Saturday, July 13, 2024
Homeताज्या घडामोडीVoters list : मतदानाला गेले परंतु मत देताच आले नाही! सावनी आणि...

Voters list : मतदानाला गेले परंतु मत देताच आले नाही! सावनी आणि सुयशसोबत नेमकं काय घडलं?

सोशल मीडियावर पोस्ट करत व्यक्त केला संताप

मुंबई : लोकसभेसाठी (Loksabha Election) आज राज्यात चौथ्या टप्प्यातील मतदान सुरु आहे. यासाठी अनेक कलाकार मंडळी देखील बोटावर शाई लावून मतदान करण्याचे आवाहन करत आहेत. मात्र, राष्ट्रीय पुरस्कार विजेती प्रसिद्ध गायिका सावनी रविंद्र (Savaniee Ravindra) तसेच प्रसिद्ध अभिनेता सुयश टिळक (Suyash Tilak) यांनी आज सोशल मीडियावर (Social media) मतदानाविषयी आलेला एक वाईट अनुभव शेअर करत संताप व्यक्त केला आहे. दोघांनीही अनेक प्रयत्न करुनही त्यांना मतदान करता आले नाही, हे अत्यंत खेदजनक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

सावनी रविंद्र मतदानाला गेली होती परंतु तिला मतदान करताच आले नाही, असे तिने सांगितले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ती ज्या ठिकाणी सातत्याने मतदान करते त्या मतदार यादीतच तिचे नाव नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. तिच्या कुटुंबियांची नावे होती मात्र तिचे नावच नसल्याने तिला मतदान करता आले नाही.

सावनीने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटले आहे की, गेले अनेक दिवस सर्व ऑनलाईन पोर्टलवर मतदारांच्या यादीत नाव शोधण्याचा प्रयत्न करूनही नाव सापडले नाही. शेवटी आज मतदान केंद्रावर जाऊन नाव शोधण्याचा प्रयत्न केला. तरीही नाव सापडले नाही. (ज्या ठिकाणी मी गेली अनेक वर्षे मतदान करत आहे त्याच ठिकाणी) आमच्या घरातील बाकी सर्व सदस्यांची नावं आहेत पण माझे नाही. या बद्दल स्वतः त्या ठिकाणी असलेल्या निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि AED पर्यायाने मतदान करू शकते का? याबद्दल विचारणा केली पण त्यांनी नकार दिल्याने मत न देताच परत यावे लागले. हे अत्यंत खेदजनक असल्याचे सावनीने म्हटले.

सुयशलाही आला असाच अनुभव

याचबरोबर अभिनेता सुयश टिळकनेही एक पोस्ट शेअर करत त्यात म्हटले आहे की, गेल्यावेळी मतदान केले तेव्हा नावात चूक असलेली सुधारायचा अर्ज दिला होता. ह्यावेळी सुदैवाने ओनलाईन पोर्टल वर खूप शोधून शेवटी नाव सापडले असताना (त्यात तीच चूक होतीच.) वोटींग बूथ ला सकाळी ७ वाजता पोहोचलो. माझ्या ऑनलाईन पोर्टल वरच्या यादीच्या नोंदीत असलेल्या जागी बूथ वर असलेल्या यादीत मात्र वेगळेच नाव आढळले म्हणून ३ तास वेगवेगळ्या बूथ वर जाऊन नाव शोधायचा प्रयत्न केला. अचानक ह्यावेळी काही जणांचा मतदारसंघच बदलला आहे ते कळले म्हणून वेगळ्या मतदारसंघात पण चौकशी केली शोधाशोध केली.

पुढे त्याने म्हटले की, गेली अनेक वर्षे मी मतदान न चुकता करत आलो आहे, ह्यावेळी मला तो हक्क बजावता आला नाही. कोणत्याही इतर पर्यायाने देखील मतदान करू दिले नाही ह्याची खंत वाटते, वाटत राहील, अशा भावना सुयशने व्यक्त केल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Suyash Tilak (@suyashtlk)

नेटकऱ्यांनी दिला सल्ला…

सावनीच्या पोस्टवर युजर्सने प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने म्हटले की, मतदार यादी निवडणूक पूर्वी प्रसिद्ध होते त्या वेळेस आपले नाव नसल्यास आक्षेप घ्यावे लागते. काहींनी वोटर्स हेल्पलाईन अॅपची मदत घेण्याचा सल्ला सावनीला दिला. एका युजरने नाव वगळण्याचा प्रकार सगळीकडे होत असल्याचे सांगत आपल्या कुटुंबालाही मतदानापासून वंचित ठेवण्यात आल्याचे सांगितले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -