परकीय भाषेचा अहंकार…

Share

मायभाषा: डॉ. वीणा सानेकर

मराठी भाषकांकडे पाहणाऱ्यांचे दृष्टिकोन कसे असू शकतात, याचा पुरेपूर अनुभव घेण्याचा योग एका महाविद्यालयाच्या नेतृत्वपदी बसल्यावर मी घेतला. कुणी म्हटले, गावठी लोक कॉलेज चला रहे है ‘तर कुणी’ ‌‘‘हिला काय इंग्रजी येणार?”, म्हणून खिल्ली उडवत राहिले. उर्मटपणे वापरल्या गेलेल्या भाषेचा अनुभव मी पुरेपूर घेतला. भाषा अहंकाराची, उद्दामपणाची, मुद्दाम ताणलेल्या विसंवादाची! भाषा हे किती भयंकर शस्त्र बनू शकते, याची प्रात्यक्षिके सादर करण्याची चढाओढच लागलेली जणू!

आपणास सफाईदार इंग्रजी येते म्हणून आपण श्रेष्ठ, ही जणू एक नवीन वर्णव्यवस्था समाजात अस्तित्वात आली आहे. याकडे पाहताना अनेक छोटे-मोठे संदर्भ सहज आठवतात. महाराष्ट्रात इंग्रजीचा माज आपण किती सहज पचवला याचे उदाहरण म्हणजे इंग्रजी शाळांची बेसुमार वाढ. मराठीला साफ वगळून मोठमोठ्या प्रशस्त ‘इंटरनॅशनल’ म्हणवून घेणाऱ्या शाळा फोफावल्या आहेत. या शाळांनी अगदी सहज मान्यता मिळवल्या आहेत. मराठीला मात्र या शाळांमध्ये नाममात्र अस्तित्व होते किंवा आहे.

महाविद्यालयांमधल्या मराठी विभागांना ओहोटी लागली. विषय कोणताही असो, मुलांना त्यांच्या भाषेत लिहायचा हक्क मिळाला पाहिजे, पण मातृभाषेत लिहिणाऱ्या मुलांना आपण आपल्याच मातीत उपरे ठरल्याची जाणीव होऊ लागली. मुख्य म्हणजे मराठीत लिहिणाऱ्या मुलांमध्ये अवतीभवतीच्या भाषेत इंग्रजी सरमिसळ करणाऱ्या वातावरणात न्यूनगंड विकसित होऊ लागला. १८५०-१८६० च्या सुमारास अमेरिकेसारखे देश बलवान कसे झाले हे पाहण्याकरिता जपानने आपल्या मुला-मुलींना तिथे पाठवले. विविध विद्याशाखांचा अभ्यास करून ही मुले जपानमध्ये परतली. ही मुले परतून इंग्रजी व अन्य परक्या भाषेत काम करू लागली. कारण त्या भाषेत त्यांनी ज्ञान ग्रहण केले होते, पण यावर सलग व सविस्तर चर्चा करून जपानी सरकारने निर्णय दिला की, जपानी भाषेतच काम झाले पाहिजे. त्या मुलांनी जपानी भाषेत तितके शब्द नसल्याची तक्रार केली तरी जपान सरकार निर्णयावर ठाम राहिले. विशिष्ट शब्द आपल्या भाषेत नसेल, तर तो आयात करणे आणि समांतरपणे आपल्या भाषेत शब्द तयार करणे व नंतर तो वापरात आणून रुजवणे असे धोरण त्यांनी अवलंबिले.

सर्व स्तरांवर भाषेच्या प्रत्यक्ष प्रयोगातूनच आपली भाषा विकसित होईल. वास्तविक आमच्या स्वातंत्र्य संग्रामात विविध लोकभाषांचे स्थान मोठे होते. या स्थानिक भाषांनी त्या त्या ठिकाणी जनजागृती केली. पण स्वातंत्र्यानंतर आपण इंग्रजांच्या भाषांचे गुलाम झालो. जातीव्यवस्था हे सामाजिक भेदभावाचे कारण तोकडे होते म्हणून की काय, भाषेच्या नावावरदेखील समाजात श्रेष्ठ-कनिष्ठत्वाची उतरंड निर्माण झाली.

डॉ. राममनोहर लोहिया यांनी एके ठिकाणी असे म्हटले आहे की, इंग्रजी शिक्षितांमध्ये इंग्रजीमुळे विकृती निर्माण होत असते. इंग्रजी शिक्षित माणूस आपल्या इंग्रजी न जाणणाऱ्या नातेवाइकांना आणि जनतेला कमी लेखतो आणि हीन समजू लागतो. लोहियांनी नव्वदीच्या दशकात नोंदवलेले निरीक्षण आजही तितकेच खरे आहे. भाषा हे नक्कीच शस्त्र आहे पण तिचा उपयोग सत्ताधीशांनी सामाजिकदृष्ट्या भेद निर्मून स्वत:चा स्वार्थ साधण्यासाठी किंवा उच्चशिक्षितांनी इतरांना हिणवून अहंकार मिरवण्यासाठी करू नये. ‘‘अहंकाराचा वारा न लागो राजसा’’ हा आमच्या नामदेव महाराजांचा उपदेश स्मरणात ठेवून वर्तन करत राहिलो म्हणजे परक्या भाषेचे स्तोम माजवून आमच्या भाषेला हिणवण्याचा अधिकार मायभूमीत आम्ही कुणाला दिलेला नाही.

Recent Posts

KKR vs GT, IPL 2025: गुजरातविरुद्ध घरच्या मैदानावर कोलकत्त्याचा लाजिरवाणा पराभव

कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…

5 hours ago

उबाठाला राणेंचा दणका! सिंधुदुर्गात होणार १५०० कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश!

२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…

5 hours ago

ही कणकवली नव्हे, कुडाळ आहे! निलेश राणे यांच्याशी पंगा नको!

माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…

6 hours ago

नाल्यातून गाळ काढताना ३० सेकंदाचा व्हिडीओ कंत्राट कंपनीला बंधनकारक

लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…

6 hours ago

PM Modi : आजची धोरणं, उद्याचं भारत! – पंतप्रधान मोदींचा नागरी सेवकांना मंत्र

PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…

6 hours ago