Friday, May 9, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडी

Corona In Maharashtra : सावधान ! महाराष्ट्रात पुन्हा कोरोनाचा फैलाव

Corona In Maharashtra : सावधान ! महाराष्ट्रात पुन्हा कोरोनाचा फैलाव

केपी २ व्हेरियंटचे पुण्यात ५१ तर ठाण्यात २० रुग्ण


मुंबई : जगावरील कोरोनाचे संकट पूर्णपणे टळलेले नाही. नव्या कोरोना व्हेरियंटचा प्रादूर्भाव वाढला आहे. यापूर्वी जेएन १ व्हेरियंटने जगाची चिंता वाढवली होती, आता केपी २ व्हेरियंट जगभरात आणि देशात पसरू लागला आहे. ताज्या माहितीनुसार, या व्हेरियंटने राज्यातही पाय पसरले आहेत. महाराष्ट्रात कोविड-१९ उप-प्रकारचे ९१ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. हे कोव्हिड १९ ओमिक्रॉनचे सब-व्हेरियंट केपी.२ आहे.


देशात सर्वत्र लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणूकीच्या प्रचाराच्या राजकीय तोफा धडाडत असताना आरोग्य विभाग मात्र कोरोनाच्या नव्या व्हेरियंटला थांबविण्यासाठी व्यस्त झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, देशभरात या नव्या व्हेरियंटच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. राज्यात देखील रुग्णांची संख्या वाढत आहे. पुण्यामध्ये केपी २ कोरोना व्हेरियंटचे ५१ रुग्ण आढळून आलेत, तर ठाण्यामध्ये २० रुग्ण तसेच उर्वरित महाराष्ट्रात २० रुग्ण आढळले आहेत. या नव्या व्हेरियंटचा पहिला रुग्ण जगात जानेवारी महिन्यात अमेरिकेत आढळला होता.


महाराष्ट्राचे जीनोम सिक्वेन्सिंग को-ऑर्डिनेटर डॉक्टर राजेश कार्यकर्ते यांनी दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल आणि मार्च महिन्यामध्ये कोरोनाच्या नव्या व्हेरियंटच्या रुग्णांची संख्या राज्यात दिसून आली होती. पण, लोकांना रुग्णालयात दाखल करण्याचे आणि मृत्यूचे प्रमाण खूप कमी आहे. पुणे आणि ठाणे सोडून सात रुग्ण अमरावती आणि औरंगाबादमध्ये आढळून आले आहेत. याशिवाय सोलापूरमध्ये दोन, अहमदनगर, नाशिक, लातूर आणि सांगलीमध्ये प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे. नवी मुंबईमध्ये एकाही रुग्णाची नोंद नाही.

Comments
Add Comment