मुंबई डॉट कॉम – अल्पेश म्हात्रे
मुंबईतील वाहतूक व्यवस्थेला ९ मे रोजी दीडशे वर्षे पूर्ण झाली. म्हणजे घोड्याच्या ट्रामने सुरू झाली होती, त्या मुंबईच्या पहिल्या परिवहन सेवेला दीडशे वर्षे पूर्ण झाली. सर जॉर्ज अल्वा क्रिएटरीज आणि विल्यम फ्रेंच स्टन्स यांनी स्थापन केलेल्या बॉम्बे ट्रॉम्बे कंपनीच्या ९ मे १८७४ रोजी घोड्यांनी ओढल्या जाणाऱ्या ट्रामपासून हा ट्रामचा प्रवास सुरू झाला. ही कंपनी १९०५ साली बंद झाली. १९०५ साली बॉम्बे इलेक्ट्रिक सप्लाय कंपनी लिमिटेडची स्थापना झाली आणि मुंबई शहरात सार्वजनिक परिवहन सेवेचे युग सुरू झाले.
त्याकाळी ब्रिटिशांची सत्ता असल्याने, मुंबईची ट्राम व्यवस्था ही लंडनच्या वाहतूक व्यवस्थेप्रमाणे चालत होती. त्यावेळी इलेक्ट्रिक बनावटीच्या एलसीसी क्लासच्या ट्राम धावत असत. त्यानंतर दुमजली ट्राम, नंतर एक मजली बस, दुमजली बस अशी अनेक स्थित्यंतरे या मुंबईने गेल्या दीडशे वर्षांत पाहिली. कालौघात सर्वच बदलले, मात्र मुंबईची शान असलेली बस मात्र आजही दीडशे वर्षांनंतर त्याच तोऱ्यात मुंबईमध्ये धावत आहे. भलेही बस गाड्यांचे रंग, रूप बदलले असतील, मात्र आज मुंबईच्या शहरांमधून धावणारी बसची शान काही औरच आहे.
आज कितीही अत्याधुनिक बस सेवा सेवेत असल्या, तरी त्या काळच्या ट्रामची गंमत काही वेगळीच होती. मात्र ट्रामपासून सुरू झालेला हा प्रवास साधासुधा नक्कीच नव्हता. मुंबई हे आंतरराष्ट्रीय स्तरावरील शहर. येथे त्यावेळी हजारो लोकांचा, तर आता लाखो लोकांचा राबता अखंड सुरू असतो. त्या काळी लोकसंख्या कमी होती, मात्र घोड्याच्या सुरू झालेल्या ट्रामने मुंबईकरांना स्वस्त आणि मस्त प्रवासाचा मार्ग दाखवून दिला होता. लोकांमध्ये तो खूप लोकप्रिय ठरला होता.
सुरुवातीला ट्राम चालवताना असंख्य अडचणींचा सामना करावा लागला. समोर कोणतीही काच नसताना, उन्हा-पावसात केवळ उभ्याने आठ तास चालकाला ड्रायव्हिंग करावी लागत असे. डाव्या हाताने स्पीड कंट्रोलर बॉक्सवरील दांडा खटक्याने मागे-पुढे करत ट्रामचा वेग कमी-जास्त करणे, उजव्या हाताने ब्रेकच्या दांड्याला गोल गोल फिरवत ब्रेकचा अंदाज घेणे, सोबत उजव्या पायाने घंटी वाजवीत असत. म्हणून ट्राम चालवणारे नेहमी उंच धिप्पाड तांबूस वर्णाचे दाढीवाले फेटादारी काबुली पठाण किंवा उत्तर भारतीय असत. ट्राम कंडक्टर मात्र त्याकाळी मराठी, पारशी, दाक्षिणात्य, मुसलमान, ख्रिश्चन इत्यादी असत. आजच्या काळी धावत जाऊन लोकल ट्रेन पकडणे, हे जसे नेहमीचेच आहे, तसेच धावत-पळत जाऊन ट्राम पकडणे, हे तेव्हाही नित्याचेच होते. कारण लोकल ट्रेनच्या तुलनेत ट्रामचा वेगही फारच कमी होता. ट्राम मार्गाचा शेवटचा विस्तार १९३५ साली दादर टीटी ते किंग सर्कलपर्यंत झाला होता. मुंबईतील तब्बल ४९.६९ किलोमीटरच्या जाळ्यात एकूण ३१ ट्राम मार्ग होते. तसेच ट्रान्सफर तिकिटाच्या सोयीमुळे एकाच तिकिटाच्या प्रवासात दोन वेळा कोठेही उतरून पुन्हा ट्राम पकडण्याची सोय होती. अशा प्रकारे ट्राम प्रवास सर्वच मुंबईकरांना कमालीचा लोकप्रिय होता. १५ जुलै १९२६ पासून मुंबईत ‘बेस्ट’ची बस सेवा सुरू झाली. जी ट्रामपेक्षाही वेगवान व आरामदायी होती, तरी लोकांचा ओढा मात्र ट्रामकडे होता.
कारण बसपेक्षा ट्राम प्रवास स्वस्त होता. उत्तर मुंबईतून काही ट्राम दादर टीटी ते जे. जे. रुग्णालय व दक्षिण मुंबईतून म्युझियम ते जे. जे. रुग्णालय अशा शॉर्ट ट्रिप म्हणून जादा धावत. इतका प्रतिसाद त्याकाळी ट्रामला होता. १९५३ साली ट्राम सेवा कमी करून, त्या मार्गावर बसेस वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला व ट्राम मार्ग टप्प्याटप्प्याने बंद करण्याचे ठरले. एक प्रयोग म्हणून दहा क्रमांकाचा ट्राम मार्ग पूर्णपणे काढून, त्या जागी विजेवर चालणारी ट्रॉली बस सुरू करण्यात आली. स्कोडा कंपनीच्या १२ बसेस मागविण्यात आल्या. ट्रामप्रमाणे याला रुळांची आवश्यकता नव्हती. परंतु दोन ओव्हरहेड वायर्स असत. शेवटच्या स्थानकात ही बस यू टर्न घेत असे. ट्रॉली बस वेगवान असल्याने गोवालिया टँक ते ताडदेव या गर्दीच्या व्यस्त मार्गावर ही बस चालवली गेली. मात्र वारंवार रस्त्यावर माणसे ये-जा करत असल्याने, मधूनच ओव्हरहेड वायरमधून बस निसटून जाई. मग प्रवाशांच्या सहाय्याने धक्का मारत, ट्रॉली बस ओव्हरहेड वायरच्या खाली आणून, त्याचे दोन्ही कनेक्टर दोरीच्या साह्याने जोडले जाई. अशा अनेक कारणांमुळे ट्रॉली बस कायमची बंद करावी लागली. त्यानंतर ट्राममध्ये अनेक बदल करण्यात आले. विजेच्या ट्राममध्ये एक मजली ट्राम, एक मजली जोड ट्रेलर ट्राम, आराम वर्गाची दुमजली लक्झरी ट्राम, मधोमध दरवाजा असलेली दुमजली ट्राम, लांबलचक वेगवान अमेरिकन जोड ट्राम असे अनेक प्रकार ट्रामचे निर्माण झाले. ट्राममध्ये सुरुवातीच्या काळात पहिला व दुसरा असे वर्ग असत. १९०८ नंतर पहिला वर्ग रद्द करून, एकच वर्ग कायम करण्यात आला. एक मजली ट्राम प्रथम घोड्याच्या साह्याने ओढली जात. मात्र नंतर त्या बंद करून, विद्युत ट्राम सुरू करण्यात आल्या. महिलांसाठी विशेष आसनेही त्याकाळी ट्राममध्ये होती हे विशेष.
१९४७ साली देश स्वतंत्र झाला, त्याच सुमारास ७ ऑगस्ट १९४७ रोजी बेस्ट कंपनी मुंबई महापालिकेच्या ताब्यात आली आणि बेस्टच्या देशातील पहिल्या सार्वजनिक उपक्रमात रूपांतर झाली. भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी विशेष रोषणाई केलेली ट्राम सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. या पहिल्या स्वातंत्र्य दिनाच्या आनंदात ट्रामला लोंबकळून प्रवास केल्याने, अनेक ट्राम नादुरुस्त झाल्या. आधीच तोट्यात चाललेल्या, या ट्रामच्या टपावर चढून व अतिउत्साही प्रवाशांमुळे अनेक ट्रामचे नुकसान झाले. त्यामुळे अनेक ट्राम नादुरुस्त झाल्या. त्या कधीच सुरू झाल्या नाहीत. ट्राम सेवेचा तोटा मात्र वाढतच होता. मग ट्रान्सफर तिकीट रद्द करण्यात आले. ट्रामचा ताफा दिवसेंदिवस कमी करण्यात येत होता. १९४७ साली असणारा ४३८ ट्रामचा ताफा १९६० साली १५० आणि १९६३ साली ६२, तर १९६४च्या मार्च महिन्यात केवळ २३ ट्राम सेवेत होत्या. जीवनात शाश्वत असे काहीच नाही. मुंबईची ट्रामही याला अपवाद राहिली नाही. काळानुरूप वाढती लोकसंख्या व रस्त्यावरील वाढत्या रहदारीमुळे ट्रामचा वेग अधिकच मंदावला. वेगवान बसच्या तुलनेत रस्ते प्रवासात ट्राम अडचणीची ठरू लागल्याने आणि तोटा ही वाढल्याने ट्राम सेवा बंद करण्याचा निर्णय नाईलाजास्तव कंपनीला घ्यावा लागला. ३१ मार्च १९६४ रोजी रात्री १० वाजता ट्रामला निरोप देण्याचा समारंभ ठरला. बोरीबंदर ते दादर टीटी या ट्राम मार्गावरील शेवटच्या ट्रामला निरोप देण्यासाठी आणि हा ऐतिहासिक क्षण अनुभवण्यासाठी मुंबईकरांनी एकच गर्दी केली. ऐतिहासिक आठवण म्हणून एका पोस्टरवर इंग्रजीत लिखाणासह घड्याळाच्या तबकडीचा काटा दहावर प्रदर्शित करून, ही ट्राम बोरीबंदरवरून दादर टीटी अखेरच्या प्रवासाला निघाली अन् मुंबईतील ट्रामसेवेचे पर्व संपले.
मुंबईकरांच्या जिव्हाळ्याची ट्राम ९० वर्षांच्या जलद, सुखकर, सुरक्षित, प्रदूषणमुक्त सेवेनंतर निवृत्त झाली. सोबत ट्राम चाकांच्या कडकडाटात त्याचे संगीतही थांबले ते कायमचेच!
या आठवणींनी अनेकांचे डोळे निश्चितच पाणवले. घोड्याने ओढणाऱ्या ट्रामपासून विजेवरील ट्राम, ट्रॉली बस, एक मजली बस, दुमजली बस, ट्रेलर बस, जोड बस, सीएनजी बस, लो फ्लोर बस, डिझेल इलेक्ट्रिक हायब्रीड वातानुकूलित बस, विद्युत दुमजली बस या इतर कोणत्याही वाहतूक संस्थेने दिल्या नसतील, इतक्या विविध प्रकारच्या बसेस व तितक्याच प्रकारच्या वाहतूक सेवा मुंबईकरांना दिल्या आहेत, त्या केवळ बेस्टनेच! आज कितीही वेगवेगळ्या प्रकारच्या बस गाड्या आल्या, तरी ट्रामने प्रवास करण्याचा अनुभव काही वेगळाच होता. मुंबई शहराच्या परिवहन सेवेत त्यानंतर मोठी क्रांती झाली. त्यात एकमजली बस, दुमजली बस, ट्रेलर बस, जम्बो बस, वातानुकूलित बस, आरामदायक डीलक्स बस, त्यानंतर मुंबईत रेल्वे आली, रिक्षा, टॅक्सी, त्यानंतर मोनो, मेट्रो रेल. मात्र त्या ट्रामने प्रवास करण्याचा अनुभव काही वेगळाच होता. खरंच त्या ट्रामला विसरणे शक्य नाही. दोन वर्षांपूर्वी मुंबई मेट्रोचे काम सुरू असताना, हुतात्मा चौक परिसरात त्या ट्रामचे गाडलेले रूळ सापडले होते. पुन्हा त्यावेळी ट्रामच्या आठवणी जागृत झाल्या होत्या. आज मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस समोरील भाटिया बागेत त्या ट्रामचा एक नमुना बेस्ट व मुंबई महानगरपालिकेने जतन करून ठेवला आहे, एवढीच एक आठवण आज ट्रामसंबंधी आहे.
खरंच हे अनुभवणारी ती पिढीही गेली व राहिल्या आहेत, त्या केवळ आठवणी…!