मुंबई: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने(royal challengers bangalore) दिल्ली कॅपिटल्सला ४७ धावांनी हरवले. या पद्धतीने फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सलग पाचव्यांदा विजय मिळवला. दरम्यान, या विजयामुळे आरसीबीच्या प्लेऑफमध्ये खेळण्याच्या आशा जिवंत आहेत. मात्र दिल्ली कॅपिटल्सच्या आशांना मोठा धक्का बसला आहे.
दरम्यान दोन्ही संघाचे पॉईंट्स १२-१२ असे आहेत.सोबतच दोन्ही संघांचे भाग्य त्यांच्या हातात नाही. आरसीबी आणि दिल्ली कॅपिटल्स दोघांना प्लेऑफसाठी इतर संघांच्या निकालावर अवलंबून राहावे लागेल. दरम्यान, आता कोलकाता नाईट रायडर्सने प्लेऑफमध्ये आपले स्थान पक्के केले आहे. तर इतर ३ संघांचा निर्णय होणे बाकी आहे.
आरसीबीच्या विजयानंतर किती बदलले पॉईंट्स टेबल
श्रेयस अय्यरच्या नेतृत्वातील कोलकाता नाईट रायडर्सने १२ सामन्यांत १८ गुणांसह क्वालिफाय केले आहे. तर राजस्थान रॉयल्सचे १२ सामन्यांत १६ गुण आहेत. या संघाचेही प्लेऑफमधील स्थान जवळपास निश्चित झाले आहे. तिसऱ्या स्थानावर चेन्नई सुपर किंग्स आणि चौथ्या स्थानावर सनरायजर्स हैदराबाद आहे. त्यांचे १४-१४ गुण आहेत. मात्र पॅट कमिन्सच्या संघाचे दोन सामने बाकी आहेत. तर चेन्नई सुपर किंग्सचा केवळ १ सामना शिल्लक आहे. तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू १३ सामन्यात १२ गुणांसह पाचव्या स्थानावर आहेत.
बंगळुरूविरुद्धच्या पराभवानंतर दिल्लीचे १३ सामन्यात १२ गुण आहेत. हा संघ पॉईंट्स टेबलमध्ये सहाव्या स्थानावर आहे. यानंतर लखनऊ सुपर जायंट्स १२ सामन्यात १२ गुणांसह सातव्या स्थानावर आहे. तर शुभमन गिलच्या नेतृत्वातील गुजरात टायटन्स १२ सामन्यात १० गुणांसह आठव्या स्थानावर आहे. केकेआरचा संघ प्लेऑफसाठी क्वालिफाय झाला आहे. तर बाकी ३ स्थानांसाठी ७ दावेदार आहेत.