मुंबई परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस
मुंबई : मुंबईमध्ये जोरदार वादळी पावसाला सुरुवात झाली आहे. त्यातच मेट्रो- १ म्हणजेच वर्सोवा ते घाटकोपर मेट्रो सेवा ठप्प झाली आहे. मेट्रोच्या ओव्हरहेड वायरवर बॅनर कोसळल्याने ऐन गर्दीच्या वेळी मेट्रो बंद झाली आहे. ही ऑफिसेस सुटण्याची वेळ आहे, त्यामुळे प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागणार आहे.
जोरदार वादळाने एका राजकीय पक्षाचं बॅनर थेट मेट्रोच्या ओव्हरहेड वायरवर येऊन कोसळलं. त्यामुळे मेट्रो जागच्या जागीच थांबवावी लागली. त्यातच पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे बॅनर हलवणे देखील कठीण होऊन बसले आहे. बॅनर काढण्यापूर्वी विजेचा पुरवठा पूर्णपणे खंडित करावा लागणार आहे. मात्र, अशी परिस्थिती पहिल्यांदाच उद्भवल्यामुळे अद्याप बॅनर काढण्यासाठी कोणीही पुढे सरसावलेलं नाही.
एअरपोर्ट स्टेशनला ही मेट्रो थांबवण्यात आली आहे. सर्व प्रवासी सुखरुप असून मेट्रो कधी सुरु होईल याची वाट पाहत आहेत. पहिल्याच पावसाने नागरिकांचे चांगलेच हाल केल्याचे चित्र आहे.
जोरदार पावसामुळे पूर्व द्रुतगती मार्गावर झाडं कोसळली
दुपारी कडकडीत ऊन पडलेले असताना अगदी तासाभरात मुंबईचे चित्र पालटले असून जोरदार पाऊस पडत आहे. अनेक ठिकाणी वाहनांचे नुकसान झाले आहे. तर, जोरदार पावसामुळे पूर्व द्रुतगती मार्गावर झाडं कोसळली आहेत. वाहतुकीचा खोळंबा झाल्याने मुंबईचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.