Saturday, June 29, 2024
Homeसाप्ताहिककोलाजहसले आधी कुणी?

हसले आधी कुणी?

नॉस्टॅल्जिया – श्रीनिवास बेलसरे

यशवंत पेठकर यांनी दिग्दर्शित केलेला ‘मोलकरीण’ हा १९६३ साली आलेला एक अतिशय लोकप्रिय मराठी सिनेमा होता. गरिबीतून वर आल्यावर, जन्मदात्या देवतुल्य आईलाच विसरणाऱ्या मुलाची ही कथा. देखणा रमेश देव, अतिशय सुंदर दिसणारी तरुण नलिनी सराफ (सीमा देव), प्रत्येक सिनेमात खरीखुरी सात्त्विक, सोशिक आई वाटणाऱ्या सुलोचना लाटकर आणि नेहमी कमालीच्या खाष्ट सासू ठरणाऱ्या इंदिरा चिटणीस हे ‘मोलकरीण’मधील प्रमुख कलाकार.

जेव्हा रमेश देव आणि नलिनी सराफ यांचे प्रेम यशस्वी होते, तेव्हा दिग्दर्शकांनी त्यांच्या तोंडी एक गाणे दिले होते. पी. सावळाराम या सिद्धहस्त गीतकारांनी लिहिलेल्या या द्वंद्वगीताचे एक वैशिष्ट म्हणजे त्यात आशा भोसले यांची साथ हिंदीतील प्रसिद्ध गायक तलत मेहमूद यांनी दिली होती. या अगदी वेगळ्या पोताचा आवाज असलेल्या गायकाने मराठी सिनेमांसाठी अनेक कर्णमधुर आणि लोकप्रिय गाणी दिली आहेत. पण ते पुन्हा कधी तरी!

वसंत देसाई यांनी संगीत दिलेले हे मोलकरीणमधले गाणे हे एका वेगळ्याच मूडचे होते. गीतकारांनी आपल्या तरल कल्पनाशक्तीमुळे यौवनातील पहिल्या प्रेमाच्या निरागस मन:स्थितीचे सुंदर वर्णन केले होते. युवामनातील नाजूक भावना या गाण्यात अशा काही चित्रित झाल्या होत्या की, तशा क्वचितच इतर कुणी केल्या असतील.

सिनेमात प्रेमाची रसरसती भावना प्रिया आणि प्रियकर दोघांच्या मनात प्रथमच जागृत झाली आहे. त्याचे त्यांनाच आश्चर्य वाटते आहे. एकीकडे मनात आनंदाच्या नाजूक उर्मी उठत आहेत आणि त्याबरोबर हे सगळे ‘त्याच्याही मनात सुरू आहे का’ हे जाणून घ्यायची उत्सुकता अनावर होते आहे! आपल्याला काय वाटते ते त्याला सांगायचेही आहे आणि ‘तुला काय वाटते?’ असे त्याला विचारण्याची घाईही झालेली आहे. अशी गुंतागुंतीची हुरहुर लावणारी मन:स्थिती गीतकारांनी लीलया कागदावर उतरवली होती. त्यावर वसंत देसाई यांनी तो खेळकर मूड जिवंत करणारे मधुर संगीत देऊन, गाणे अधिकच लोभस करून टाकले होते. पी. सावळाराम यांचे ते शब्द होते –

‘हसले आधी कुणी?
तू का मी?’
तारुण्यात एकमेकाला ‘त्या दृष्टीने’ पाहिल्याची कबुली जुन्या काळी फक्त नजरेने आणि मुलींच्या बाबतीत तर मुलांना गोंधळात टाकणाऱ्या एखाद्या नेत्रकटाक्षाने दिली जात असे आणि प्रेमभावना जेव्हा उभयपक्षी असेल तेव्हा त्या सहेतुक नजरभेटीत दोघांच्या चेहऱ्यावर एक अस्फुट स्मितहास्य उमटायचे. आता इतक्या सूक्ष्म घटनेवर गाणे रचणे शक्य आहे का? तर आमच्या सावळाराम यांचे उत्तर होते -‘हो, आहे!’ तेच हे गाणे!

प्रेयसी अगदी प्रांजळ कबुली देते आहे. पाठोपाठ प्रियकरही तेच सांगतो. मग त्यांना या चोरट्या नजरभेटीत एक वेगळीच लज्जत येऊ लागते आणि दोघांनाही तिची सवय लागून जाते. त्या काळी दोघांना ती ओळख मनोमनी पटली की, मग एकमेकांकडे नुसते पाहणेही खूप सुखद वाटू लागे. कारण तेव्हा स्त्री-पुरुषात हल्लीसारखा मोकळेपणा नव्हता. कुटुंबाची भावनिक एकात्मता, त्यातून मिळणारे टिकाऊ सौख्य सांभाळण्यासाठी अशा संवादाला काही मर्यादा होत्या. त्यामुळे तरुण-तरुणींचा संवाद होई तो नजरेनेच आणि तोही चोरट्या नजरभेटीतूनच. मग त्या नि:शब्द संवादाचे वेडच लागून जाई. युवामनातील सूक्ष्म भावनिक आंदोलनांचे हे सगळे मोहक पदर गीतकारांनी किती सहज शब्दात उतरवले होते!

‘सहज तुला मी रे सख्या पाहिले
तू बघता मी गं तुला पाहिले,
त्या पाहण्याचे वेड लागता,
त्या वेडाचा तू अर्थ सांगता,
हसले आधी कुणी? तू का मी?’

आपण असे सतत एकमेकांना का शोधतो, एकमेकांच्या सहवासासाठी का आतुर असतो, एकमेकांना चोरून का न्याहाळतो ते दोघांपैकी एक जण दुसऱ्याला समजावून सांगतो, तेव्हा खरे तर त्याला हसू येते. ते सांगताना एका पातळीवर त्याला समोरच्या बाजूचा प्रेमाला मिळालेला होकार पक्का करून घ्यायचा असतो! म्हणून कवीने म्हटले होते की,
‘त्या वेडाचा तू अर्थ सांगता,
हसले आधी कुणी,
तू का मी, हो तू का मी?’

सिनेमात सीमा आणि रमेश देव गावाबाहेर भेटतात. तेव्हा जवळ आल्यावर, ती सवयीप्रमाणे पदर सावरते. त्याची नोंद गीतकारांनी आपल्या गाण्यात घेतली होती. ती छोटीशी हालचालही कवीने गाण्यातील प्रसंगाचा विषय केला आणि दिग्दर्शकाने तो बारकावा चित्रीकरणाच्या वेळी लक्षात ठेवून, साकार करून घेतला होता. सीमा म्हणते, ‘तुझी ती भेट किती अचानक झाली आणि मी दचकून विजेसारखी तिथून निघून गेले.’ यावर रमेश देवचे वाक्य मोठे खोडकर होते. तो म्हणतो, ‘तू इतकी गोंधळलीस की, पदर ढळलेला नसतानाही तू तो सावरलास!’ तू निघून जायचे नाटक केलेस खरे; पण मध्येच मागे वळून पाहायचा मोह तरी तुला कुठे आवरला? त्या क्षणाला दोघांना हसूच आले ना? तुला आधी आले की मला ते कळलेच नाही.

अवचित तुझी रे भेटची होता
पदर सावरी ढळला नसता
बिजली परि मी निघूनी जाता
मागे वळूनी तू हळूच पाहता
हसले आधी कुणी? तू का मी?

या प्रेमात सुरुवातीच्या काळात अनेक अतर्क्य गमती-जमती होत असतात. मनातून भेटायची नुसती ओढ लागलेली असते. पण आपला समोरच्यावर किती प्रभाव आहे, हे पाहण्यासाठी कधी-कधी मुद्दामही भेट टाळली जाते. मग हा डाव लक्षात आल्यावर, दोघांतला एकजण रुसतो. ते पाहून आपल्या कृतीची दिलगिरी व्यक्त करायच्या ऐवजी प्रेयसी स्वत:च फुगून बसते. कदाचित तिला ‘दिल ही तो हैं’ मधल्या साहीर लुधियानवींच्या ‘निगाहे मिलानेको जी चाहता हैं’ या कव्वालीतील ‘किसीके मनानेमे लज्जत वो पाई के फिर रूठ जानेको जी चाहता हैं’ या ओळीचा आनंद घ्यायचा असतो! खूप गमती-जमती असतात, त्या नव्हाळीच्या निरागस प्रेमात. जवळीक साधता-साधता पुन्हा दोघे उगाचच दूरही जातात किंवा गेल्यासारखे दाखवतात आणि मग आपल्या विचित्र वागण्याचे त्यांचे त्यांनाच हसू येते! पी. सावळाराम यांनी या प्रेमी मनातील आंदोलनांचा एकेक बारकावा शब्दबद्ध केला होता-

नाही भेटले बळेच तुजला,
कळले सखये जेव्हा मजला.
परस्परावरी रुसता फुगता,
जवळ येऊनी दूरची सरता,
हसले आधी कुणी? तू का मी?
पूर्वीच्या गीतकरांच्या १०% गुणवत्ता असलेल्यांचा आज केवढा गवगवा होतो. मानधनाच्या रकमा वाढल्या, सत्कार सोहळे वाढले, पुरस्कार वाढले पण आपल्याच मनातील, आपण कुणालाच न सांगितलेले भावतरंग इतक्या खेळकरपणे,
लोभसपणे टिपणारे असे कवी पुन्हा थोडेच दिसणार आहेत?

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -