विश्वरंग – उमेश कुलकर्णी
संरक्षण मंत्री जॉज फर्नांडिस नेहमी म्हणत की, “आपला पहिला शत्रू चीन हाच आहे. पाकिस्तान वगैरे किरकोळ आहेत.” पण आपण तेव्हा काँग्रेसी राज्यकर्त्यांच्या नादानपणाच्या राजकारणात अडकलो होतो. त्यामुळे चीन करत असलेली फसवणूक पाहून सुद्धा पंडित नेहरू हिंदी-चिनी भाई भाईच्या बेंबीच्या देठापासून आरोळ्या देत होते. चीन विस्तारवादी आज झाला आहे असे नाही. तो कित्येक वर्षांपासून तसाच आहे. पण नेहरूंना त्यांचा भाबडेपणा लक्षात येईपर्यंत चीनने आपला अक्साई भूभाग बळकावलाही होता आणि अरूणाचल प्रदेशाचा घास गिळण्याच्या नादात चीन होता. आपण मात्र हिंदी-चिनी भाई भाईच्या जयघोषात मग्न झालो होतो. आपले डोळे उघडले, तेव्हा खूप उशीर झाला होता. पण आता मात्र तसे नाही. आता भोळेभाबडे नादान काँग्रेसी सरकार अस्तित्वात नाही. आता जशास तसे उत्तर देणारे मोदी सरकार आले आहे. त्यामुळे चीनच्या कोणत्याही पाऊलाला आपले तसेच उत्तर असते. त्यामुळे आपण सेला बोगदा बांधला आणि आपल्या सैन्याच्या हालचालीवर चीनची नजर राहू शकत नाही. कारण सेला बोगदा सर्वात उंचीवर आहे. नेहरूंचा भारत आता नाही, हे मोदी यांचे ठणकावून सांगणे, हेच भारत आता सुसज्ज आहे, याचे निदर्शक आहे. पण आता सवाल भारत-चीन यांच्यातील संबंधांचा नाही, तर तो आहे चीन आणि तैवान यांच्यातील तणावाचा. चीनने आता तैवानचा घास घेण्याची तयारी सुरू केली आहे.
इंडो- पॅसिफिक कमांडने प्रथम हे जाहीर केले की, २०२७ मध्ये चीन तैवानमध्ये घुसण्याच्या तयारीत आहे. ही बातमी जशी तैवानसाठी धोक्याची आहे, तशीच ती भारतासाठीही आहे. १९६२ मध्ये भारत-चीन पहिले युद्ध झाले, तेव्हा आपल्याला अक्साई चीन द्यावा लागला. अक्साई चीन काश्मीरच्या अडीचपट मोठा आहे म्हणजे किती मोठा भाग आपल्याला द्यावा लागला, हे लक्षात घ्या. हे सारे नेहरूंच्या नादानपणाच्या धोरणामुळे झाले. तो आता इतिहास झाला. पण आपल्याला आजही त्याची फळे भोगावी लागत आहेत. चीन २०२७ मध्ये तैवानमध्ये घुसण्याच्या तयारीत आहे, हे केवळ इंडो-पॅसिफिक कमांडोच्या अधिकाऱ्यांनी म्हटलेले नाही, तर ते अमेरिकन गुप्तचर अधिकाऱ्यांनी आणि पँटेगॉनच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. याचा अर्थ हा की, चीनची तैवानमध्ये घुसखोरी करण्याची तयारी पूर्ण झाली आहे. याचा फटका भारताला बसणार आहे आणि त्यासाठी त्या भागातील भूगोलाची माहिती हवी.
अशी बातमी आहे की, चीनने पीपल्स लिबरेशन आर्मीला तैवानमध्ये घुसखोरी करण्यास तयार राहायला सांगितले आहे. पण तैपेईची लष्करी घुसखोरीला प्रतिबंध करण्यास कितपत तयारी आहे, यावर चीनची योजना अवलंबून आहे. काही विश्लेषकांच्या मते, तैपेईमध्ये घुसखोरी करण्याची योजना केवळ लष्करी क्षमता आणि केवळ वेळेच्या तयारीवर अवलंबून नाही, तर राजकीय आणि धोरणात्मक उद्दिष्टांवरही अवलंबून आहे. अमेरिकन सिनेट समितीला इंडो-पॅसिफिक कमांडचे मुख्य प्रशासकीय अधिकारी जॉन अक्विनो यांनी सांगितले की, पीएलएच्या बैठकीत जे झाले, त्यावरून असे संकेत मिळत आहेत की, चिनी अध्यक्ष शी जिनपिंग यांनी पीएलएला २०२७ पर्यंत तैवानमध्ये कब्जा करण्याच्या उद्देशाने घुसण्याची तयारी करण्यास सांगितले आहे. अर्थात चीन २०२७ मध्येच घुसखोरी करेल असे नाही, तर त्याच्या अगोदर किंवा त्यानंतरही घुसखोरीची योजना चीन अमलात आणू शकतो. चीन हा विस्तारवादी आहे आणि त्याच्या या विस्तावरवादी धोरणामुळे अगोदरच भारताला फटका बसला आहे. पण आताही चीनने तैवानचा घास घेतला, तर भारताला अतिसावध राहावे लागेल आणि त्यापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे भारताला चीनशी युद्ध करावे लागेल. चीनने नेपाळ, श्रीलंका आणि कित्येक देशांना आपल्या अंकित करून घेतले आहे. ते चीनलाच मदत करतील. चीनच्या क्षेपणास्त्रांच्या टोकावर आपण असू शकतो. पण चीनची युद्धाचे सामर्थ्य आणि आपले युद्धविषयक सामर्थ्य यात जमीन-अास्मानाचा फरक आहे.
६०च्या दशकात भारत सरकारला गाफील ठेवणारे अधिकारी होते आणि त्यामुळे भारताचा पराभव झाला. कारण भारताने युद्धाची काहीच तयारी केली नाही. उलट जो भाग चीनला द्यावा लागला, तो महत्त्वाचा नव्हता आणि तेथे काहीच उगवत नाही, अशी तर्कहीन उत्तरे नेहरू सरकारने दिली होती. आज मात्र तसे नाही. आज सरकारला अतिसावध राहावे लागेल आणि तयारी जोरदार करावी लागेल. चीनने तैवानवर हल्ला केला, तर त्याचा प्रतिकार करण्यासाठी अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जपान आणि भारत हे प्रामुख्याने पुढे सरसावतील. चीनच्या विस्तारवादाला प्रतिबंध करण्यासाठी तर ‘क्वाड’ आघाडी स्थापन झाली आहे आणि त्यात भारतही आहे. इंडो-पॅसिफिक कमांडची लष्करी ताकद प्रचंड आहे. फिलिपाईन्स आणि कदाचित दक्षिण कोरियामधील तळांवरून अमेरिकेला चीनवर हवाई हल्ले करणे सहाय्यक ठरेल.
सिंगापूरमधून लॉजिस्टिक सुविधांमुळे दक्षिण चिनी सागरातील चिनी सैन्याला प्रतिबंध करणे सहज शक्य होईल. दक्षिण पूर्व राष्ट्रांनी आपल्या आकाशातील सीमांचा वापर करण्यास अमेरिकेला परवानगी दिल्यामुळे अमेरिकेला दिएगो गार्सिया येथील दीर्घ पल्ल्याच्या बाॅम्ब रेंजर्सला या युद्धात कामी आणता येईल. या सर्व देशांना विस्तारवादी चीनचे भय आहे. सर्व देशांनी चीनचे कोणतेही दुःसाहस रोखण्यासाठी आपापल्या पोझिशन नीट घेतल्या आहेत. त्यामुळे तैवानवर हल्ला केला, तर चीनला त्याची फार मोठी किंमत मोजावी लागणार आहे. अमेरिका-चीन संघर्षात भारताची केंद्रीय पोझिशन ही सर्वात महत्त्वाची आहे. भारत हा दक्षिण पूर्व आशियात प्रमुख आणि मोठी ताकद आहे. हिमालयातील सीमा भागात चीनच्या दादागिरीचा अनुभव भारताने घेऊन झाला आहे. डोकलाम आणि लडाख सीमेवरून गलवान येथून चिनी सैनिकांनी भारतीय सैनिकांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यात चीनचेच सर्वाधिक नुकसान झाले होते. चीनने तैवानमध्ये घुसखोरी केली, तर भारताची प्रतिक्रिया काय राहील, यावर कोणीही अंदाज लावू शकेल.
दहा वर्षांपूर्वी भारत कुंपणावर बसून भूमिका घेऊ शकत होता. पण आज तसे नाही. आज भारताला तैवानला पाठिंबा द्यावा लागेल आणि भारताला अनेक देशांचा पाठिंबा असेल. ‘क्वाड’ आघाडी चीनच्या विरोधात मैदानात उतरतील; पण भारत कदाचित तटस्थ राहील, असे मत काही तज्ज्ञांनी व्यक्त केले. पण चीन हा तैवानमध्ये घुसखोरी करणार, याबाबतीत फारसे मतभेद नाहीत. दक्षिण चिनी समुद्रात भारताच्या पाणबुड्या तैनात आहेत आणि दोन विनाशिका भारताने तैनात केल्या आहेत. यामुळे भारत तैवानच्या मदतीला जाऊ शकेल. पण भारत तैवानच्या मदतीला जाण्याबद्दल काहींना शंका आहे.