नागरिकांना हवामान खात्याचा सावधानतेचा इशारा
मुंबई : राज्यातील अनेक जिल्ह्यांना काही दिवसांपासून पडणाऱ्या अवकाळी पावसाने झोडपून काढले आहे. त्यामुळे राज्यात उष्णतेचा जोर ओसरला आहे. या अवकाळी पावसामुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे आणि घरांचे मोठे नुकसान झाले आहे. अशातच हवामान खात्याने (Meteorological Department) राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी, असे आवाहन हवामान खात्याकडून केले जात आहे.
मुंबई हवामान खात्याने आज आणि उद्याच्या हवामानाचा अंदाज वर्तवला आहे. त्यानुसार, दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर उत्तर कोकण आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
बुधवारचा हवामानाचा अंदाज
उद्या रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, अहमदनगर, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, सातारा, बीड, धाराशिव आणि जालना या जिल्ह्यातल्या तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट आणि वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. यावेळी ४० ते ५० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. तर नाशिक, जळगाव, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट, मेघगर्जना, गारपीट आणि वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. यावेळी ५० ते ६० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.