जून ते सप्टेंबर या कालावधीत यंदा १०६ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज
मुंबई : नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) आगमनाची वर्दी मिळाली आहे. अंदमान-निकोबार बेट समुहावर मॉन्सून दाखल होण्यास पोषक हवामान होत आहे. १९ मे, रविवारपर्यंत मॉन्सून दक्षिण अंदमान समुद्र, लगत असलेल्या आग्नेय बंगालच्या उपसागर आणि निकोबार बेटांवर दखल होण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत.
दीर्घकालीन आगमनाच्या वेळा लक्षात घेता मॉन्सून साधारणत: २१ मे पर्यंत अंदमानाची राजधानी पोर्टब्लेअर येथे पोचतो. त्यापूर्वीच तो दक्षिण अंदमान समुद्रात दाखल होतो. तर १ जूनपर्यंत केरळमध्ये मॉन्सून डेरेदाखल होतो.
यंदा १९ मे रोजी मॉन्सून अंदमान समुद्रात दाखल होण्याची शक्यता आहे. मान्सूनची वाटचाल अशीच राहिली तर यंदा वेळेपूर्वी मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. गतवर्षीदेखील १९ मे रोजी मॉन्सून दक्षिण अंदमानात दाखल झाला होता. तर आगमन लांबल्याने ८ जून रोजी केरळमध्ये दाखल झालेला मॉन्सून ११ जून रोजी महाराष्ट्राच्या तळ कोकणात पोचला होता. यंदा नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (Monsoon) हंगामात जून ते सप्टेंबर या कालावधीत यंदा १०६ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) जाहीर केला. या अंदाजात पाच टक्के कमी-अधिक पाऊस पडण्याची शक्यताही गृहीत धरण्यात आली आहे.
मान्सूनच्या हालचाली
दक्षिण बंगालच्या उपसागरात निकोबार बेटे आणि दक्षिण अंदमान समुद्रात मान्सूनच्या हालचाली दिसून येत आहे. दरवर्षी मान्सून २२ मे पर्यंत दाखल होतो. सध्या दक्षिण अंदमान समुद्र आणि निकोबार बेटांवर समुद्र सपाटीपासून १ ते १.५ किलोमीटर उंचीवर नैऋत्येकडून येणारे वारे सुरु आहे. हे वारे मान्सून येणार असल्याची सूचना देतात. पुढील दोन दिवसांत अंदमान बेट आणि बंगालच्या उपसागरात मान्सूनची अधिक प्रगती होणार आहे.
सध्या प्रशांत महासागरात सध्या एल-निनो स्थिती असून, मॉन्सून हंगामात ला-निना स्थिती तयार होण्याची शक्यता आहे. मॉन्सूनच्या केरळातील आगमनाचा मुहूर्त हवामान विभागाकडून लवकरच जाहीर केला जाईल. तसेच मे महिन्याच्या अखेरीस मॉन्सून हंगामाचा सुधारीत दीर्घकालीन अंदाज व विभागनिहाय पावसाचे वितरण स्पष्ट होणार आहे. यंदाचा उन्हाळा सुरुवातीपासून तप्त राहीला. गतवर्षीपेक्षा पाणीटंचाईत भर पडली. अनेक ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करावा लागला. मे महिन्यामध्ये अतिष्णतेमुळे उन्हाळी पिकांची होरपळ झाली. त्यात मार्चचा शेवटचा आठवडा आणि मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज्यात पूर्वमोसमी वादळी पाऊस झाला. त्यामुळे उष्णतेपासून सुटका होऊन दिलासा मिळाला.
मध्य महाराष्ट्रात पाऊस होणार
बिहार आणि झारखंडसह अनेक राज्यांमध्ये पाऊस पडत आहे. दरम्यान, आयएमडीने ताज्या अलर्टमध्ये म्हटले आहे की सध्या कर्नाटकमध्ये चक्रीवादळ सक्रीय आहे. त्यामुळे पुढील ५ दिवसांत मध्य प्रदेश, विदर्भ, छत्तीसगड, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात गडगडाटी वादळ, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा (४०-६० किमी प्रतितास) यासह मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.