बावनकुळेंनी दिले शिवतीर्थवर जात पंतप्रधानांच्या सभेचे निमत्रंण
मुंबई : राज्यात लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) अखेरच्या पाचव्या टप्प्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेची तयारी मुंबईत सुरू झाली आहे. तत्पूर्वी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी जात त्यांची भेट घेतली.
या भेटीनंतर चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, १७ तारखेला दादरच्या शिवाजी पार्कवर महायुतीची रॅली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या सभेला असतील. त्यासाठी मी स्वत: राज ठाकरेंना निमंत्रित करण्यासाठी आलो आहे. राज ठाकरेंनी निमंत्रण स्वीकारले आहे. राज्याच्या निवडणुकीत राज ठाकरेंचा महत्त्वाचा वाटा राहिला आहे. मोदींच्या विकसित भारताच्या संकल्पनेला राज ठाकरेंनी साथ दिली आहे. त्यामुळे त्यांचे आभारही मानले. मुंबईच्या निवडणुकीत त्यांची भूमिका महत्त्वाची आहे. पुण्यात राज ठाकरेंच्या आवाहनामुळे मोठा फायदा झाला आहे, असे त्यांनी सांगितले.
तसेच राज ठाकरेंच्या पाठिंब्यामुळे महायुतीला बळ मिळाले. पुढील काळातही आम्हाला बळ मिळेल. राज ठाकरे १७ तारखेला त्यांची भूमिका सभेतून मांडतील. राज ठाकरेंनी अत्यंत महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. त्यांच्या भूमिकेने महायुतीला बळ मिळाले आहे, हे महाराष्ट्रासाठी महत्त्वाचे असल्याचे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, मुंबईत जी दुर्घटना घडली, त्यासाठी सरकार जे जे शक्य आहे. ते सर्व करत आहे. जे या घटनेसाठी दोषी आहेत, त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला आहे. मोदींचा रोड शो, नियोजित पंतप्रधानांचा दौरा या दुर्घटनेशी जोडण्याचा प्रयत्न करत आहेत. या घटनेची संवेदना सगळ्यांना आहे. मुंबईतील अनधिकृत होर्डिंगविरोधात कारवाई सुरू झाली आहे. अशी घटना पुन्हा घडू नये यासाठी काळजी घेतली पाहिजे, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले.
मविआला जनतेने नाकारले
२४० जागा लढवणारी काँग्रेस पंतप्रधानपदाची स्वप्ने पाहत आहे. विरोधी पक्षनेता बनवण्याची स्थितीही त्यांची राहणार नाही, अशी परिस्थिती देशात आहे. महाविकास आघाडीला लोकांनी नाकारले आहे. सुप्रिया सुळे बारामतीत पराभूत होणार असल्याचे हे शरद पवारांना कळले आहे. ४ जूननंतर काही लोक अज्ञातवासात जातील. महाराष्ट्रातील ६ पैकी २ पक्ष बंद पडतील, हे पृथ्वीराज चव्हाणांनी मान्य केले. शरद पवारांची तुतारी, उद्धव ठाकरेंची मशाल या महाराष्ट्राच्या राजकारणात दिसणार नाही, असे चव्हाणांनी संकेत दिले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी शरद पवारांनी विलीनीकरणाची भाषा केली.