझ्या दुकानाचे शटर खाली घेईन. मात्र आता विनाश होत आहे. आता नकली शिवसेनेचे अस्तित्व राहणार नाही. असा हल्लाबोल मोदींनी केला.

नकली शिवसेनेने काँग्रेससमोर गुडघे टेकले

पुढे ते म्हणाले, बाळासाहेबांचे स्वप्न होते की, अयोध्येत राम मंदिर उभारले जावे. मात्र काँग्रेसने प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला पाठ दाखवली. नकली शिवसेनेने काँग्रेससमोर गुडघे टेकले आहेत. जम्मू-काश्मीर मधून कलम ३७० काढून टाकावे हे बाळासाहेबांचे स्वप्न होते. हे स्वप्न पूर्ण झाले. मात्र, त्यामुळे सगळ्यात जास्त राग नकली शिवसेनेला येत असल्याचा आरोप नरेंद मोदी यांनी केला आहे.

वीर सावरकरांचा उल्लेख करत ठाकरे गटावर टीका

वीर सावरकरांना दिवसरात्र शिव्या देणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांना तुम्ही नकली शिवसेना डोक्यावर घेऊन फिरत आहात, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. हे सर्व पाहिल्यानंतर महाराष्ट्रातील नागरिकांच्या मनामधील राग हा सर्वोच्च पातळीवर पोहोचला आहे. मात्र आपल्या अहंकारात नकली शिवसेनेचे नेत्यांना महाराष्ट्रातील जनतेच्या लोकांचा राग दिसत नसल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले. त्यामुळे आता नकली शिवसेनेला शिक्षा करण्याचे महाराष्ट्रातील जनतेने ठरवले आहे. आतापर्यंत झालेल्या चार टप्प्यात निवडणुकीत यांना धोबीपछाड देण्याचे काम मतदारांनी केले असल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे.

शरद पवारांचे नाव न घेता काँग्रेस सरकारवर टीका

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी आमचा दहा वर्षातील कार्यकाळ पाहिला आहे. तसेच याआधी काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या सरकारचा कार्यकाळ देखील शेतकऱ्यांनी पाहिला आहे. त्या काळात तर महाराष्ट्रातील एक नेताच देशाचे कृषी मंत्री होते. मात्र, त्या कार्यकाळात सरकारने शेतकऱ्यांची अजिबात चिंता केली नव्हती. आज पीएम किसान सन्मान निधीच्या माध्यमातून दरवर्षी १२ हजार रुपये शेतकऱ्यांना मिळत आहेत. म्हणजेच येणाऱ्या पाच वर्षात कमीत कमी साठ हजार रुपये शेतकऱ्यांना मिळणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले.

कांद्याचा बफर स्टॉक तयार केला, निर्यातीत वाढ झाल्याचाही दावा

काँग्रेस सरकारच्या काळात शेतकऱ्यांसाठी खोटे पॅकेज जाहीर होत होते. या पॅकेजमधून शेतकऱ्यांना एक रुपया देखील मिळत नव्हता. नाशिक आणि हा परिसर कांदा आणि द्राक्षं शेतीसाठी प्रसिद्ध आहे. देशामध्ये पहिल्यांदाच कांद्याचा बफर स्टॉक तयार करण्याची व्यवस्था आमच्या सरकारने सुरू केली. या आधी देशात अशी कोणतीच व्यव्यस्था नव्हती. गेल्यावर्षी शेतकऱ्यांकडून सात लाख टन कांदा खरेदी केला आहे. आता पुन्हा पाच लाख टन कांदा ठेवण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. गेल्या काही वर्षात कांदा निर्यातीमध्ये ३५ टक्के वाढ झाली आहे. कांदा निर्यातीवर लावण्यात आलेले बंदी आता उठवण्यात आली आहे. तसेच कांदा निर्यातीवर देखील सरकार सबसिडी देत असल्याचे नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -