Wednesday, March 19, 2025
Homeसंपादकीयरविवार मंथनस्नेहरूपी चाफा

स्नेहरूपी चाफा

माेरपीस: पूजा काळे

वय वाढल्याचं हक्कानं दाखवून देणारा दिवस म्हणजे वाढदिवस. वर्षभराचा सुखदुःखाचा जमा-खर्च मांडण्याचा दिवस म्हणजे वाढदिवस आणि त्यातून आपण काय कमावलं याचा सारासार विचार करण्याचा दिवस जो, थोडासा हसवून-रडवून भावनिक करून जातो. इस मतलबी दुनिया में फरिश्ते नजर आते है…| गम भरी धुप में जो छाव बन जाते है…||

अशी सावली बनलेली काही माणसं, आपल्या भोवती वावरत असतात. कस्तुरीसारखी दरवळतात. चंदनापरी सुगंधित होतात. बोरी-बाभळींनाही सुवासित करणारा असा, प्रांजळ आहेस तू. कधी मैत्रीच्या प्रवाहात वाहत जाणारा. तर कधी एखाद्याला गुणदोषासह स्वीकारत मार्गावर आणणारा.
“विसरतो कधी कधी आठवत नाही चेहरे.
संवादाची ऐशी तैशी,
दिवसामागून दिवस सरे
जशी उतरती कॅन्व्हासवर रंगबिरंगी फुलपाखरे
शुभेच्छात देते तुजला चाफ्याचे रंग गहरे”.

शुभेच्छारूपी नजराणा तुला पेश करताना मनात हर्ष ओसंडून वाहतोय. येणारा प्रत्येक दिवस हा माझ्यासाठी विशेष असतो, तसा तो आजही आहे. चाफ्याच्या ओढीनं अनाहतपणे पाय ओढले गेले मंडईतल्या फूल बाजारात. तिथच तुला आवडणारा पिवळा गर्द चाफा डोकावून पाहत होता माझ्याकडे. त्याच्या पिवळ्या, हिरव्या देठातून तुझी आठवण जागी झाली. आज कागदावरील रेघोट्यात ते मांडण्याचा प्रयत्न करतेय, एवढंच काय ते विशेष. तुला ठाऊक आहे, कोणाला शुभेच्छा द्यायला फारसं कारण लागत नाही मला. उठता, बसता कविता पाझरतात मेंदूमध्ये, तेव्हा कुठं रित होण्यासाठी रितसर पद्धतीनं मोकळी होते मी. आणि त्याचवेळी शुभेच्छारूपी रचना प्रसवतात. एकेकाळी माझ्या कविता कोण आवडायच्या तुला. त्या ऐकवताना उगाचचं पाठ थोपवून घ्यायचे मी स्वत:ची. तेवढाच क्षणिक आनंद व्हायचा मला. हा आनंद मग चाफा देऊन साजरा करायचासं तू. चाफ्याची पसाभर फुलं उधळायचासं माझ्यावर. तुझी ही अशी खासियत आवडायची मला. खरं तर मोगरा, गुलाब तुझी आवडती फुलं, पण माझ्यासाठी रान गोळा करायचासं. मग मीही रानवेडी, गंधवेडी व्हायचे.

“केशर चाफा, शुभ्र मोगरा शिडकावे सौम्य सुगंधाचे
ग्रीष्माच्या स्वागताला सूर लागती कोकिळाचे”
अशा अवस्थेत मन भरारी घ्यायचे. “जाई, जुई, गुलाब, चाफा दरवळे गंध मनात. सोबत सरावं आयुष्य गुजगोष्टी करून खेळात”.
खेळातली तुझी जीत सदैव ठरलेली असायची. तू नेहमीच राजा होऊन जगलास, यातच खरा आनंद होता. माझं चाफ्याचं वेड बालपणापासूनचं. कोकणातल्या आई-आजीच्या दारात आपल इवलंसं अस्तित्व दाखवतं. जाई, जुई, मोगरा, तगर, जास्वंद, या सगळ्यांत स्वत:चं वैशिष्ट्य सांगणारं हे खूज झाड. माझ्या अबोल-शांत स्वभावासारखंच म्हणूया हवं तरं. हिरव्या पानातून डोकावणारं.

“चाफा बोलेना, चाफा चालेना, चाफा खंत करी काही केल्या फुलेना”
या गाण्याच्या अर्थाला समजून घेता, माझ्याबरोबर मोठा झालेला चाफा बहरताना पाहिलाय मी. त्याच्या दलातील टपोर सौंदर्य न्याहाळत लहानाची मोठी झाले मी. केशर चाफा, पांढरा चाफा तर कधी हळदुली रंगाचा मनमोहक चाफा, डोक्यात माळल्यावर रंगाचं दान देणारा. त्याचं असणं, दरवळणंं जणू काही माझ्यात विरलेलं. कारण माझ्या अंतर्मनात दरवळलेला चाफा, तुझ्या येण्यानं बहरलेला. सुवासिक झालेला. आपली मैत्री फुलवणारा. कालांतराने मोगरा आवडतो हे तू विसरू लागलेला. त्यानंतर तू, मी, चाफा वेगळे उरलोचं नाही. पण एका वळणावर अनपेक्षित लाटेनं वाहून गेलं सारं. विसंवादाने चाफा हलला मुळासकट. मग जबाबदाऱ्यांच्या ओझ्यानं फुलांवरील हक्कही सोडलास तू.

माझ्याकडे निव्वळ पाकळ्या उरल्या, त्या क्षणाला तेव्हापासून चाफ्याचा प्रतिशोध थांबवलाय मी. चाफ्यावर, तुझ्यावर लिहिता येईल बरंच काही. पण थांबवायला हवं स्वत:ला. लिहिताना उगाचच रडू आवरायचं नाही. भुरळ पाडणाऱ्या प्रितफुलातून, आपणही सुटलो नव्हतो. तू दिलेल्या वहीमध्ये दडवलेला; शेवटचा चाफा हीच माझी जीवलग आठवण. रंग बदलला जरी त्याचा तरी, तुझ्या आठवांच्या खुणा बाळगून आहे तो. मला जाणवतं आसपास त्याचं निर्मोही रूप. त्या रूपातला तू माझा कृष्णव्रत सखा.
ऐक ना…!

चाफा बोलत नाही काही, मागत नाही काही. बांधावर उभाच सूर्यकिरण खात अधीमधी. शेकवत बसतो अंग निगुतीनं जपलेल्या प्रितफुलांचं. त्याला ठाऊक असतं दरवळायचं. ठरल्या दिवशी फुलता फुलता व्यक्त व्हायचं. मग कधीतरी तूही सोडतोस बांध, फुलांना विखरण्यासाठी. पांढुरकी पिवळी फुलं साक्ष देतात तुझ्या अस्तित्वाची आणि तू बहरतोस सहस्त्र जाणिवांनी. चाफा उभाचं आहे, तिसरा होऊन आजही आपल्यात; पसरवत हिरव जाळं. हसतो तुझ्याकडे बघून तुझ्यात वसल्यासारखा आणि तूही खुलतो आहेस तुझ्या छबीमधून माझ्यावर जीव ओवाळून टाकल्यासारखा. पानाफुलांच्या गंधभरल्या शुभेच्छा तुजसाठी. कोणीतरी म्हटल्याचं आठवतं लपविलास तू पिवळा चाफा सुगंध त्याचा लपेल का…? सुगंधाहूनी तरल अशी प्रीत तुझी छुपेल का…?” डबडबलेल्या डोळ्यांनी किनारा गाठलाय. आसवांचे मोती होण्याआधी मला आवरायला हवं, थोडं सावरायला हवं.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -