मविआतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर
मुंबई : लोकसभा निवडणुका (Loksabha Election) जाहीर झाल्यापासून मविआतील (Mahavikas Aghadi) धुसफूस कायम बाहेर येत राहिली आहे. त्यातच आता मतदान शेवटच्या टप्प्यात पोहोचलं असतानाही मविआत मतभेद असल्याचं दिसून येत आहे. मविआमधील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. दक्षिण-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील ठाकरे गटाचे (Thackeray Group) उमेदवार अनिल देसाई (Anil Desai) चेंबूर पांजर पोळ परीसरात प्रचारासाठी आले असताना स्थानिक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांना विरोध केला आणि बाचाबाची करत त्यांना निघून जाण्यास सांगितले.
ठाकरे गटाचे उमेदवार अनिल देसाई हे ठिकठिकाणी सभा आणि बैठका घेत आहेत. चेंबूरमधील पांजर पोळ या ठिकाणी ते गेले असता काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा आणि अनिल देसाईंच्या कार्यकर्त्यांचा वाद झाला. अनिल देसाईंनी या ठिकाणाहून निघून जावं, त्यांनी या ठिकाणी प्रचाराला येऊ नये अशी स्थानिक नागरिक आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी मागणी केली. त्यानंतर दोन्ही गटामध्ये काहीवेळ बाचाबाची झाली.
हा नेमका वाद काय किंवा अनिल देसाईंनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी विरोध का केला हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र शिवसेना आणि काँग्रेसमध्ये हा वाद जुना असून त्यातूनच ही घटना घडल्याचं सांगितलं जातंय. निवडणुकीला आता अवघे चारच दिवस राहिले असताना काँग्रेस आणि ठाकरे गटातील हा वाद चव्हाट्यावर आला आहे. त्यामुळे हा वाद मिटवण्यासाठी दोन्ही पक्षांकडून काय पावलं उचलली जातात हे पाहावं लागेल.