Tuesday, July 9, 2024
Homeसंपादकीयविशेष लेखआता यावा वळीव...!

आता यावा वळीव…!

स्वाती पेशवे

केवळ पूर आणतो तोच पाऊस नव्हे, तर उन्हाचा कलता ताण सहन करण्याची शक्ती वा ऊर्मी देतो तो देखील पाऊसच असतो. वळवाची आस असते ती यासाठी. करपून निघालेली सृष्टी आणि दृष्टीला हलकासा झोका देऊन जाणारा वळीव सर्जनाची चाहुलही देतो. म्हणूनच तो अधिक आश्वासक भासतो. आताही अनेकांना अशाच वळवाची प्रतीक्षा आहे. उन्हाने सर्वोच्च उंची गाठलेली असताना धग शांत करण्यासाठी वळीव यायलाच हवा…

एप्रिल-मे महिन्याच्या कडक उन्हाळ्यात जीवाला गारवा देणारा आणि अनेकांची धांदल उडवणारा वळवाचा पाऊस अनेकांना वाट बघायला लावतो. आताही सगळ्यांनाच त्याची प्रतीक्षा आहे, कारण उन्हाने हैदोस घातला आहे. सूर्य जणू आग ओकतोय. अनेक भागांत तापमान ४५ अंशांच्या पुढे जाऊ पाहतंय. अशा त्रस्त शारीरिक आणि मानसिक अवस्थेत वळवाच्या पावसाचाच काय तो दिलासा… आकाशातले काळे ढग, बेभान वारं, हवेत पसरणारा किंचितसा पण सुखद गारवा असं वातावरण तयार झालं की वळवाचा पाऊस आलाच म्हणून समजायचं. वळवाचा पाऊस येणार असला की इतके दिवस निळंभोर दिसणारं आभाळ एकदम काळंसावळं होतं, मळभ दाटून येतं. बघता बघता पाणीदार थेंब धरणीवर पडायला लागतात आणि अत्यानंदानं ‘आला, आला, वळवाचा पाऊस आला’ असं म्हणत सगळे या पावसाचा आनंद लुटण्यास सज्ज होतात. पाऊस जणू सगळ्यांची मनधरणी ऐकतो आणि प्रत्येकालाच आनंद देऊन जातो.

उन्हानं तापून तापून लाल पडलेली माती पाण्याचे थेंब अधाशासारखी घ्यायला लागते. ध्यानीमनी नसताना अचानक आलेला हा खास पाहुणा, वळवाचा पाऊस, जणू सगळ्यांसाठी नजराणाच घेऊन येतो. त्याच्या आगमनाने हिरव्यागार पानांवर टपोरे मोती झुलायला लागलेत असं वाटतं. एका मोहक सुगंधात सगळा आसमंत दरवळून निघतो. भिजलेल्या मातीच्या वासाने मन वेडं होतं.

या पावसामध्ये निवाऱ्याला उभ्या राहणाऱ्यांपेक्षा अंगावर पाऊस झेलणारेच जास्त दिसतात. त्याच्याशी आनंदाने मैत्री करणारे, ओंजळीत गारा वेचून मध्येच तोंडात टाकणारे असे सगळेच पाऊस खूप ‘एंजॉय’ करतात. लहानपणी पावसात भिजण्यात वाटणारा आनंद मोठेपणीही तितकाच असतो. बाहेर कोसळणारा पाऊस आणि मिळालेला निवांतपणा यांसारखं सुख नाही. कोसळणाऱ्या पावसाचा मनमुराद आनंद घेण्याची प्रत्येकाची पद्धत वेगळी असते. दर वेळेस भिजूनच पावसाचा आनंद घ्यावा असं काही नाही. थोडं अलिप्त राहून पावसाचं निरीक्षण करण्यातही वेगळीच मजा असते. पण पहिल्या पावसात भिजायचं असतं. पावसाळा सुरू झाला की ‘भिजू नका रे, डोकं ओलं होऊ देऊ नका’ असं समजावत ओरडणारी आजी वळवाच्या पावसात ‘मुद्दाम भिजा’ म्हणून सांगायची. हक्काचं भिजणं यातच असतं..

माणसाचं पावसाशी एक आगळंवेगळं नातं आहे. सगळेच ऋतू माणसाच्या अस्तित्वाशी, त्याच्या जगण्याशी संबंधित असले तरी पावसाशी सलगी अंमळ अधिकच आहे. म्हणूनच वळवाच्या पावसापासून मिळणारी त्याच्या आगमनाची वार्ता आपल्याला सुखावते. खरं तर वळीव लयकारी नसतो, त्यात नादमाधुर्य नसतं. त्यात असतो एक वेगळाच रांगडेपणा, उन्मत्तपणा… त्याच्या येण्याची ना कुठली वेळ, ना कोणता मुहूर्त. तो येणारही अवचित, अवेळी आणि कोसळणारही अनिवार… कधी टपोऱ्या गारांसवे, कधी मोठाल्या थेंबासवे, वादळवाऱ्यांना संगे घेऊन तो आला की खरं तर दैनाच उडते. त्याचा तो जोर न सोसल्याने वृक्ष उन्मळून पडणं, फांद्या तुटणं, चंद्रमोळी घरं उघडी पडणं, विजांचं तांडव सुरू असताना त्यांच्या वेगवान पदन्यासाखाली काही जीवांची राख होणं या तर नित्याच्या बाबी. हा वळीव भरलेल्या शिवारात शिरला की हाताशी आलेल्या पिकांचीही खैर नसते. ते नुकसानही बरंच मोठं असतं. पण तरीही त्याचं येणं आश्वासक, आधार देणारं वाटतं. कारण पहिला आवेग ओसरल्यानंतर त्याचं हे रूप शांत होणार असतं. धसमुसळेपणाने हैदास घातलेल्या बालकाने थोड्याच वेळात समजूतदारपणा दाखवावा आणि अगदी शिस्तीत वागावं तसं काहीसं अनुभवायला मिळणार असतं. काही दिवसांतच पावसाची झड लागणार असते. तो रजतरस ढेकळांमध्ये विरघळून शेतात सोनं पिकवणार असतो. म्हणूनच वळवाच्या पावसाचं अप्रूप कधीही संपत नाही, ते संपणारही नाही.

वळवाच्या पावसाकडे बघण्याचा प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा… गृहिणींना वळीव येण्यापूर्वी उन्हाळकामं उरकण्याची घाई असते. आता वर्षभर सगळे जिन्नस बाजारात उपलब्ध असले, तरी वाळवणं करण्याचा हाच तो काळ. कुरड्या, सांडगे, पापड, भरल्या मिरच्या, खारवड्या, शेवया, तिखट, मसाले अशी सगळी बेगमी झाली की गृहिणीची वर्षाची चिंता मिटली. आजही अनेक घरांमध्ये वळवाच्या आधी ही कामं आटोपण्याची लगबग असते. दुसरीकडे, घराच्या शाकारणीची लगबग, शेतीच्या कामासाठी लागणाऱ्या अवजरांची दुरुस्ती करून पेरणीची सिद्धता, इकडे शाळांना सुट्ट्या असल्याने बालगोपाळांची मजामस्ती अशा सगळ्या वातावरणात वळीव प्रत्येकासाठी वेगळा संदर्भ घेऊन येतो. हे ऋतूबदलाचे संकेत असतात. म्हणूनच हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तवल्यापासून मनात आशेची बरसात सुरू होते. स्वप्नं अंकुरायला लागतात. डोळ्यांसमोर सृष्टीच्या वैभवाची दृश्यं तरळायला लागतात. बाहेर हे देखणं वैभव फुललं तरच घराघरात वैभवाचे पदरव ऐकायला मिळण्याची शक्यता असते. त्यामुळेच वळवाचा अपूर्व नाद ऐकण्यास सगळ्यांचे कान आतुरलेले असतात.

निसर्गाच्या सान्निध्यात वाढलेला माणूस मुळात निसर्गभक्त आहे. काळाच्या ओघात त्याच्या या भक्तीवर व्यावहारिकतेची पुटं चढत असली तरी वळवाच्या दोन थेंबातच ती वाहून जातात. मग असं लेपविरहित झालेलं अनावृत्त मन नवथरतेने तो आवेग झेलत राहतं. ही आतुरता असते म्हणूनच वळीव येताच त्यातील चार शिंतोडे झेलण्यासाठी खिडकीच्या गजांमधून ओंजळ बाहेर निघते, आनंदाने चित्कारत बालगोपाळच नव्हे तर मोठेही अंगणात धूम ठोकतात आणि सचैल न्हाऊन निघतात. पावसापासून स्वत:चा बचाव करणारे वळवाचा पाऊस मात्र मोकळेपणाने झेलतात. त्यावेळी त्यांना कोणत्याही आच्छादनाची गरज भासत नाही. अचानक कोसळणारा तो जलभार पेलण्यात गुंतलेल्या पशुपक्ष्यांची लगबग न्याहाळण्यात एखाद्याला अपूर्व आनंद मिळतो. पानांवर निथळणारे आणि एका लयीत मोत्याप्रमाणे खाली ओघळणारे ते थेंब पाहण्यात तासनतास जातात. न्हाऊमाखू घातलेल्या बाळसेदार बाळाप्रमाणे दिसणारं सृष्टीचं देखणं रूप न्याहाळण्यासाठी निसर्गभक्तांचे पाय निसर्गरम्य ठिकाणांच्या दिशेने वळतात. एकंदरच वळवात न भिजणारं निर्लेप मन शोधूनही सापडणार नाही. म्हणूनच वळवाचं अप्रूप कायम आहे.

वळवाच्या पाण्यावर पिकांचं पोषण होत नाही, भूजल पातळीत वाढ होत नाही, जलसंचय होत नसल्याने नदी-नाले आणि विहिरींमधील पाणीसाठा वाढत नाही. हा भीजपाऊस नसल्यामुळे जमिनीत मुरत नाही, तर पन्हाळ्यांमधून ओघळतो आणि थेट वाहून जातो. रसरसून तापलेल्या जमिनीवर पडल्याने त्यातील बहुतांश पाण्याची वाफच होते. म्हणूनच आदल्या दिवशी वळीव पडला तरी दुसऱ्या दिवशी त्याचं नावनिशाण राहत नाही. उलट, वाफसा आल्याने धुमस वाढते. उष्मा तीव्र होतो. पण तरीही वळवाच्या पावसाचा आधार वाटतो. कारण हा पाऊस म्हणजे एका प्रतीक्षेची अखेर असते. प्रतीक्षा पूर्ण होणार असल्याची ही भावनाच तनामनाला नवी उभारी देण्याचं काम करते. हीच एक आशा मनातली कार्यासक्ती वाढवते. असं बरेच वेळा झालं असेल की वळीव पडले पण पर्जन्यकाळ यथातथाच राहिला. किंबहुना, जनांना अवर्षणाचा सामना करावा लागला. परिस्थिती समोर उभी ठाकते तेव्हा निकराचा प्रतिकार करणं माणसाच्या स्वभावातच आहे. ती त्याची प्रवृत्ती आहे. आपण सहसा कोणापुढेही हार पत्करत नाही; अगदी प्रतिकुलतेपुढेही नाही. मात्र, प्रतिकुलता समोर येणार असल्याची शंका, अस्थिरतेची भीती, अप्रिय घटनेची चाहुलच आपल्याला इतकी घाबरवून टाकते की संकटाशी दोन हात करण्यापूर्वीच आपण परिस्थितीपुढे हात टेकतो.

भयशंकित मन कार्यक्षमतेला वाळवीप्रमाणे पोखरून टाकतं. या दाहाने आपल्यातली ऊर्जा आणि क्षमतेचा स्त्रोत आटून जातो. अशा अशक्त भावविश्वात एखाद्या अप्रिय वार्तेनेही वादळ उठू शकतं, जे आवरणं भल्याभल्यांना शक्य होत नाही. त्यात ते मुळापासून हादरतात, उन्मळून पडतात. म्हणूनच आयुष्याला वळवाचा आधार हवा. सुख-समृद्धीचा सांगावा घेणारा असा एखादा दूत हवा. त्याने व्यक्त केलेले, आश्वासकता वाढवणारे दोन शब्द कानावर पडायला हवेत. धगीने होरपळणाऱ्या जीवांना शांत करणारा तो क्षणिक थंडावा हवा. कारण ती सावलीच असते माथ्यावरच्या उन्हात आधार देणारी, थकलेल्या पावलांखाली आशेचे कवडसे पसरणारी…

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -