महेश देशपांडे – आर्थिक घडामोडींचे अभ्यासक
विमा नियामक प्राधिकरणा (इर्डा) ने नुकतेच आरोग्य विम्याच्या नियमांमध्ये काही बदल केले आहेत. यानंतर विमा क्षेत्रात काही बदल होऊ शकतात. त्याचा परिणाम भविष्यात विम्याच्या हप्त्यावर दिसू शकतो. नवीन नियमानुसार आता काही आजारांसाठी विमा दावा घेण्यासाठी जास्तीत जास्त तीन वर्षे वाट पाहावी लागणार आहे. पूर्वी ही मुदत चार वर्षे होती. ‘इर्डा’ने केलेल्या बदलांनंतर विमा कंपन्या वेगवेगळ्या पॉलिसींच्या प्रीमियममध्ये बदल करण्याच्या विचारात आहेत. ‘आयसीआयसीआय प्रुडेंशियल स्मार्टलाइफ’सह ‘स्मार्टकिड’ पॉलिसीच्या प्रीमियममध्ये ७.५ टक्क्यांवरून साडेबारा टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. ‘एचडीएफसी अर्गो’ने कंपनीला सरासरी प्रीमियम ७.५ टक्के ते १२.५ टक्के वाढवावा लागेल, असे म्हटले आहे. विमा कंपन्याही याबाबतची माहिती ई-मेलद्वारे ग्राहकांना देत आहेत. विमा कंपन्यांनी दिलेल्या माहितीमध्ये सांगण्यात आले आहे की, तुम्हाला चांगली योजना देण्यासाठी प्रीमियम दर (विम्याच्या किमती) किंचित वाढवावे लागतील. विमा योजनेच्या कामगिरीचा आढावा घेण्यासोबतच कंपन्यांनी उपचार खर्चात झालेली वाढही विचारात घेतली आहे.
‘एचडीएफसी अर्गो’ म्हणते की प्रीमियम वाढ थोडी त्रासदायक असू शकते; परंतु आवश्यक असेल, तेव्हाच ती केली जाते. ‘इर्डा’ला माहिती देऊनच विमा हप्त्यात वाढ केली जाते. दरांमधील हा बदल नूतनीकरण प्रीमियमवर परिणाम करू शकतो. नूतनीकरणाची तारीख जवळ येईल, तसतशी पॉलिसीधारकांना याबद्दल माहिती दिली जाईल. ‘एको जनरल इन्शुरन्स कंपनी’चे उपाध्यक्ष रुपिंदरजीत सिंग म्हणाले की, काही विमा कंपन्या प्रीमियम दहा ते १५ टक्के वाढवू शकतात. ‘इर्डा’ने ने नुकत्याच केलेल्या बदलांमध्ये, आरोग्य विमा घेण्यासाठी वयोमर्यादा न ठेवण्याचाही प्रस्ताव आहे.
यापूर्वी ही मर्यादा ६५ वर्षांची होती. ते म्हणाले की, वाढत्या वयाबरोबर व्याधींचा धोका वाढतो. त्यामुळे वयानुसार प्रीमियमची रक्कमही वाढवता येते. प्रीमियम सरासरी दहा ते वीस टक्के वाढू शकतात. कारण विमा कंपन्यांना आपल्या वाढत्या खर्चाची काळजी घ्यावी लागते. भारतातील वैद्यकीय महागाईचा दर वार्षिक १५ टक्के इतका आहे. प्रीमियम वाढण्याचे ते एक कारण आहे. ऑनलाइन इन्शुरन्स ब्राेकरच्या माहितीनुसार गेल्या काही वर्षांमध्ये देशात आरोग्य विमा घेणाऱ्या लोकांकडून भरलेल्या सरासरी रकमेत लक्षणीय वाढ झाली आहे. एका अहवालानुसार, २०१९ ते २०२४ या सहा काळात सरासरी रक्कम ४८ टक्क्यांनी वाढून २६,५३३ रुपये झाली आहे. या वाढीमागे दोन कारणे दिली जात आहेत. पहिले, उपचारांच्या खर्चात झपाट्याने झालेली वाढ (वैद्यकीय महागाई) आणि दुसरे म्हणजे, कोविड-१९ साथीच्या आजारानंतर आरोग्य विम्याबद्दल लोकांमध्ये जागरूकता वाढली आहे.