Wednesday, October 29, 2025
Happy Diwali

जत्रा...

जत्रा...

मनस्विनी - पूर्णिमा शिंदे

आनंद पर्वणीच! आपल्या महाराष्ट्राच्या पावनभूमीत साधारण हिंदू नववर्ष चैत्र महिना सुरू झाला की, लगभग सुरू होते ती यात्रेची. मोठी धामधूम, धमाल जत्रांची. सालाबादप्रमाणे या वर्षीही प्रत्येक गावोगावी मोठमोठे उत्सव, महोत्सव, सप्ताह भरविले जातात. खास दूर-दूरहून आपापल्या गावी आपल्या कुटुंबीयांसमवेत शहरवासीय, गावकरीदेखील सामील होतात. देव-दर्शनाला जातात. मोठी लगबग असते. वर्षातून एकच असा प्रसंग ग्रामदेवता, कुलदेवता, जागर, सप्ताह, कीर्तन, भजन कलांचे दालन खुले होते. निरनिराळ्या तऱ्हेने सांस्कृतिक, सामाजिक एकसंध राहण्याची पूर्वापार पिढ्यान््पिढ्या चालत आलेली ही उत्तम योजना. यातून अख्खा गाव एकत्र येत एकीचे बळ, सांघिकतेचे उत्तम दर्शन होते.

जुन्नर तालुक्यातील वडगाव सहाणी माझं गाव. चाळीस वर्षांपासून येथे आवर्जून सांगण्यासारखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे येथे जत्रेला पुरुषांसह महिलांचेही कबड्डीचे सामने भरवले जातात. वजनी गटांचे खुले सामने आणि संपूर्ण महाराष्ट्रातून विविध गावांतील मुली, महिला खेळाडू यात सामील होतात. त्यांची उत्तम सोय, सन्मानपूर्वक पाहुणचारदेखील केला जातो. गुढीपाडवा, रामनवमी, हनुमान जयंती, अक्षय्य तृतीया अशा सर्व सणांबरोबरच आगे-मागे नामांकित कीर्तनकार महाराजांची कीर्तने सादर होतात. हरिपाठ, प्रवचने, सेवा-संप्रदाय भजनी मंडळ सुरू असतो. तसेच देवीचा उत्सव, ओटी भरणे, जागरण, गोंधळ, भारूड, लावणी आणि तमाशादेखील आयोजित केला जातो. माझं आजोळ वडगाव कांदळी. बिरोबाची जत्रा जागृत देवस्थान. हगामा, हजेरी काला, तमाशा, कुस्ती, बैलगाडा, शर्यत खूप धमालच. पेढा, रेवड्या, शेंगोळ्या, भजी, उसाचा रस हे जिन्नस नेहमी मिळतातच. पण तेथे खाण्यातली जी चव आहे, त्याचा आनंद मात्र गगनात मावत नाही आणि ते कुठेच मिळत नाही. हंगामाच्या दिवशी तर कुस्त्यांची पैज, जिंकणे, बक्षिसे मोठा उत्सव असतो.

आमच्या गावातील आम्ही नामांकित मंडळी असल्याने, तमाशा बघायला वडीलधारी माणसं कधीच आम्हाला पाठवीत नसत. पण नकळत्या वयापासूनच चारचाकी गाडीने आम्ही सर्व मामे भावंडं, मावस भावंडं मिळून गाडीतूनच त्याचा आस्वाद घेत असू. त्या रात्री तुफान नाचणारे कलाकार, अदाकार दिव्यांच्या प्रकाशात मेकअपमुळे खूप-खूप सुंदर दिसत आणि त्याच महिला सकाळी उजेडात हजेरीला पाहिल्या की, बापरे! खूप हिरमोड होत असे. तमाशाचा वग म्हणजे कथा. खूप मार्मिक, मर्मभेदी खेळून ठेवणारी आकर्षक असे. अशा वेळी उत्सुकता असायची. आतुरता असायची आणि गावाकडे खूप ओढादेखील असायचा. आज मागे वळून पाहताना, आमच्या पुढच्या पिढीला त्याचं काहीच माहीत नाही, अनुभवही नाही. आता कालांतराने लोप पावेल की काय, या चालीरीती, रूढी? असे काहीसे वाटू लागले. जतन, संवर्धन करणाऱ्या, पिढ्यान् पिढ्या चालणाऱ्या या रीती-भाती पुढच्या पिढीने देखील पाळायला हव्यात आणि त्याचा आस्वाद घ्यायला हवा. कारण याने वर्षभरासाठी थकवा निघून जातो.

जगण्याला एक बळ मिळतं गावी गेल्याने! जत्रा म्हणजे देवाला नवस करणं, भक्तीचा आलिंगन देणे. पेढा, नारळाने साकडं घालणं, प्रदक्षिणा घालणं. रोजच तू स्मरणात आहे; पण आज तुझा वाढदिवस असं देवाला सांगत, इच्छा मागून सुखावणं. जत्रा म्हणजे भावभावनांचा कल्लोळ, भक्तीचा लळा. सर्वांनी या जत्रांचा आस्वाद नक्की घ्यायला हवा. बघा आपल्याला अनुभवास येईल की, नवनवा हवाहवासा चमत्कार आणि गावाशी जोडून ठेवणारा एक सुंदर धागा म्हणजे जत्रा. आपल्या प्रत्येकाच्या गावची, मनातली आनंदाची जत्रा. या मजेपासून ते अलिप्त राहिले; पण जुनं ते सोनं असतं, खरंच म्हणावं लागेल. सगळे एकत्र येतात, गाव दुमदुमतं, घर सजतात, रीती-भाती पाळतात. मोठ्यांचा आदर, आनंदी-उत्साही एकजूट आणि या सगळ्यांमध्ये सुट्ट्या काढून माणसे एकत्र येतात. कधीच वेळ न मिळणारी माणसंदेखील त्या वेळेला एकत्र येण्याने सगळ्यांचे गेट-टुगेदर होते, संबंध चांगले राहतात. त्याचप्रमाणे भेटणेही होतं. आपुलकी, जिव्हाळा व नाते टिकवणारी ‘जत्रा’ ही मैफल असते.

Comments
Add Comment