Saturday, July 6, 2024
Homeसंपादकीयतात्पर्यविवेकानंद वैद्यक प्रतिष्ठान, सांगली

विवेकानंद वैद्यक प्रतिष्ठान, सांगली

सेवाव्रती: शिबानी जोशी

‘वैद्यकीय सेवेतून सामाजिक परिवर्तन’ हे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेऊन  १२ जानेवारी २००१ रोजी सांगली येथे विवेकानंद वैद्यक प्रतिष्ठानची स्थापना झाली.  डॉ. राम लाडे आणि इतर कार्यकर्त्यांच्या प्रयत्नातून संस्था सुरू झाली; परंतु केवळ आरोग्यविषयक सेवा देऊन सर्वांगीण विकास होणार नाही, तर सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक विकास व परिवर्तनही होणं गरजेचं आहे, हे लक्षात घेऊन संस्थांमार्फत हळूहळू विविध क्षेत्रातील उपक्रम हाती घेण्यात येऊ लागले. महिला बचत  गटातर्फे ग्रामीण महिला आर्थिक सक्षम होऊ शकतात हे लक्षात आल्यामुळे संस्थेमार्फत बचत गट चालवले जाऊ लागले. सध्या संस्थेकडून संचलित केल्या जाणाऱ्या महिला बचत गटांची संख्या ५५ आहे. त्याचा किमान १००० ते १५०० महिलांपर्यंत फायदा पोहोचत आहे. बचत गटातून आर्थिक मदत दिल्यामुळे अनेक महिलांनी त्यांचे स्वतंत्र व्यवसाय सुरू केले आहेत.

आरोग्य मित्र ही संकल्पना ग्रामीण भागात सुरू करण्यात आली आहे. फिरता दवाखाना पोहोचत असला तरी उर्वरित काळामध्ये  प्रथमोपचार पुरवण्याची गरज पाहून  गावातीलच सामाजिक बांधिलकीची जाणीव असणारे तरुण-तरुणींची निवड करून त्यांना प्राथमिक उपचाराचे प्रशिक्षण दिले जाते व प्रथमोपचार पेटी दिली जाते. प्रथमोपचार पेटीमध्ये ताप, उलटीवरचे औषध, ओआरएस, होमिओपॅथीक, आयुर्वेदिक औषध तसेच मलमपट्टी, ड्रेसिंगचे साहित्य असे मूलभूत गरजेच सामान असते. त्याचा खूप चांगला उपयोग गावात होतो असे दिसून आले आहे. ज्या गावांमध्ये कोणत्याही वैद्यकीय सेवा उपलब्ध नाहीत अशा ठिकाणी आरोग्य मित्राची नेमणूक केली जाते. आतापर्यंत संस्थेचे आरोग्यमित्र ३० वाड्या वस्त्यांवर प्रथमोपचाराचे काम करत आहेत. आरोग्य मित्रांना अपडेट ठेवण्यासाठी तीन महिन्यांतून एकदा आरोग्य मित्रांची बैठक बामणोली येथील विवेकानंद रुग्णालय येथे घेतली जाते व आरोग्यमित्रांचे प्रशिक्षण वर्ग नियमित घेतले जातात, उपचार केलेल्या रुग्णांचे तपशील नोंदवून ठेवले जातात.

आज समाजात एकत्र कुटुंब पद्धती लयास चालली आहे. एकल कुटुंब झाल्यामुळे आजारी किंवा ज्येष्ठांची सेवा करायला वेळ नसतो. बऱ्याच वेळा रुग्णालयातील उपचार संपल्यानंतर रुग्णाला घरामध्ये सुश्रूषा गरजेची असते. पण अशा रुग्णांना योग्य ती सुश्रूषा मिळणे दुरापास्त होते. ही समस्या ओळखून  अशा कौशल्य असणाऱ्या व्यक्तींची, नर्सेसची योजना करून या रुग्णांना योग्य ती सुश्रूषा घरी येऊन मिळेल अशी व्यवस्था विवेकानंद वैद्यक प्रतिष्ठानने केली आहे. स्वल्पविराम प्रकल्प हा संस्थेचा खूपच आगळा-वेगळा प्रकल्प आहे. कुटुंबातील  सदस्याला काही  महत्त्वाच्या कारणानिमित्त परगावी जायचे असते पण ज्येष्ठांची अडचण होते किंवा घरातील ज्येष्ठांची काळजी वाटल्यामुळे तो बाहेरगावी जाऊ शकत नाही. ही समस्या ओळखून ही योजना सुरू केली आहे. घरातील ज्येष्ठ व्यक्तींना संस्थानकडे स्वल्पविराम या योजनेखाली सोपवून जाऊ शकतात अशी योजना सुरू केली आहे. या ज्येष्ठ व्यक्तींची सुश्रूषा, देखभाल, त्यांचे आहार, निवास हे संस्थेमार्फत केले जाते.

विवेकानंद रुग्ण साहित्य केंद्र या प्रकल्पाअंतर्गत गरजू रुग्णांना थोड्या अवधीसाठी वैद्यकीय उपकरणे लागतात. त्यांना योग्य ती अनामत शुल्क घेऊन तात्पुरत्या काळासाठी यॉकर, एअर बेड, ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर, यासारखे रुग्ण साहित्य घरी वापरासाठी दिले जाते. ते मुद्दाम विकत घेण्याची गरज लागत नाही. या प्रकल्पाचा लाभ अनेक रुग्णांना झाला आहे. ज्येष्ठांसाठी निरामय योजना सुरू केली  आहे. या योजनेचे मुख्य उद्दिष्ट एकट्या असणाऱ्या ज्येष्ठांना, निवृत्त नागरिकांना घरपोच आरोग्यसेवा देणे हे आहे. ज्येष्ठ किंवा निवृत्त माता-पित्यांची मुले परदेशस्थ किंवा दुसऱ्या राज्यांमध्ये नोकरीनिमित्त जातात व  ज्येष्ठांचा आरोग्याचा प्रश्न गंभीर होत जातो. ही अडचण लक्षात घेऊन विवेकानंद वैद्यक प्रतिष्ठानने ज्येष्ठांसाठी निरामय आरोग्य योजना निर्माण करत आहे. यामध्ये दर आठवड्याला प्रतिष्ठानमार्फत वैद्यकीय अधिकारी नोंदणी केलेल्या ज्येष्ठांच्या घरी जाऊन आरोग्य तपासणी करेल व योग्य तो उपचार अथवा सल्ला देण्यात येईल. संस्थेच्या अखंडित सेवाव्रतास अनुसरून या ज्येष्ठ नागरिकांना ही वैद्यक सेवा उपलब्ध करून देण्याचे विवेकानंद वैद्यक प्रतिष्ठानने ठरवले आहे.

आरोग्याचा पिण्याच्या पाण्याशी खूप जवळचा संबंध आहे. स्वच्छ पेय जल योजनेअंतर्गत पाच खेड्यांमध्ये आर. ओ. मशीन बसविण्यात आली आहेत. निलजी बामणी, जुनी धामणी, सावळवाडी, माळवाडी, बामणोली या गावांत ही मशीन लावली आहेत. ॲनिमिया  इरेडिकेशन प्रकल्प विद्यार्थ्यांसाठी सुरू केला आहे. या प्रकल्पाअंतर्गत शालेय मुलींची हिमोग्लोबीन तपासणी करण्यात येते. आतापर्यंत ५००० मुलींची  तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये ४०% पेक्षा जास्त मुलींचे हिमोग्लोबिन सामान्य पातळीपेक्षा कमी असल्याचे आढळल्यामुळे रक्त वाढीसाठी आवश्यक असणाऱ्या लोहयुक्त गोळ्यांचे वितरण प्रतिष्ठानने मोफत केले आहे. त्याचा नियमित पाठपुरावाही घेतला जातो.

सांगली शहराच्या जवळपास औद्योगिक क्षेत्र आहे. एमआयडीसीमध्ये असणारा कामगार वर्ग हा बहुतेक वेळा परराज्यातून आलेला असतो. कोविड काळामध्ये बरेचसे कारखाने हे बंद झाल्यामुळे बेरोजगारीचे संकट उभे ठाकले होते, म्हणून परराज्यातील कामगार परत जाऊ लागले होते; परंतु टाळेबंदीमुळे व लॉकडाऊनमुळे अशा कामगारांची उपासमार होऊ लागलेली दिसून आली. त्यासाठी विवेकानंद वैद्यक प्रतिष्ठानने ५००० पेक्षा जास्त धान्याचे किट्स व इतर जीवनोपयोगी वस्तूंचे किट तयार करून अशा कामगारांमध्ये त्याचे वाटप केले होते. महिलांना मासिक पाळी काळामध्ये घ्यायच्या काळजीसाठी मेन्स्ट्रअल हायजिन या विषयावर प्रबोधन करण्यासाठी स्त्रीरोग तज्ज्ञांची व्याख्याने आयोजित केली जातात. तसेच सॅनिटरी नॅपकिनचेही वितरण केले जाते. वर्षभर संस्थेचे डॉक्टर, अधिकारी, आरोग्य रक्षक खूप काम करतात. त्यांच्या अनुभवाची माहिती लोकांना व्हावी यासाठी  सेवासरिता  हे विवेकानंद वैद्यक प्रतिष्ठानचे वार्षिक प्रकाशन  निघते.

स्नेहसदन प्रकल्प प्रस्तावित असून संस्थेने नवीन खरेदी केलेल्या जागेमध्ये हा प्रकल्प उभा करण्याचे नियोजन आहे. अंथरुणाला खिळलेल्या रुग्णांची सुश्रूषा करण्यासाठीची सुविधा या प्रकल्पांतर्गत उपलब्ध होणार आहे. सध्याच्या काळामध्ये एकल कुटुंब पद्धती दिसून येत आहे. त्यामुळे घरातील एखादी व्यक्ती आजारी पडल्यानंतर जर अंथरुणालाच खिळली व त्याचे रुग्णालयातील उपचार पूर्ण झाले असतील. त्यावेळी त्या व्यक्तीची सुश्रूषा घरामध्ये करण्यासाठी मनुष्यबळ नसते. या समस्येवर समाधान म्हणून हा प्रकल्प उभा करण्याचे नियोजन आहे. भविष्यात विवेकानंद वैद्यक प्रतिष्ठानतर्फे अनेक उपक्रम हाती घेतले जाणार आहेत. सावळी हद्दीमध्ये संस्थेने दोन मोठ्या जागा घेतल्या आहेत. त्यापैकी एका जागेवर स्नेहसदन,  तर दुसऱ्या जागेवर ए.एन.एम., जी.एन.एम. नर्सिंग कॉलेज, स्किल डेव्हलपमेंट कोर्सेस यांची इमारत व गरीब मुलींसाठी होस्टेलची सोय करण्यात येणार आहे.

भविष्यामध्ये पॅरामेडिकल किंवा पॅरा वैद्यकीय क्षेत्रामध्ये लागणाऱ्या मनुष्यबळाच्या कमतरता ओळखून संस्थेतर्फे  विशेषतः ग्रामीण भागातील मुला-मुलींना या क्षेत्रातील कौशल्य प्राप्त व्हावे या दृष्टीनेच हा प्रकल्प उभा करण्यात येणार आहे. याशिवाय विवेकानंद रुग्णालयामध्ये हृदयाच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी कॅथलॅब सुरू करण्यात येणार आहे. हृदयविकाराच्या शस्त्रक्रिया खूप खर्चिक असतात. विवेकानंद रुग्णालयाचे धोरण कमीत कमी खर्चात उपचार असे असून त्या दृष्टीने अँजिओप्लास्टी, अँजिओग्राफी असे उपचार कमीत कमी खर्चात रुग्णांना उपलब्ध व्हावेत असा संस्थेचा मानस आहे. अनेक गावांमध्ये मोतीबिंदूचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळतात. अशा रुग्णांसाठी प्रोजेक्ट दृष्टी या प्रकल्प अंतर्गत मोफत ऑपरेशन करून दिली जाणार आहेत.

अनेक गावांमध्ये महिलांमध्ये रक्ताल्पता, पुरुषांमध्ये व्यसनाधीनता, मधुमेह, ब्लडप्रेशर, कॅन्सर असे आजार वाढताना दिसत आहेत. अशा दहा गावांचा एक गट करून त्या गटाला Cluster of Healthy villages म्हणून विकसित करण्यात येणार आहे. अशा गावांमध्ये  कुटुंबाचे सर्वेक्षण करून गरजेप्रमाणे औषध, उपचार व रुग्णालयात दाखल करण्याची सोय तसेच व्याख्याने, जागरणात्मक कार्यक्रम, आरोग्य शिबिरे, जलसाक्षरता, ऊर्जा साक्षरता, प्लास्टिक कचरा निर्मूलन अशा बहुआयामी उपक्रमाची सुरुवातही करण्यात येणार आहे. शिवाय सांगली जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये किमान एक फिरता दवाखाना सुरू करण्याची योजनाही आहे.

सांगली व मिरज शहरांमध्ये असलेल्या ५६ झोपडपट्ट्यांमध्ये फिरता दवाखाना, आरोग्य मित्र व संस्कार वर्ग हे उपक्रम राबविण्यात येणार आहेत. संस्थेकडे सध्या दोन फिरते दवाखाने असून तीस वाड्या वस्त्यांवर व गावांमध्ये हा उपक्रम राबविण्यात येत आहे. संस्थेचा याबाबतीतला अनुभव अत्यंत मोलाचा असून आजपर्यंत तीन लाखांपेक्षा जास्त रुग्णांवर या दवाखान्यामार्फत मोफत उपचार केले गेले आहेत. याच पद्धतीचे दवाखाने सर्व तालुक्यांमध्ये व्हावेत असा संस्थेचा प्रयत्न आहे. या सर्व प्रकल्पांना लागणारे मनुष्यबळ त्यांचे प्रशिक्षण, निधी दानशुरांकडून मिळतच असतो. हे सर्व उपक्रम पुढच्या तीन वर्षांत करण्याचा संस्थेच्या विश्वस्त मंडळाचा मानस आहे. चांगल्या हेतूने सुरू केलेल्या कामासाठी हजारो हात सहकार्य देतात हे आपण पाहतोच. त्यामुळे येत्या तीन वर्षांत हे सर्व प्रकल्प सुरू होऊन सांगली जिल्ह्यातील सर्व स्तरातील लोकांचा सामाजिक, आर्थिक, आरोग्यविषयक विकास व्हायला मदत होईल हे नक्की.
joshishibani@yahoo. com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -